चित्तवृत्ती आणि आपलं मन

0
1126
  •  पंकज अरविंद सायनेकर

चित्रपटात जशी दृश्ये दिसतात- आनंदी, भयानक, करुण, दुःखी, जोशपूर्ण, इत्यादी तेव्हा त्या भावनांमध्ये आम्ही एकरूप होऊन जातो. आम्हाला पूर्णपणे जाणीव असते की जे समोर चालू आहे ते केवळ कल्पनाचित्र आहे आणि आम्ही निव्वळ प्रेक्षक आहोत. तरीसुद्धा आम्ही त्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतो.

आम्ही पातंजल योगपद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करूया आणि चित्तवृत्तींचा निरोध करूया असे आपण मागील लेखात म्हटले आहे. काय आहेत या चित्तवृत्ती? मनाला त्यांच्यापासून कसे आवरायचे… ते आपण आज पाहू. जेव्हा चित्तवृत्ती आपल्या मनावर ताबा मिळवतात त्यावेळी आमचे मन शांत असूच शकत नाही. ह्या वृत्ती नेमके काय करतात?

… विचार करा, आपण एखादा चित्रपट पाहत आहोत आणि त्या चित्रपटातील पात्र (हिरो) एक यशस्वी व्यक्तिमत्त्व आहे. एका मोठ्या कंपनीचा मालक, रोज एका आलिशान गाडीतून आपल्या ऑफिसात जातोय. संध्याकाळी आपल्या बंगल्यात येतोय असे दृश्य दिसते. आता, या क्षणी जरी आम्ही निव्वळ प्रेक्षक असलो तरीही आपले मन (सबकॉन्शियस माईंड) स्वतःला त्या व्यक्तिरेखेत बघते. त्याचप्रमाणे, जेव्हा चित्तवृत्तीचे शमन झालेले नसते तेव्हा आपले चित्त (मनस) त्या वृत्तीप्रमाणे वागू लागते, त्या वृत्तीचे रूप घेते. उदा. जसे पाणी कोणत्याही भांड्यात ओतले की त्या भांड्याचा आकार घेते त्याप्रमाणे. चित्रपटात जशी दृश्ये दिसतात- आनंदी, भयानक, करुण, दुःखी, जोशपूर्ण… इत्यादी भावनांमध्ये आम्ही एकरूप होऊन जातो. आम्हाला पूर्णपणे जाणीव असते की जे समोर चालू आहे ते केवळ कल्पनाचित्र आहे आणि आम्ही निव्वळ प्रेक्षक आहोत. तरीसुद्धा आम्ही त्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु पतंजलींनी सांगितलेल्या योगशास्त्रामध्ये (योगदर्शन) अशी वेगवेगळी तंत्रे आहेत की ज्यांचा अवलंब करून आम्ही आपले चित्त निरोधावस्थेत नेऊ शकू.

वृत्तयः पंचतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः| (यो.द. १.५)

यामध्ये महर्षी सांगतात, की वृत्तीचे मुख्य पाच प्रकार आहेत आणि प्रत्येक वृत्ती दोन प्रकारची असू शकते, क्लिष्ट आणि अक्लिष्ट (क्लेशकारक आणि अक्लेशकारक म्हणजेच पेनफुल आणि पेनलेस ). आता आम्ही म्हणू शकतो की, एकूण चित्तवृत्ती दहा प्रकारच्या असतात. त्यातील पाच त्रास/दुःख देणार्‍या आणि बाकी पाच त्रास न देणार्‍या. आपण एक सुंदर फूल पाहिले. आता आपण त्याच्याबद्दल विचार करू लागतो. त्याच्या पाकळ्या कशा आहेत, त्यांचा सुगंध कसा असेल? इत्यादी. ही झाली अक्लिष्ट चित्तवृत्ती.

त्याप्रमाणे, रस्त्याच्या कडेला एक मांजरीचे पिल्लू तडफडताना दिसते, तेव्हा आपले चित्त त्याबद्दल विचार करू लागते. ही घटना त्रासदायक आहे- ज्याला क्लिष्ट चित्तवृत्ती म्हणतात. इथे वृत्ती सारखीच आहे, पण आपला त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला म्हणून ती क्लिष्ट किंवा अक्लिष्ट चित्तवृत्ती झाली. मनाची वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होण्याची क्षमता चित्तवृत्तीमध्ये असते. संगीत ऐकणे, प्रवास करणे, एखाद्या प्रती मित्रत्वाचा/शत्रुत्वाचा भाव असणे ही सर्व चित्तवृत्तीची उदाहरणे आहेत. पृथ्वी, हे जग, ही सबंध सृष्टी, ब्रम्हांड हे सर्व कदाचित खोटे असेलही, आपण जसा विचार करू त्याप्रमाणे त्याचा उलगडा होईल. अभिनेता जसे वेगवेगळ्या भूमिका साकारतो- चोर, डॉक्टर, व्यावसायिक इ. त्याचप्रमाणे चित्त एकच आहे आणि वेगवेगळी रूपे धारण करते.
काय आहेत त्या वृत्ती? त्यांचा आपल्या चित्तावर आणि ज्ञानेंद्रियांवर काय परिणाम होतात ते येणार्‍या काळात पाहू.