चित्रपट निर्मात्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना

0
200

>> इफ्फी उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा

भारतात कुठेही चित्रिकरण करू इच्छिणार्‍या देश-विदेशांतील चित्रपट निर्मात्यांना त्यासाठीचा परवाना मिळवण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात सांगितले. गोव्यासह लेह, लडाख, अंदमान व निकोबार द्विपसमूहासह देशभरात कित्येक ठिकाणी चित्रिकरणासाठीची रम्य अशी स्थळे असल्याचे ते म्हणाले. सोहळ्याचे उद्घाटन अमिताभ बच्चन, रजनीकांत व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने झाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी गोवा हे चित्रिकरणासाठीचे एक लोकप्रिय स्थळ बनवण्यासाठी सरकार पावले उचलणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधांत वाढ व सुधारणा घडवून आणणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नांमुळेच इफ्फी गोव्यात आला व नंतर गोवा हेच इफ्फीसाठीचे कायम स्थळ बनल्याचे सावंत म्हणाले. ‘फुटबॉल’, ‘फूड’ (अन्न) व फिल्म हे गोमंतकीयांचे आवडीचे विषय असल्याचेही सावंत यांनी यावेळी नमूद केले. इफ्फीसाठी आलेल्या प्रतिनिधींना देश-विदेशांतील उत्कृष्ट अशा चित्रपटांचा आस्वाद घेता येणार असून या काळात गोमंतकीय संस्कृतीचेही त्यांना दर्शन घडू शकणार असल्याचे ते म्हणाले.

भारतीयांचे जीवन भारतीय
चित्रपटांमुळे समृद्ध
प्रकाश जावडेकर यांनी यावेळी पुढे बोलताना भारतीय चित्रपटांनी भारतीयांचे जीवन समृद्ध बनवले असल्याचे मत व्यक्त केले. दरवर्षी भारतात वेगवेगळ्या सुमारे २० भाषांतून मिळून २ हजार चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे ते म्हणाले. चीनसह अन्य विविध देशांतही आता भारतीय चित्रपट लोकप्रिय होऊ लागलेले असून मोठया आवडीने पाहिले जात असल्याचे जावडेकर यांनी यावेळी नमूद केले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे हे यावेळी म्हणाले की इफ्फीची उत्तरोत्तर प्रगती होत गेलेली आहे. १९५२ साली देशात जेव्हा पहिला इफ्फी झाला होता तेव्हा त्यात अवघ्या २६ देशांनी भाग घेतला होता. आता ही संख्या १०० वर पोचली असल्याचे ते म्हणाले. भारतात सध्या दरवर्षी २ हजार चित्रपटांची निर्मिती होत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. नव्या तंत्रज्ञानामुळे आता लघुपट व शॉर्ट फिम्स यांनाही चांगले दिवस आले असल्याचे ते म्हणाले.

अमिताभचाही सन्मान
महानायक अमिताभ बच्चन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बच्चन यांनी आपण आज जो काही आहे तो आपल्या माता-पित्याच्या पुण्याईमुळे. तसेच आपल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक व करोडो चाहते यांच्यामुळेच असे उद्गार काढले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागातील चित्रपटांसाठीच्या ज्युरी सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी व एन्. चंद्रा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन् व संगीतकार लुई बँक्स यांचा संगीताचा एक शानदार कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. शंकर महादेवन् यांचे गायन व लुई बँक्स व साथीदारांचे संगीत यांनी यावेळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. यावेळी भारतीय व पाश्‍चात्य संगाताचे फ्युजन सादर करण्यात आले. महादेवन् यांनी यावेळी आपल्या ‘ब्रेथलेस’ गाण्यांबरोबरच वैष्णव जन ते… व मिले सूर मेरा तुम्हारा… हे गाणेही सादर करून वाहव्वा मिळविली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोव्याच्या युवा गायिका अक्षता बांदेकर यांनी सरस्वती स्तवन सादर केले.

इसाबेल हुपर्ट यांना
जीवन गौरव पुरस्कार
ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री इसाबेल हुपर्ट यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुरस्काराच्या रूपात त्यांना १० लाख रु.चा धनादेश देण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना इसाबेल हुपर्ट यांनी जीवन गौरव पुरस्कार देऊन आपला सन्मान केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले.

रजनीकांत यांचा गौरव
दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचा यावेळी आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबली या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना १० लाख रु.चा धनादेश देण्यात आला. यावेळी रजनीकांत यांनी आपण हा पुरस्कार आपले दिग्दर्शक, निर्माते व करोडो चाहते यांना समर्पित करीत असल्याचे उद्गार काढले.