चित्रगंगा

0
223

यंदाच्या अठ्ठेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजे ‘इफ्फी’चा पडदा काल पडला. सन २००४ पासून ‘इफ्फी’चे आयोजन गोव्यात होत आहे, म्हणजे गेल्या चौदा वर्षांचा आयोजनाचा भरपूर अनुभव गोव्याला आहे, परंतु या अनुभवातून आयोजक काही शिकल्याचे आणि परिपक्व झाल्याचे अजूनही दिसून येत नाही. गोवा मनोरंजन संस्थेचा गलथान, भोंगळ कारभार या वर्षी दिसून आला. महोत्सवाची साधी निमंत्रणे ज्यांना व्यवस्थित पाठवता येत नाहीत, त्यांची अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्याची आपली पात्रता आहे का हे एकदा तपासावेच. ईएसजीची जबाबदारी स्थानिक आयोजन एवढीच आहे. बाकी महोत्सवाच्या प्रक्रियेमध्ये लुडबूड करण्याचा त्यांना अधिकार नाही आणि तो नसावा. त्यामुळे आम्हाला फारसे अधिकार नाहीत असा गळा काढणे योग्य नव्हे. भारताचा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च महोत्सव आहे, त्यामुळे त्याचे आयोजनही त्याच गुणवत्तेचे असायला हवे ही अपेक्षा गैर ठरू नये. परंतु अशा प्रकारचे भोंगळ आयोजन, गैरसोय सोसूनही हजारो चित्रपटप्रेमी रसिक या महोत्सवाला हजेरी लावतात. त्यामध्ये गळ्यात प्रतिनिधी कार्डे लटकावून फिरणार्‍या हौशा गवशांची आणि राजकारण्यांच्या कृपेने पास पटकावून मिरवणार्‍या नवश्यांची गर्दीही आलीच, परंतु अवघा माहौल या आठ दिवसांत चित्रपटमय होऊन जातो हे खरे. एक वेगळे वातावरण राजधानी पणजीत यानिमित्ताने निर्माण झालेले असते. या महोत्सवातून विविध देशांच्या चित्रपटसंस्कृतीची ओळख आस्वादकांना घडावी आणि त्यातून मानवतेची समान सूत्रे शोधली जावीत हे या महोत्सवाचे उद्दिष्ट मानले जाते. म्हणूनच तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे त्याचे ब्रीदवाक्य आहे. जाणकारांच्या परीक्षक मंडळाने निवडलेले उत्तमोत्तम चित्रपट तेवढ्याच जाणकार रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव भरवायचे असतात. आम आदमीसाठीची ती गावजत्रा नव्हे. ‘इफ्फी’ गोव्यात आल्यापासून मात्र त्याला तसे ‘लोकप्रिय’ स्वरूप देण्यात आले आहे आणि त्याचे प्रतिबिंब उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी बोलावण्याच्या सोसात स्पष्ट पडत असते. आम जनतेसाठी स्वतंत्रपणे कार्यक्रम जरूर व्हावेत आणि तेथे एरवी पाहायला न मिळणार्‍या सेलिब्रिटीही याव्यात, परंतु महोत्सवाच्या एकूण गांभीर्याला गालबोल लागू नये. जगाच्या कानाकोपर्‍यांत होणार्‍या अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांना जी उंची असते ती ‘इफ्फी’ ने गाठायला हवी. बॉलिवूडपलीकडे फार मोठी चित्रपटसृष्टी या देशात आहे. त्यांचे प्रतिनिधित्वही या महोत्सवामध्ये असायला हवे. नाही म्हणायला या वर्षी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीची दमदार छाया या महोत्सवावर दिसून आली. मराठी चित्रपट आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी आज समृद्ध झालेला आहे आणि देश-विदेशात आपली छाप उमटवू लागलेला आहे. त्यामुळे ‘इफ्फी’ मध्ये त्याची दखल घेणे भाग पडले आहे. यंदाच्या ‘इफ्फी’वर ‘न्यूड’ आणि ‘एस. दुर्गा’ च्या वादाचा झाकोळ राहिला. परीक्षक मंडळाने निवडलेल्या चित्रपटांमधील दोन चित्रपट माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून परस्पर वगळण्याचा अजब प्रकार प्रथमच घडला. अशा विपरीत वादांमुळे ‘इफ्फी’ चर्चेत राहणे श्रेयस्कर नाही. यापूर्वी हा महोत्सव अन्यत्र हलविण्याचे जोरदार प्रयत्न होत असत. शेवटी राजकीय ताकदीच्या बळावर गोव्याने हे महोत्सवाचे कायमस्वरूपी स्थळ बनविण्यात यश मिळवले. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले आणि बर्‍याच वर्षांपूर्वी घोषणा झालेले भव्य परिषदगृह अजून प्रत्यक्षात आलेले नाही. आता तरी त्याचे काम वेग घेईल अशी अपेक्षा आहे. ‘इफ्फीत सोयीसुविधा अपुर्‍या असतात आणि आम्हाला भागवून घ्यावे लागते’ अशी तक्रार यापूर्वी केंद्रीय माहिती व प्रसारण सचिवांनी केली होती. एकदा तर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कांपालमधील तात्पुरत्या हँगरमध्ये घेण्याची पाळी ओढवली होती. लुसोफोनिया स्पर्धांच्या निमित्ताने श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम उभे राहिले आणि निदान काही वर्षांसाठी तरी हा प्रश्न सुटला. आता ‘इफ्फी’ला त्याचे हक्काचे घर लाभावे यासाठी जोमदार प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे. ही स्वतंत्र महोत्सवनगरीच बनेल. गोव्याचे ते एक आकर्षणस्थळ बनले पाहिजे. गोव्यात चित्रनगरी उभारण्याच्या घोषणा आजवर वल्गनाच उरल्या आहेत. मध्यंतरी पणजी महापालिकेने तर येथे होणार्‍या चित्रीकरणांवरच गदा आणली होती. एकीकडे चित्रपट महोत्सव भरवीत असताना त्या महोत्सवापलीकडे चित्रपट संस्कृती रुजविण्यासाठी भरीव प्रयत्न गरजेचे आहेत. त्या दिशेने अजूनही आपण मागे आहोत. ‘इफ्फी’चा भार आता ओसरला, परंतु या निमित्ताने येथे अवतरलेली चित्रगंगा अशीच खळाळत वाहायला हवी. तीच ह्या महोत्सवाची उपलब्धी ठरेल.