चाहूल गणेशाची…

0
252

– डॉ. अनुजा जोशी

इथे तर मायमाती नुसतं कौतुक कौतुक करतेय रानाचं. आणि रानही आपल्या ङ्गुलाङ्गळांनी ‘मातीच्या मूर्ती’चा उत्सव साजरा करतंय. ‘चवथ’ जवळ आली म्हणून झाडापेडांची लगबग चाललेली दिसतेय. झुडुपं-वेली घाईने कामाला लागल्यात. गवत रंग बदलतंय. त्याच्यावर उत्साहाचे चतुर उडू लागलेत. चिखल, शेवाळ, गाळ, निसरड थोड्याशा उन्हानेही सुकू लागलीय. व्हाळ, नाले खळखळत भक्तीची गाणी गाऊ लागलेत. मातीमायेचा आणि तिच्या पूताचा- गौरी गणपतीचा हा सण रानाच्या तनामनात साजरा होऊ लागलाय.

श्रावणाचं हळदुवं ऊन पावसाच्या अंगावर पडतं आणि रंगीबेरंगी सण घराघरांत आपली आरास सजवू लागतात.
नागपंचमीलाच पहिली खमंग सलामी मिळते. हळदीच्या खोल्यात गुंडाळलेल्या पातोळ्यांचा वास सगळीभर घमघमतो आणि तेव्हापासूनच खरं तर घरादाराला चतुर्थीचे वेध लागतात…
अळंब्यांच्या रोसाची, आकूर-कोंबांची आणि तेरं-टायकिळ्याच्या भाजीची नवलाई ओसरते. श्रावणातले सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार- खरं तर सगळेच वार केळी, ऍप्पल्, मुगाचा ङ्गळार नि डाळ-भात खाऊन कंटाळतात. देवळांतून नारळ-नाण्यांच्या नि ङ्गुला-ङ्गळांच्या राशी पडतात. रस्त्याकडेला दोडकी, काकडी, चिबडांचे ढीग पडतात. उपासतापास, भजनं, कीर्तन,ं जागरणं, ऊन-पावसात ङ्गिरणं आणि सर्दी-ताप-खोकल्याची आजारपणं या सगळ्यातून वाट काढत आषाढ-श्रावण आता भाद्रपदाची वाट चालू लागतात.
रक्षाबंधनाच्या राख्या गोकुळाष्टमीपर्यंत दुकानांच्या काचांमधून चकचक करत राहतात. उरल्यासुरल्या बिचार्‍या निमूट आत जातात आणि चतुर्थीच्या मखरं- ङ्गोली- सिरीयलींच्या चमचमाटाला जागा करून देतात. नाचणारे गोविंदा जीवाचं ‘गोकुळ’ करून झाल्यावर चतुर्थीतल्या देखाव्यांच्या सामानाची जमवाजमव करू लागतात. घरदारं रंगरंगोटी करून सजतात. गावागावांत, वाडीवाडीत वर्षभर जमवलेल्या ‘कोपर्‍या’ (अल्पबचती) ङ्गुटतात आणि पै-पै साठवलेले चार पैसे एकदम हातात आले की चवथीची खरी तयारी सुरू होते!
ढ्यँण् ढ्यँण् सीडी कॅसेटी, झकपक कपडालत्ता, तांब्या पितळेच्या समया, दिवे नि भांडीकुंडी, रग्गड खाणं-पिणं नि मिठाया, दिमाखदार इलेक्ट्रॉनिक वस्तू, चकमक डोळ्यांचं इलेक्ट्रीकल सामान आणि झुळझुळीत गाड्यांच्या ऑङ्गर्सनी बाजाराचा दर्या तुङ्गान ङ्गेसाळू लागतो.
सगळ्यात आधी नवीन लग्न करून दिलेल्या मुलीच्या घरी पाठवायच्या ‘ओझ्याची’ तयारी सुरू होते. भल्यामोठ्या नेवर्‍या, मोठाले लाडू, ङ्गराळ, ङ्गळं, माटवीची चौकट, लाकडी सामान, तांब्या-पितळेचं सग्गळं पूजेचं सामान, चौरंग, पाट, सोवळी-लुगडी असं भरभक्कम ‘वजं’ चतुर्थीपूर्वीच दिमाखात मुलीच्या सासरी पोचवायचं! अगदी ऋण काढून का होईना पण सण यथास्थित साजरा करायचा. यंदा देवाच्या पाया पडायला नवीन जोडपं येणार हा ओसंडणारा उत्साह आणि लेकीच्या सुखी संसाराची इच्छा मनात धरून तिच्या ‘पहिल्या चवथी’ची सगळी तयारी माहेराने करायची. खरं तर मुलीच्या बापाच्या डोक्यावर परंपरेने चढवलेलं ‘ओझंं’च ते! पण ते जबाबदारी होऊन आपसूक डोक्यावर चढतं की पिसासारखं हलकं होऊन जातं आणि लेकीला द्यायच्या ‘वज्या’ची हसतमुखाने व आनंदाने तयारी होऊ लागते. अशा साधक-बाधक प्रथा, परंपरा, रिती नवीनवी वाकवळणं घेत पुढे सरकत राहतात.
संस्कृतीची नदी जगण्याचा खळाळ पोटात घेत निर्मळ होऊन वाहात राहते…

नदी वाहते वाहते
काठावर सुख- दु:खे नांदतात
नदी वाहते वाहते
जगण्याचे सण-वार रंगतात…

एव्हाना सणाच्या तयारीला घरात आणि घराबाहेरही अगदी जोम चढला आहे. घरदारं निव्वळ झाडली गेलीत. परडं-परसू चकचकीत झालं. काजी बेणून झाल्या. गवत नडून झालं. कुसलेला पाला-पतेरा झाडांच्या मुळात पडला. माडांची खणणी झाली. वाकलेली चुडतंं नि भुंगे-बिंगे काढून माड साङ्ग झाले. मुळांवर शेण-सारं-सावूळ-माती ओढून झाली. हा भक्कम खुराक घेऊन तय्यार झालेल्या या ‘पहिलवान’ माडांची मुख्य ड्यूटी तर आता चवथीतच! सणाची किती जबाबदारी त्यांच्यावर… ‘तये’च्या उपासाला आडसरं हवी, गोड-धोड रांधपासाठी नारळांची रासच धबाधब ङ्गोडायला हवी, पूजापाठाला रसरशीत असोलं श्रीङ्गळ हवं आणि माटवीला बांधायला पाच नारळांचा भक्कम कातरा हवा! आता त्याबरोबरच पिकलेल्या केशरी चुटुक सुपार्‍यांचा भला मोठा घड हळू उतरवला की गणपतीच्या माटवीची मुख्य तयारी झाली म्हणायची.
आपला गणेश मातीचा आणि त्याच्या डोक्यावरची आरास रानाची. असा सगळा मातीचा नि रानाचा उत्सव. निसर्गाचाच एक महोत्सव!
हो, पण त्यासाठी जरा खिडकीबाहेर डोकावून बघायला हवं. आणखी थोडंसं पुढे… रानात जायला हवं… माटोळीची तयारी करायला हवी.

रान ङ्गुललं ङ्गुललं
श्रावणाचा भादव्याचा रंग रंग
त्याचं खुललं खुललं
गणेशाच्या चाहूलीने अंग अंग…

इथे तर मायमाती नुसतं कौतुक कौतुक करतेय रानाचं. आणि रानही आपल्या ङ्गुलाङ्गळांनी ‘मातीच्या मूर्ती’चा उत्सव साजरा करतंय. ‘चवथ’ जवळ आली म्हणून झाडापेडांची लगबग चाललेली दिसतेय. झुडुपं-वेली घाईने कामाला लागल्यात. गवत रंग बदलतंय. त्याच्यावर उत्साहाचे चतुर उडू लागलेत. चिखल, शेवाळ, गाळ, निसरड थोड्याशा उन्हानेही सुकू लागलीय. व्हाळ, नाले खळखळत भक्तीची गाणी गाऊ लागलेत. मातीमायेचा आणि तिच्या पूताचा- गौरी गणपतीचा हा सण रानाच्या तनामनात साजरा होऊ लागलाय.

तुरे माटुल्या कौंडळं
कांगलांचे ओठ बाई रंगले गं
घोस हलती डुलती
घागर्‍यांचे पाय रुणझुणले गं….

अस्ताव्यस्त पसरलेल्या माडती खास माटवीसाठी अंगाखांद्यावर गोल हिरव्या लोलकांच्या ‘माटुल्या’ घेऊन सजल्या आणि तेव्हाच खरी चतुर्थीच्या मंगल पावलांची चाहूल रानाला लागली. रान खूश झालं. वेगवेगळी ङ्गुलं, ङ्गळं तुरे, घोस, शेंगा घेऊन सजलं. अगदी कडुशार कौंडळांची एखादी वेलसुद्धा आपला बाकी काही उपयोग नाही तर माटवीसाठी लालचुटुक चेंडू अंगाखांद्यावर लटकवून तयार झाली. हिरव्या ‘कांगलां’चे नाजूक ओठ चवथीच्या उत्साहात लालसर होऊ लागलेत. त्यांचे लुकूलुकू केशरी डोळेही घोसात अधूनमधून दिसू लागलेत. ङ्गांदीङ्गांदीतून डोकावणार्‍या पिवळट केशरी ‘घागर्‍यांचे घोस’ तर कधीपासूनच ‘गणराज रंगी नाचतो’ची घुंगुरस्वप्नं बघतायत. कुड्याङ्गळांनी छोट्या छोट्या केशरी करंज्या करून बाप्पाच्या नैवेद्याचीही तयारी केली.
काळी काळी घोटींगं, लांब लांब खरशिंगं कामांवरून भराभर आपले लांब हात ङ्गिरवू लागलीत. बटणाच्या घोसांसारखा ‘दड्दडो’ उदंड उत्साहात नदीकाठी, व्हाळाकडेला घे म्हणून डवरून आलाय. गारकांडीच्या नि बाळ्याच्या (बाहवा) तलवारीसारख्या शेंगा मारामारीही करतायत काम करता करता. साळकांदो, उंबळ इतरांच्या कामात अधूनमधून लुडबूड करतायत. केशरी हिरव्या दाण्यांची कणसं असावीत तशा ‘हजारमूठी’ रानात लगबगीने वावरताना दिसतायत. ‘भिल्ला माड’ मात्र हा प्रपंच नको झाल्यासारखा साधूबुवा होऊन हिरव्या मण्यांच्या अगडबंब माळा गळ्यात घालून गणेशाच्या ध्यानस्थ भक्तीत रममाण झालाय.
त्या बघा आणखी कोण कोण सख्या रानात हसता-खिदळाहेत- सीतेचे केस, द्रौपदीची वेणी नि पिवळी पिवळी हरणाची ङ्गुलं आपापले वेणी गोंडे सांभाळत पदर बांधून काम करतायत. कावळ्याचे पोहे, हंसाचे पाय, वाघाची नखं कंबर कसून रान बेणू लागलीत. गोड तांबडी पटकुळणीची ङ्गळं अधूनमधून लपंडाव खेळतायत.

दूर्वा शंकर शेवंती
बघ माली आणि ङ्गुललेल्या जाया
माझ्या गौरीबाईसाठी
सोनचाङ्गा देतो अत्तराचा ङ्गाया

परडं- परसात वाढणार्‍या शालीन कुलीन जास्वंदी, चमेली, शेवंती नि लाल पिवळ्या शब्दुलीने गौरीमायेच्या वेणीवर आपली वेणी घालायची ठरवलीय. जुई जाया व मालींच्या केसरांनी तिच्यासाठी आपल्या कुपीतल्या अत्तराचे ङ्गाये तयार करून ठेवलेत.
सोनचाङ्गा, कवठी चाफ्याने तिच्यासाठी सगळा रस्ताच सुगंधाने शिंपून ठेवलाय. तेरडा, कण्हेर, शंकर आत्तापासूनच गुलाल कुंकवाची उधळण करू लागलेत.
सगळ्यांच्यात अगदी पुढे मालकिणीच्या तोर्‍यात वावरणार्‍या दूर्वा नि तुळशी हिरवीगार नक्षीची पैठणी नेसून भराभर कामं वाटत सुटल्यात. बेल, बोर, तगर, अनंत, कांचन व शमीची पत्री तबकात मांडली जायची वाट बघतायत.
रानातल्या, परसातल्या ङ्गळाङ्गुलांबरोबर भाटातले आंबाडे नि तोरींजनांचा आबाधुबीचा खेळही अधूनमधून रंगतो आहे. केळङ्गुलांच्या बोंड्या, लिंबं, म्हावळींगं, भेंडे, चिकू, पेरं, वेलावर लटकळलेली दोडगी, तवशी, चिबूड इतकंच नव्हे तर बाजारातून आणलेली डाळिंबं, सङ्गरचंद, मोसंबी माटवीला बांधून मखराच्याही डोक्यावर चढायची वाट बघतायत.

रान ङ्गुलते ङ्गळते
घरदार आनंदाने नाचू लागे
मन ङ्गुलते ङ्गळते
सण माझा जल्लोषात गाजू लागे

गणपतीच्या शाळेत सुरेख रंगरंगोटी केलेल्या, देखण्या गणेशमूर्त्या रांगेत बसून आता वाजत-गाजत बाहेर पडण्याची वाट बघतायत.
कधीपासून भिजवून ठेवलेली माती, पाणी मुरून मातीचं चिकट होणं, मग ते साच्यात बसणं, लिंपून घेणं, चिकटवणं, सांधणं, मधेच तडे-भेगा जाणं, मग त्या भेगा बुजवणं, कोरणं, कातणं, ओबडधोबड आकार काढून टाकणं, ढासळणं, कोसळणं आणि पुन्हा मूर्ती म्हणून घडून तयार होणं…. मूर्तीचं पुन्हा रंगकाम, गडद, ङ्गिके, भुरे, गोरे सुखदु:खाचे रंगच रंग. सोनेरी चकचकीत उदास रंग, रंग विटणं, रंग चढणं, रंगात येणं व रंगीबेरंगी उत्सवात रंगून जाणं- ही सगळीच या गजबजत्या दुनियेची चित्रशाळा! अशा मूर्तीच असतो आपण सगळे. कुणी गौरीमाय आपल्या रक्तामांसाने हा गोळा लिंपते. शिवासारखा बाप आपल्या छातीची ढाल करून या गोळ्याचं पालन, पोषण, राखण करतो आणि आपल्या भोवती वावरणार्‍या गणगोतांबरोबर आपला जगण्याचा सोहळा संपन्न होतो. आपलं आयुष्य क्षणभंगुर. चार दिवसांचा हा जगण्याचा सोहळा. हे पार्थिव शरीर, त्याचं विसर्जन अखेरीस पाण्यातच. म्हणून मातीची आपली ही मूर्ती घडणं- बिघडणं, मोडणं-जोडणं, रंगून जाणं आणि सजून जाणं हे ‘गणपतीच्या शाळे’सारखं आणि गणपतीच्या सणासारखं!

माती लिंपली लिंपली
गौरीमाये घडवली मूर्ती माझी
जीव भरलास त्यात
ओठी यावी गणराजा गाणी तुझी…

‘गणराज रंगी नाचतो….’च्या तालावर टाळ-झांजा-कासाळी वाजू लागतील. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची म्हणत ढोलकी- घुमटांचे कष्टकरी हात क्षणभर देवाच्या दारी विसावा घेतील. भजनाच्या प्रसादांचे उसळीचे द्रोणे ङ्गस्त होतील. पंचखाद्य, लाडू, मोदक, नेवर्‍यांची पोटं तृप्त होतील.
’तये’च्या उपवासाचं कंदमूळ आणि उंदीरकीची खीर बालगणपती ङ्गस्त करतील.

गणपती देवा करी तुझी सेवा
नवस करीन रे
देवा नवस करीन रे
गळ्यातला मणी ठेवी जन्मभरी
आणि काय मागीन रे
देवा आणि काय मागीन रे…

असा ङ्गुगड्या झिम्म्याचा ङ्गेर धरत, घरभर वावरलेली दमलेली पैंजणं उत्साहात न्हाऊन निघतील.
‘ओ माय ङ्ग्रेंड गणेशा’ म्हणत उमदी पावलं गणेशाला वाजत गाजत घरी आणतील…
ङ्गटाक्यांच्या आतषबाजीत, वाद्यांच्या गजरात गणराज केवळ मातीच्या मूर्तीतच नव्हे तर, आपल्या हृदयातही प्राणप्रतिष्ठित होईल. ऊर्जेने भरलेला तनामनाचा कण-कण आनंदाने गाऊ लागेल-

आला गणराज आला
जीवाचा हा होतो कसा मोती मोती
आता गणराज आला
आनंदाचे गाणे गाती नाती-गोती!

लागे चाहूल सणाची
दूर होते भय आणि क्लेश माझे
लागे चाहूल गणाची
दूर होते दु:ख आणि दैन्य माझे…..