चाहत्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी करू ः सर्जिओ

0
112

पणजी (क्री. प्र.)
गोव्यातील सामन्यात आपलेे खेळाडू चाहत्यांना गर्व वाटेल अशी कामगिरी करतील, असा विश्वास एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी काल बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा गोलांची बरसात करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा संघ बराच मजबूत असून संघासाठी गोल होणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मग तो कोणी केला हे महत्त्वाचे नाही, असे सांगून आपल्या खेळाच्या आक्रमक रचनेत कोणतेही बदल होणार नसल्याचे सर्जिओ यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी आम्ही आक्रमक खेळावर भर दिला होता. परंतु बचावपटूंकडून काही चुका झाल्या होत्या. परंतु त्यावर आम्ही काम केले आहे, असे सर्जिओ म्हणाले. कोरो चांगली कामगिरी करीत आहे. त्याने या मोसमातही चांगली सुरुवात करताना तीन गोल नोंदविले आहेत. त्याला आपल्याकडे ओढण्यासाठी बरेच संघ तयार होते. परंतु कोरोने यावर्षीही एफसी गोवा संघातर्फेच खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पहिल्या दोन सामन्यात आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला असल्याचे लोबेरो म्हणाले.
पहिल्या सामन्यात खेळाडूंकडून काहीशी निराशा झाली होती. परंतु त्यानंतर आपल्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे. गतविजेत्यांना आम्ही पराभूत केले आहे. आणि तीच शैली आम्ही पुढे चालू ठेवू असे त्यांनी सांगितले.
गोलरक्षक मोहम्मद नवाझकडून पहिल्या सामन्यात झालेल्या काही चुकांबद्दल बोलताना लोबेरा म्हणाले की, आमच्याकडे चांगले गोलरक्षक आहेत. परंतु गोलकीपर नवाझला या खेळाच्या पातळीवर अनुभव मिळणे अत्यावश्यक आहे. त्याला स्वत: ला सुधारण्यासाठी वेळ मिळायला हवात आणि या मोसमात तो त्याला मिळेल, असे त्यांनी सांगितले.
भारतीय खेळाडूंतही गोल करण्याची क्षमता आहे आणि त्यांनी ती सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. अंतिम अकरात आम्ही सहा भारतीय खेळाडूंना घेऊन खेळतोय आणि त्यांनी गोल करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे लोबेरा यांनी सांगितले.