चेन्नईचा एफसी गोवावर निसटता विजय

0
94
इंडियन सुपर लीग स्पर्धेेत एफसी गोवा संघाचा शुभारंभी सामना काल फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री रमेश तवडकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमवेत एफसी गोवा संघाचे मालक दत्तराज साळगावकर, श्रीनिवास धेंपो व वेणुगोपाल धूत यांच्या कन्या पूजा धूत. दरम्यान, एफ सी गोवाच्या शुभारंभी चेन्नईनबरोबरच्या सामन्यात गोवा संघाला २-१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. (छाया : विपुल रेगे)

स्थानिक एफसी गोवाचा २-१ असा पराभव करून चेन्नईन एफसीने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पहिला विजय नोंदवला. सामनावीर म्हणून चेन्नईन एफसीचा आघाडीपटू बलवंत सिंगची निवड करण्यात आली.येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या उत्कंठावर्धक लढतीत बलवंत सिंहने आयएसएलमध्ये गोल नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळविताना पाहुण्या चेन्नईन एफसीचे खाते खोलले तर ब्राझिलियन एलानोने पहिला गोलस्कोअरर ‘मर्की प्लेयर’ ठरताना सुंदर ‘डायरेक्ट फ्रीकिक’वर गोल नोंदवित पाहुण्यांना मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली. स्थानिक एफसी गोवाचा एकमात्र गोल बचावपटू ग्रेगरी अर्नोलिनने नोंदवला.
खचाखच भरलेल्या स्टेडियमवरील या उत्कंठावर्धक मुकाबल्यात यजमान गोवा एफसीने समर्थकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यात जोरकस प्रारंभ करताना प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार आक्रमणे केली. पोर्तुगीज स्ट्रायकर एडगर मार्सेलिनोने जोरदार आक्रमणे केली तर ‘मर्की प्लेयर’ रॉबर्ट पीरिसने सुरेख पासेस देत आघाडीला सक्रिय ठेवीत प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणले तथापि मिळालेल्या संधीचा फायदा उठविण्यात यश आले नाही. प्रारंभास नारायण दासने संधी गमावल्यावर एडगर मार्सेलिनोचा फ्रीकिक फटका बाहेर गेला. आठव्या मिनिटाला पिरीसच्या पासवर एडगरचा आणखी एक फटका बाहेर गेला. तर १९व्या मिनिटाला त्याने डाव्या फळीतून हाणलेला फटका चेन्नईचा गोलरक्षक ब्रॅसिगलियानो अडविला.
यजमानांचे गोलप्रयत्न निष्फळ ठरत असतानाच ३२व्या मिनिटाला संधीसाधू बलवंत सिंहने पाहुण्या चेन्नईचा आघाडीचा गोल नोंदवला. धनचंद सिंहने डाव्या विंंगेतून दिलेल्या क्रॉसवर नियंत्रण राखण्याच्या प्रयत्नात एलानो गोलतोंडावर संतुलन राखू शकला नाही आणि पडल्याने पेनल्टीचा दावा होत असतानाच चेंडू बलवंतला मिळाला आणि त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या बेसावधतेचा लाभ उठवित चेंडू जाळीत फटकावून शुभारंभी आयएसएलमध्ये गोल नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळविला (१-०).
दहा मिनिटानंतर मँचेस्टर सिटीचा खेळाडू एलानोने अप्रतिम फ्रीकिकद्वारे पाहुण्यांचा दुसरा गोल केला. एफसी गोवाचा बचावपटू प्रबीर दासने प्रतिस्पर्ध्यांला अडथळा आणल्याने पंचानी चेन्नईला वादग्रस्त फ्री-किक बहाल केली आणि ब्राझिलियन एलानोने सुंदर फटक्यावर एफसी गोवाचा गोलरक्षक जॅन सेडाला चकवीत पाहुण्यांना मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात एफसी गोवाने खेळात भरीव प्रगती साधीत प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमणे केली पण दोन गोलांची आघाडी असलेल्या चेन्नईने बचावावर लक्ष केंद्रित करीत यजमानांची आक्रमणे थोपविली. ६५व्या मिनिटाला यजमानांच्या प्रयत्नाना यश आले. यौनेस बेनेगुलोनाने उजव्या बाजूने मिळालेला क्रॉस गोलतोंडावर वळविला आणि ग्रेगरी अर्नोलिनने तो जाळीत ढकलला (१-२).
या गोलनंतर यजमानांनी बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. होलीचरणच्या जागी उतरविलेला स्थानिक हिरो क्लिफर्ड मिरांडाची घेतलेल्या कॉर्नरवर गोलरक्षकाने चेंडू पंच करीत बाहेर टाकल्याने एफसी गोवाला बरोबरीची संधी हुकली तर आणखी एक राखीव खेळाडू रँटी मार्टिन्सचा गोलप्रयत्न चेन्नईचा गोलरक्षक एमिलियानो ब्रासिग्लियानोने थोपवित पाहुण्यांची विजयी आघाडी अबाधित राखली. सामन्याच्या अंतिम क्षणात क्लिफर्डने घेतलेल्या डाव्या पायाचा जोरकस फटका चेन्नईचा गोलरक्षक जेन्नारो ब्रॅसिग्लियानोने अचूकपणे थोपविला.
एफसी गोवा : जॅन सेडा (गोलरक्षक), नारायण दास, यौनेस बेनगेलौन, पीटर कार्वाल्यो, रॉबर्ट पीरिस, हेर्लेन (रँटी मार्टिन्स), मार्सेलिनो (ब्रुणो पिन्होरो), होलीचरण नाझार्ंरी (क्लिफर्ड मिरांडा), गॅब्रिएल फर्नांडिस, ग्रेगोरी अर्नोलिन, प्रबीर दास.
चेन्नईन एफसी : जेन्नारो ब्रॅसिग्लियाना (गोलरक्षक), बर्नांड मेंडी, एलानो ब्लुमर (जॉन मेंडोसा), बोजान जोर्डजिक (जायरो सुआरेझ), डेनसन देवदास, अभिषेक दास, बलवंत सिंग (जेजे लालपेखलुआ), गौरमंगी सिंह, ब्रुणो पेलिसारी, धनचंद्र, मिखायल सिल्वेस्टर.
क्षणचित्रे
* सामन्याला गोमंतकीय फुटबॉलप्रेमींचा मोठा पाठिंबा लाभला. स्टेडियम पूर्णपणे भरले होते. सामना सुरू झाला तरी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रेक्षकांच्या सर्व गेट्‌सवर रांगा लागल्या होत्या.
* पोलिसांनी वाहतुकीची व्यवस्था चोख बजावली होती.
* सामना सुरू होण्यास दहा मिनिटांचा अवधी असताना एफसी गोवाचे सहमालक श्री. श्रीनिवास धेंपो हे मुख्यमंत्र्यांसह मैदानावर आले. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना एफसी गोवा हा संघ तुमचा असून त्याला जोरदार पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गोव्यात एक फुटबॉलसाठी मोठे स्टेडियम उभारून देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री रमेश तवडकर, सहमालक श्री. दत्तराज साळगावकर आणि व्हिडीओकॉनच्या पूजा धूत यांची उपस्थिती होती.
* सामन्याच्या पहिल्या सत्राच्या मध्याला आयएसएलच्या संस्थापक चेअरमन सौ. नीता अंबानी यांचे स्टेडियमवर आगमन झाले.
* वरुण कार्वाल्हो आणि पियुष सोनी यांचे बँड पथक ‘फोर्सा गोवा’द्वारे एफसी गोवाच्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते.
* सामना संपल्यानंतर चेन्नईन एफसीचे सहमालक बॉलीवूडस्टार अभिषेक बच्चन आणि त्याच्याबरोबर आदित्य कपूर यांनी एक चॅरेटी शो म्हणून पेनल्टी किक घेतल्या. विशेष म्हणजे आदित्यने दोन गोल नोंदविले, तर अभिषेक बच्चनला एकही गोल नोंदविता आला नाही.