चीनची वॉर ऑन टू ङ्ग्रंट पॉलिसी

0
118
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

शक्सगाम खोर्‍यावर कब्जा केल्यानंतर पीओकेमधील गुंतवणुकीच्या रक्षणासाठी चीनने तेथे आपले सैनिक तैनात केले आहेत हे उघडगुपीत आहे. या भागात पिपल्स लिबरेशन आर्मीचे बळ वृद्धिंगत करण्यामागे सामग्री व्यापकता वृध्दिंगत करून आगामी युध्द नवीन, सुधारित तंत्रज्ञानाच्या बळावर लढण्याचा आणि वेळ पडल्यास भारताला सामरिक व राजकीय धडा शिकवण्याचा चीनी हेतू आहे.

सियाचिनच्या उत्तरेला पाकिस्तान आक्युपाईड काश्मिरचा (पीओके) पूर्वपार हिस्सा असलेल्या शक्सगाम खोर्‍यात, चीनने ३६ किलोमीटर्स लांब रस्ता बांधुन त्यावर काही सैनिकी चौक्या स्थापन केल्या आहेत. इंटरनेटवर ही बातमी झळकताच,चीनकडून भारताला होऊ घातलेल्या नव्या सामरिक धोक्याची चर्चा सुरू झाली. या रस्त्यामुळेे सियाचेनसमोरच्या ‘लाइन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल’पर्यंत चीन सहजगत्या येऊ शकेल. त्यामुळे ‘वॉर ऑन टू फ्रंट पॉलिसी’ अंतर्गत ही लदाख क्षेत्रातील नवी चीनी घुसखोरीची चाल आहे हे सांगत, बातमीच्या प्रमाणीकरणासाठी ’गुगल अर्थ सॅटॅलाइट इमेजरी’चा संदर्भही देण्यात आला. मागील सहा महिन्यांपासून पूर्वेकडील डोकलाम आणि तुतिंग इलाक्यात केलेल्या उद्दाम घुसखोरीनंतर चीन आता पश्‍चिमेतील लडाखमध्ये दुसरी आघाडी उघडतो आहे का, असा सुरही या चर्चांमध्ये निघाला. याची खुलासेवजा मिमांसा.

तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती जनरल अयुब खानच्या चीन भेटीमध्ये पाकिस्तानने २० मार्च,१९६३ रोजी परराष्ट्र मंत्री मियां झुल्फिकार अली भुट्टो आणि चेन यी यांनी हस्ताक्षरीत केलेल्या फ्रंटियर सेटलमेंट प्लॅननुसार पीओकेमधील ट्रान्स काराकोरम ट्रॅक्टस् आणि गिलगिट बाल्टिस्तानचा ५८०० चौरस किलोमिटर्सचा भागही चीनला आंदण दिला. काराकोरम पर्वतराजीतील हिमनगांमधून निघून उत्तर दक्षिण प्रवाहाने यारकंड नदीला मिळणार्‍या केलेचिन ऊर्फ शक्सगाम नदीच्या दोन्ही बाजूंना ९९०० चौरस किलोमीटर्स उत्तरेला कुनलुन आणि दक्षिणेला काराकोरम पर्वतराजीने वेढलेले शक्सगाम/ऑपरांग खोरे (काराकोरम ट्रॅक्टस् ) आहे. सर फ्रांसिस यंगहजबंडने १८७०मध्ये या खोर्‍याचा शोध घेतला. परंपरेनुसार काराकोरम ट्रॅक्टस् जम्मू काश्मिरचा अभिन्न हिस्सा असल्यामुळे हा भूभाग चीनला देण्याच्या पाकिस्तानी अवैधानिक कराराचा भारताने सदैव प्रखर विरोध केला. आजमितीला चीन पाकिस्तान स्ट्रॅटॅजिक अलायंस या गोंडस नावाखाली गिलगिट बाल्टिस्तानच्या शक्सगाम, रस्कम आणि अघील खोर्‍यांचे अंदाजे २०,००० चौरस किलोमिटर्स क्षेत्र चीनच्या वस्तुत: ताब्यात आहे.

१९६३ मध्येच चीनने झिंगजियांगमधल्या काशघरला पीओकेमधील गिलगिट अबोटाबादशी जोडणारा भूस्खलनांनी सदैव ग्रासलेला काराकोरम हायवे बांधायला सुरुवात केली. काराकोरम हायवे त्याच्या नावानुरूप काराकोरम खिंडीऐवजी उत्तरेला असलेल्या खुंजरेब खींडीमार्गे जातो. काराकोरम हायवेमुळे चीनमधील मुस्लीमबहुल शिंगजियांग आणि अक्साई चीन इलाक्यांना सामरिक सुरक्षा प्राप्त झाली आहे. आजमितीला चीनने काराकोरम हायवेला गिलगिट बाल्टितानमधल्या १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या २०० किलोमीटर्स लांब बोगद्याच्या माध्यमातून युरोपकडे जाणारा सिल्क रूट आणि झिंगजियांग-पिओके- बलुचीस्तानमार्गे ग्वादार बंदराकडे जाणार्‍या ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या हमरस्त्याशी जोडले आहे. या हमरस्त्याच्या दोन्ही बाजुंना २४ फूट व्यासाच्या खनिज तेल आणि गॅसच्या पाईप लाइन्स आणि फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. चीनी सामरिक तज्ञ, तंत्रज्ञ आणि सेनाधिकारी नेहमीच कठीण आणि असंभव पर्यायांचा विचार करत असल्यामुळे चीनने या प्रकल्पामध्ये ६५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यासाठी पाकिस्तानने हा भाग पीओकेच्या विरोधाला सैनिकी दडपशाहीने झुगारून चीनला ५० वर्षांच्या लीझवर दिला आहे.

काराकोरम हायवे बांधत असतानाच चीनंने या क्षेत्रात शक्सगाम खोर्‍यामधून जात गिलगिटला तिबेट झिंगजियांग हायवेवरील होतान मिलिटरी हेडक्वार्टर्सशी जोडणारा सबवे आणि स्कार्डू गिलगिट अक्साई चीनसबवेची निर्मिती केली. आता या दोन्ही सबवेंना जोडणारा नवा रस्ता चीन बांधतो आहे हे ‘गुगलअर्थ’ सॅटॅलाइट इमेजरीवरून दिसून येते. या कारवाईमुळे तिबेटमधून शक्सगाममार्गे पीओकेमध्ये येण्यासाठी चीनला सुलभ सामरिक हालचाली करता येतील, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. ‘‘पाकिस्तान सरळ युद्ध करून काश्मिर कधीच परत घेऊ शकणार नाही. काश्मिर मिळवण्यासाठी भारता विरुद्ध प्रच्छन्न युद्ध (प्रॉक्सी वॉर) छेडणे हा एकच पर्याय पाकिस्तानसमोर आहे’ असे शक्सगामचा ताबा घेतांना चीनी पंतप्रधान चाऊ एन लायनी पाकिस्तानला सांगितले होते अशी वंदता आहे.

शक्सगाम खोरे चीनी झिंगझियांग प्रांताच्या दक्षिणेला आणि सियाचेनच्या उत्तर पश्‍चिमेला आहे. चीन बांधत असलेला हा नवा रस्ता सियाचेनवर तैनात भारतीय सेनेसाठी धोकादायक नसला तरी या क्षेत्रातील मुक्त चीनी संचार चिथावणीखोर आहे. शक्सगाम खोरे हे भारतासाठी वादग्रस्त क्षेत्र असून, चायना पाकिस्तान बाऊंड्री ऍग्रीमेन्टच्या कलम ६ नुसार काश्मिर प्रश्‍न सुटल्यानंतरच या क्षेत्रातील सीमेची आखणी केली जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वाढता चीनी मानवी संचार चिथावणीखोर आहे असे म्हणता येईल, असे माजी उत्तरी कमांड चिप लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांचे मत आहे. जून-जुलै २०१७ च्या इमेजरीमधे हा रस्ता किंवा त्या वरील सैनिकी ठिकाणांचा मागमूसही दिसत नाही. या रस्त्याचे बांधकाम २०१७च्या मध्यात डोकलाम घटनेच्या सुमारास/वेळी सुरू झाले असावे असा अंदाज सप्टेंबर-ऑक्टोबर २०१७मधील गुगल अर्थ सॅटॅलाइट इमेजरीच्या मिमांसेनंतर करता येतो.

मागच्या काही महिन्यांमध्येे या क्षेत्रात चीनी पिपल्स लिबरेशन आर्मीच्या चायनीज बॉर्डर डिङ्गेन्स पर्सोनलद्वारे गस्त घालण्यात येत होती असेही आता इंटेलिजंस एजंसींच्या माहितीवरून उघड झाले आहे.

गुगल अर्थ सॅटॅलाइट इमेजरीनुसार, हा नवा रस्ता या क्षेत्रात वाहाणार्‍या शक्सगाम नदीच्या उत्तरेला त्याला समांतर बांधण्यात आला आहे. सध्यातरी हा कच्चा रस्ता आहे. याचे डांबरीकरण झालेले दिसत नाही. चीनच्या झिंगजियांग प्रांतातील रस्त्यांप्रमाणेच हा रस्ता देखील कॉम्प्रेसड् अर्थ टेक्निक वापरून बनवला आहे. या प्रणालीत ८-१० इंच खोदकाम करून त्यामध्येे गिट्टी टाकतात आणि नंतर त्यावर माती टाकून रोडरोलर फिरवून त्याचा दाबून एकजीव करतात. रस्ता पाहिजे त्या लेव्हलला येईपर्यंत ही कारवाई करावी लागते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा पुढील ऍस्फाल्टिंगचा पाया असतो. याऐवजी जर रस्त्याचे कॉंंक्रिटिंग करायचे असेल तर गिट्टीबरोबर सिमेंट व रेतीचे ओले मिश्रण टाकून ते सेट झाल्यावर त्यावर कॉंक्रिटिंग करतात. या क्षेत्रात शक्सगाम नदीमध्ये येऊन मिळणारे बरेच लहान-लहान नाले आहेत; मात्र त्यावर पुल बांधल्याचे किंवा तशी तयारी असल्याचे नव्या इमेजरीमध्ये दृष्टिपथास येत नाही.

शक्सगाम खोर्‍या बाहेरील दोन सैनिकी ठिकाणे, तेथून येणार्‍या कच्च्या रस्त्यांच्या माध्यमातून या नव्या निर्माणाधीन रस्त्याशी जोडण्यात आली आहेत. या सैनिकी ठिकाणांच्या चारही बाजूला नदीला डॉमिनेट करणारे खंदक खोदलेले दिसून येतात. ठिकांणांच्या मागे उत्तरेला बहुधा फायरिंग रेंज व ट्रेनिंग एरिया असावा असे वाटते. या दोनपैकी एक मुख्यालय असावे अस वाटते. कारण तेथे इमारतींचा बराच मोठा जमावडा दिसतो. याशिवाय शक्सगाम खोर्‍यात अजुन दोन सैनिकी चौक्या दिसून येतात. त्यापैकी एक पोस्टच्या चारही बाजुंना एकमेकांना समांतर असलेले, ८-१० ङ्गुटांचे सलग उंचवटे आणि नदीपर्यंत गेलेल दुहेरी काटेदार कुंपणदेखील स्पष्ट दिसते. ही पायदळ आणि रणगाड्यांच्या सहाय्यानी हल्ला करणार्‍या शत्रूला रोखण्यासाठी बनवलेली ऑबस्टॅकल्स आहेत. या सर्व चौक्यांवर मिळून अंदाजे १५-१८००० सैनिक राहू शकतील असा अंदाज आहे. सॅटेलाईट इमेजरीत दिसणार्‍या या पोस्टपैकी एक शक्सगाम खोर्‍याच्या उत्तर टोकावर आणि दुसरी त्याच्या २० किलोमिटर्स दक्षिणेला निर्माणाधीन रस्त्यावर आहे. दुसर्‍या पोस्टपासून जवळपास आठ किलोमिटर्स अंतरावर मोठी मोठी वाहने असल्यामुळे तेथे तिसर्‍या पोस्टची तयारी चालू आहे असा अंदाज करता येतो.

पीओकेमधील गिलगिट आणि शक्सगाम खोर्‍याला जोडणारा एकमेव मार्ग कुंजरेब खिंडीतून जातो. ४५ फुट रूंद असलेली, एकावेळी केवळ एकच ऊंट जाऊ शकणारी ही खिंड एका एकसंधी दगडाला कोरून बनवण्यात आली आहे. खिंडीच्या काळ्या कातळी सर्वोच्च बिंदूवरून मनावर दडपण आणणार्‍या भव्य काराकोरम पर्वतराजी, काराकोरम खींड आणि त्यावरील १८ ते ३० किलोमिटर्स रुंदीच्या इंसुकती आणि इतर आठ हिमनद्यांचे नेत्रदीपक दृष्य नजरेस पडते आणि समोर निसर्गसौंदर्यानी नटलेले शक्सगाम खोरे दृष्टीगोचर होते.

शक्सगामच्या पल्याड जगातील दुसर्‍या नंबरचे चोगोरी ऊर्फ केटू शिखर आकाशाकडे झेपावतांना दिसते. काराकोरम पर्वतांवरून येणारी अतीशीत हवा शक्सगामला बर्फाच्या ढिगार्‍यांमध्ये परावर्तित करते. शक्सगाम नदीमध्ये गशेरब्रुम आणि ब्रॉड पीक हिमनद्यांच्या वितळत्या बर्फाचे पाणी येते. उन्हाळ्याच्या गर्मीने बर्फ वितळून आलेल्या पाण्यामुळे असंख्य ओढ्यांच्या माध्यमातून शक्सगाम नदीला व्याप्त रुप प्राप्त होते. शक्सगाम खोरे दोन-अडीच किलोमिटर्स रूंद असून उन्हाळ्यात संपूर्ण खोरे पाण्याने भरून जाते आणि आवागमन ठप्प होते. हे टाळण्यासाठी चीनने या महत्वाकांक्षी रस्ताबांधणीची योजना बनवली असावी.

शक्सगाम आणि पीओके युद्धाच्या माध्यमातून परत घेण्याच्या भारतीय निर्णयाला चीन व पाकिस्तान दोघेही करडा प्रतिसाद देतील. पाकिस्तानमधील जिहादी आणि झिंगजियांगमधील ऊयघिर मुसलमानांमध्ये असलेला शक्सगामचा बफर झोन चीन कदापी सोडणार नाही. पीओकेमधील डेमलर भासा आणि बुंजी धरण, काराकोरम हायवे, सोस्ट ड्राय पोर्ट इत्यादींमधील आर्थिक गुंतवणुकीमुळे चीन ते क्षेत्र भारताच्या हाती पडू देणे अशक्य आहे. शक्सगाम खोर्‍यावर कब्जा केल्यानंतर पीओकेमधील गुंतवणुकीच्या रक्षणासाठी चीनने तेथे आपले सैनिक तैनात केले आहेत हे उघडगुपीत आहे. या भागात पिपल्स लिबरेशन आर्मीचे बळ वृद्धिंगत करण्यामागे सामग्री व्यापकता वृध्दिंगत करून आगामी युध्द नवीन, सुधारित तंत्रज्ञानाच्या बळावर लढण्याचा आणि वेळ पडल्यास भारताला सामरिक व राजकीय धडा शिकवण्याचा चीनी हेतू आहे यात शंकाच नाही.

देसपांग, लदाखमधील दौलत बेग ओल्डी गाव व विमानतळ शक्सगामच्या वाटेवरील काराकोरम आणि खुंजरेब खींडींपासून केवळ १५-१८ किलोमिटर्स अंतरावर असल्यामुळे सियाचेन हिमनग तसेच उत्तर व पूर्व लदाख वरील चीन व पाकिस्तानच्या एकत्र हल्ल्याच्या संभावित दृष्टीकोनातून बघता भारताच्या आक्रमणात्मक आणि संरक्षणात्मक कारवायांसाठी मोठे महत्वाचे ठिकाण आहे. सासेर ला (सासेर खींड) पल्याड असलेल्या श्यॉक आणि नुब्रा खोर्‍यांवर अक्साई चीनच्या उत्तर भागातून देसपांगद्वारे होणार चीनी आक्रमण आणि त्याच वेळी थॉयसे प्रतापूरमध्ये होणार्‍या पाकिस्तानी आक्रमणामुळे खारदुंगला खींडीच्या उत्तर व उत्तर पूर्वेला असलेल सियाचेन सामील संपूर्ण लदाख क्षेत्र धोक्यात येऊ शकते. याच्याच जोडीला शक्सगाममध्ये होऊ घातलेल्या अथवा होत असलेल्या चीनी जमावडयातील चीनी सेना नव्या रस्त्याच्या मार्गे काराकोरम हायवेवरून पीओकेमध्ये दाखल होऊन दक्षिण लदाखमध्ये प्रवेश करू शकते. भारताला अभिप्रेत असलेल्या ‘वॉर ऑन टू फ्रंट’चा हा आयाम केव्हाही प्रत्यक्षात येऊ शकतो. भारत देखील देसपांगच्या लॉंचिंग पॅडमधून काराकोरम खिंड, शक्सगाम आणि अक्साई चीनमार्गे झिंगजियांग व तिबेटमध्ये येऊ शकतो याची चीनला भीती वाटतेे. म्हणूनच तो शक्सगाममध्ये आपले सेनाबळ वृध्दिंगत करतो आहे. अंतत:,भारताला मध्य आशिया, युरेशिया आणि पामिर्समध्येे जाण्यासाठी आणि चीनला लदाखमध्ये येण्यासाठी शक्सगाम खोर्‍याशिवाय तरणोपाय नाही हेच सत्य आहे.