चिखलीत अमोनिया गळतीमुळे सुरक्षिततेसाठी लोकांची तारांबळ

0
190

>> शुक्रवारी पहाटे अमोनियावाहू टँकर कलंडला

मुरगाव बंदरातून झुआरीनगर येथील खत प्रकल्पाला सुमारे १५ हजार लिटर ‘अमोनिया’ साठा घेऊन जाणारा टँकर काल पहाटे २.४५ च्या सुमारास चिखली येथील दाबोळी विमानतळ महामार्गावर उलटून ‘अमोनियाची’ गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने एकच घबराट उडाली. या महामार्गाच्या जवळपास राहणार्‍या लोकांना या अमोनिया वायू गळतीचा त्रास होऊ लागल्याने लोकांनी तातडीने तोंडाला कपडे गुंडाळून घरातून सुरक्षित स्थळी आश्रयासाठी धाव घेतली. दाबोळी विमानतळावरून अर्धा किलोमीटर दूर सदर घटना घडली.
आपत्कालीन सेवेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळावर धाव घेऊन सुमारे ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले.

शुक्रवारी पहाटे बंदरातून अमोनिया वायूचा साठा भरल्यानंतर झुआरीनगर येथे खत प्रकल्पात जात असलेला झुआरी कंपनीचा टँकर (जीए ०६ टी २८६४) चिखली महामार्गावर उलटला. या टँकरच्या चालकाने (दादा चौधरी, २६) तेथून पळ काढला. सदर टँकर आडवा झाल्याने यातील अमोनिया गळती होऊन ती रस्त्यात पसरू लागली व सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले व अमोनिया गळतीचे प्रदूषण सर्वत्र होऊन येथील महामार्गाच्या जवळपास राहणार्‍या लोकांना याचा त्रास होऊ लागला. लोकांना काय होत आहे हे कळेनासे झाले. याची माहिती वास्को पोलीस तसेच अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत अमोनिया वायू गळती मोठ्या प्रमाणात चालू होती.

भयभयीत लोकांची
सुरक्षेसाठी धावपळ
पोलिसांनी व आपत्कालीन व्यवस्थापनाने येथील लोकांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे भयभीत झालेल्या लोकांनी तातडीने घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रयासाठी धाव घेतली. काही लोकांना श्‍वासोच्छासावाचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून प्रथमोपचारासाठी हलविण्यात आले. यात काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. डॉक्टरांना घटनास्थळावर पाचारण करून येथील काही लोकांवर उपचार केले.

शाळांना दिली सुट्टी
सदर घटनेमुळे चिखली ते दाबोळी महामार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी मध्यरात्री ते सकाळी १२ पर्यंत बंद ठेवण्यात आला. दरम्यान, या महामार्गावर अमोनिया वायू गळती झाल्याने सर्वत्र हवेत प्रदूषण झाले होते. त्यामुळे अनेकांना त्रास झाला. येथील परिस्थितीचा आढावा घेऊन अतिरिक्त उपजिल्हाधिकारी फर्नांडिस यांनी या भागातील विद्यामंदिर स्कूल, रजिना मुंडी, नेव्हल चिल्ड्रन स्कूल व वाडे येथील मदर ऑफ मर्सिस या शाळांना सुट्टी जाहीर केली. अमोनिया वायू गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी वीसहून अधिक पाण्याचे टँकर उपयोगात आणले गेले. तसेच १०८ रुग्णवाहिका, एमपीटी कंपनीची रुग्णवाहिका डॉक्टर घटनास्थळी उपस्थित होते.