चित्रपश्चिमा ‘१५ पार्क अव्हेन्यू’

0
135
  •  यती लाड

स्कीजोफ्रेनिया या मानसिक आजारावर भाष्य करणार ‘१५ पार्क अव्हेन्यू’ हा भेदक चित्रपट. हा एक असा मानसिक आजार, जिथे रुग्ण वास्तविक जगापासून दुरावतो आणि स्वतःचे एक काल्पनिक जग निर्माण करतो. त्याची कहाणी म्हणजे हा चित्रपट

मानसिक आजारांवर आधारित भारतीय चित्रपटांनी मागील दहा-बारा वर्षांत अनेक प्रयोग केले. खास करून बॉलिवूडने! एखाद्या विशिष्ट मानसिक आजारावर बेतलेल्या कथांवर असे चित्रपट निर्माण झाले. क्रेझी ४, अनजाना अनजानी, डिअर जिंदगी, भूलभुलैया हे असेच मानसिक आजारांवर प्रकाश टाकणारे काही चित्रपट. मात्र मूळ विषयापासून हे चित्रपट भरकटल्याने ते केवळ मनोरंजनाचा भाग बनून राहिले.
२००५ मध्ये मात्र अपर्णा सेन यांनी ‘१५ पार्क अव्हेन्यू’ या चित्रपटाच्या माध्यमातून मानसिक आजाराशी झुंज देणार्‍या रुग्णाचे भयावह आणि मन अस्वस्थ करणारे सत्य मोठ्या पडद्यावर आणले. स्कीजोफ्रेनिया या मानसिक आजारावर भाष्य करणार हा भेदक चित्रपट. हा एक असा मानसिक आजार, जिथे रुग्ण वास्तविक जगापासून दुरावतो आणि स्वतःचे एक काल्पनिक जग निर्माण करतो.

यातील प्रमुख भूमिका कोंकणा सेन आणि शबाना आझमी यांची. मिती ही भूमिका साकारणारी कोंकणा हिला आधीपासून स्किझोफ्रेनियाचा आजार असतो. मात्र या आजाराची तीव्रता तिच्या आयुष्यात ओढवलेल्या भयावह परिस्थितीमुळे अधिकच वाढत जाते. पत्रकार म्हणून एका बातमीसाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार होतो. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याऐवजी ती अधिकच खचत जाते. तिचा प्रियकर जयदीप (राहुल बोस) ती या परिस्थितीतून बाहेर येत नसल्याचे पाहून तिला सोडून जातो.

दुसरीकडे प्रोफेसर अंजली (शबाना आजमी) मितीची मोठी बहीण ही आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या कठीण परिस्थितीचा सामना करीत असते. वयोवृद्ध आई (वहिदा रेहमान)ची आणि मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या बहिणीची जबाबदारी आणि लग्नानंतर घटस्फोट घेतल्याने अंजलीही अस्वस्थ आहे. या सगळ्याचा सामना ती कशी करते, तिची ही मानसिक अवस्था कशी खचते हे अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून अधोरेखित केले आहे, पण स्त्री म्हणून तिने ही परिस्थिती अधिक समर्थपणे मोठया पडद्यावर आणली आहे.
चित्रपटाची कथा पुढे जाताना १० वर्षांनंतर जयदीप आणि या दोघा बहिणींची पुन्हा भेट होते. जयदीपचे लग्न होऊन त्याला दोन मुले असतात, पण या ठिकाणी मिती जयदीपला ओळखत नाही. ती आपल्या काल्पनिक जगातच रमलेली असते. तिला कोणत्याही परिस्थितीत १५, पार्क अव्हेन्यू या ठिकाणी जायचे असते.

जयदीपला मितीचा आजार अशा टोकावर येणार याची अजिबात कल्पना नसते. त्यामुळे तिला केवळ मदत करण्यासाठी आणि ती उल्लेख करत असलेल्या १५, पार्क अव्हेन्यू या ठिकाणी नेण्यासाठी पुन्हा जयदीपचा चित्रपटात प्रवेश होतो. १५, पार्क अव्हेन्यू ही जागा अस्तित्वात नाही याची सर्वांना जाणीव असते, पण मिती सांगत असलेल्या ठिकाणी तिला नेऊन ती जागा म्हणजे निव्वळ तिच्या मनातील भ्रम आहे ही समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

१५, पार्क अव्हेन्यू हे प्रत्यक्षात मिती हिचे एक काल्पनिक जग असते. जिथे तिचे एक सुंदर घर असते आणि याच घराचे नाव पार्क अव्हेन्यू असते, जिथे तिला वाईट प्रसंगी सोडून गेलेला तिचा प्रियकर त्या काल्पनिक जगात तिचा नवरा असतो आणि तिला ५ मुले असतात आणि सुखी असा तिचा संसार असतो. पार्क अव्हेन्यूचा शोध घेता घेता मितीला तिचे ते काल्पनिक जग सापडते. पण तिला त्या काल्पनिक जगातून बाहेर काढण्यासाठी आलेल्यांसाठी मात्र ती कायमची हरवून जाते!
चित्रपटाचा शेवट हा अगदी अस्वस्थ करणारा आहे. मितीचे पुढे काय होते, ती कुठे गायब होते? याचं उत्तर मात्र मिळत नाही. काल्पनिक आणि वास्तववादी जगाची बाजू रुग्णाच्या आणि त्याच्यासोबत असणार्‍या त्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आलेली आहे. कुटुंबातील एक व्यक्ती मनोरुग्ण असल्यास संपूर्ण कुटुंबाची कशी त्यापायी फरफट होते, हेही या चित्रपटात दाखवले गेले आहे. अशा या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता याचं नवल नाही!