चालू आर्थिक वर्षात म्हापशात रवींद्र भवनासाठी जागा ः पर्रीकर

0
64

म्हापसा येथे रवींद्र भवन उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षी जमीन निश्‍चित करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला कॉंग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी म्हापसा येथे रवींद्र भवन उभारण्याचा सरकारचा विचार आहे काय, असेल तर त्यासाठी सरकारने कुठे जमीन ताब्यात घेतली आहे, असा प्रश्‍न विचारला होता.

तत्पूर्वी, या प्रश्‍नाचे उत्तर देताना कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की म्हापसा रवींद्र भवनासाठी सरकार जागेच्या शोधात आहे. तुम्ही जमीन दाखवून द्या. आम्ही भवन उभारू, असा प्रस्तावही त्यांनी यावेळी हळर्णकर यांना दिला. आमदार हळर्णकर यांनी म्हापसा शहरासह संपूर्ण बार्देश तालुक्यात एकही रवींद्र भवन नसल्याचे सभागृहाच्या नजरेत आणून दिले. म्हापसा हे एकेकाळी नाटकांसाठीचे माहेरघर होते. आज सर्वत्र रवींद्र भवने आहेत. मात्र, म्हापशात ते नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने म्हापसा येथे रवींद्र भवन उभारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी सूचनाही हळर्णकर यांनी यावेळी केली. यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी चालू आर्थिक वर्षी जमीन निश्‍चित करण्याचे आश्‍वासन दिले.