चुकीचा संदेश

0
85

रापणकारांच्या मागण्यांप्रती सरकार एकीकडे पूर्ण सहानुभूती दर्शवते आणि दुसरीकडे त्यांच्यावर अमानुष लाठीमार होतो ही बाब अतर्क्य आहे. रापणकारांचे आंदोलन असा लाठीमार करण्याएवढे खरोखर चिघळले होते की त्यांनी कॅसिनोंचा मार्ग रोखून धरल्याने त्या व्यवसायावर गदा आल्याने ही निर्णायक कारवाई केली गेली असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. मच्छिमारी संचालकांना या रापणकारांनी एलईडी दिव्यांनिशी मासेमारी करणार्‍या काही मोठ्या बोटींचे नोंदणी क्रमांक दिले होते आणि त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. परंतु त्या दिशेने काही प्रयत्न होत नसल्याचे दिसताच त्यांनी मच्छीमारी संचालकांना घरी जाण्यास मज्जाव केला. त्यातून शांततापूर्ण आंदोलन एकाएकी चिघळले असे एकंदर उपलब्ध माहितीवरून दिसते. अन्यथा आतापर्यंत शांततामय मार्गाने चाललेले आंदोलन एकाएकी हिंसक बनण्याचे काही कारण नव्हते, कारण सरकारने एलईडीयुक्त मासेमारीवर बंदी घालणारी अधिसूचना त्यापूर्वीच काढली होती. मच्छीमारी संचालक घरी जायला निघताच संभ्रमित आंदोलकांनी त्यांना घेरले व यावेळी संचालकांची घेराबंदी उठविणारे पोलीस आणि आंदोलक रापणकार यांच्यात धक्काबुक्की झाली, ज्याची परिणती म्हणून लाठीमाराचा आदेश दिला गेला. लाठीमाराविना हा तणाव आटोक्यात आणता आला नसता का हा विचार करायला लावणारा सवाल आहे. आजवर गोव्यात अनेक उग्र आंदोलने झाली. लाठीमारही झाले. परंतु लाठीमारासारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी केवळ आपल्या प्रसंगावधानाने आणि चतुराईने वातावरणातील तणाव नाहीसा करणारे कर्तबगार पोलीस अधिकारीही गोव्याने पाहिले आहेत. त्यामुळे उचला लाठ्या आणि हाणा असा अघोरी प्रकार करण्याऐवजी असे आंदोलन नियंत्रणात आणण्याच्या अनेक क्लृप्त्या असतात, परंतु त्या पर्यायांचा विचार येथे झालेला दिसला नाही. त्यामुळे जो लाठीमार झाला त्यातून हे आंदोलन सरकार चिरडू पाहात होते असा संदेश समाजात गेला आहे आणि याचे पडसाद येणार्‍या काळात निश्‍चितपणे उमटणार आहेत. रापणकार किंवा गोव्याचा पारंपरिक मच्छीमार हा मुख्यत्वे गोव्याच्या ख्रिस्तीबहुल किनारपट्टीत वास्तव्य करतो. हा त्याच्या रोजीरोटीचा व्यवसाय आहे. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणे म्हणजे मधमाशांचे मोहोळ अंगावर ओढवून घेण्यासारखे आहे. पोलिसांच्या लाठीमाराने सरकारने हे मोहोळ अकारण अंगावर ओढवून घेतले आहे. या रापणकारांना विद्यमान सरकारविरुद्ध भडकावण्यास विरोधी पक्षही उतावीळ दिसतो. त्यांच्या नेत्यांचे यासंदर्भातील वक्तव्य या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचे त्यांचे मनसुबे उघडे पाडणारे आहे. भाजप सरकार रापणकारविरोधी आहे असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. या विषयाला ही जी राजकीय मिती आहे ती लक्षात घेण्याजोगी आहे. रापणकार विरुद्ध सरकार असे चित्र निर्माण होणे सरकारला परवडणारे नाही. एक तर त्यांनी पुढे केलेल्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत आणि गोव्याच्या या पारंपरिक व्यवसायाच्या हिताच्याच आहेत. मासेमारीच्या क्षेत्रात बोकाळलेली बेबंदशाही आवरा एवढेच या रापणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्याशी पूर्ण सहमती दर्शवीत केवळ गोव्यापुरताच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर या विषयावर पाठपुरावा करून पारंपरिक मच्छिमारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा. केवळ एलईडी दिव्यांच्या मदतीने होणारी मासेमारीच नव्हे, तर फिश फाईंडरद्वारे माशांचा माग काढणे, बूल ट्रॉलिंगद्वारे टनांवारी मासळी उपसणे या गैरप्रकारांवर निर्बंध यायला हवेत आणि त्या दिशेने सरकारने आपल्या यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवल्या पाहिजेत. त्यासाठी या आंदोलकांना विश्वासात घेण्याची गरज आहे. एकेकाळी माथानी साल्ढाणांनी या रापणकारांचे यशस्वी नेतृत्व केले. परंतु माथानींच्या पत्नी एलिना यांना आज या रापणकारांचे नेतृत्व पेलता आलेले दिसत नाही. मच्छीमारमंत्री आवेर्तानही तोकडे पडले आहेत. त्यामुळेच सरकार विरुद्ध रापणकार असे चित्र आज निर्माण झाले आहे. आजवर हा विषय तत्परतेने हाताळला गेला असता तर अशा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला नसता. गुरूवारी आंदोलक रापणकारांवर झालेल्या लाठीमाराने जे दडपशाहीचे चित्र निर्माण झाले आहे, ते राजकीयदृष्ट्याही घातक ठरेल. सरकारने रापणकारांचे हे आंदोलन काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. ते चिरडण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर ते पाऊल आत्मघातकी ठरल्यावाचून राहणार नाही.