चालुक्याची राजधानी : बदामी

0
1086

– सौ. पौर्णिमा केरकर

पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मनाला भुलविणार्‍या एकाहून एक सरस सुंदर पर्यटनस्थळांनी नटलेले राज्य म्हणजे कर्नाटक. या राज्यातील सौंदर्यस्थळे टिपण्यासाठी आयुष्यही अपुरे पडेल. म्हैसूरसारखी कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी असो, नाहीतर औद्योगिकीकरणात अग्रेसर असूनही नेटकेपणा, नैसर्गिक अधिष्ठान लाभलेली बेंगलोरसारखी राज्याची राजधानी असो- कुठल्याही ऋतूत अगदी सहजपणे ज्या जागेवर वर्षभर पर्यटनासाठी जावे ती जागा म्हणजे अर्थातच कर्नाटकच!
या भूमीला सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक संचिताची फार मोठी श्रीमंती लाभलेली आहे. येथील थंड हवेची ठिकाणे जशी गात्रांना श्रान्त करतात, त्याच तर्‍हेने येथील उष्ण, रुक्ष असलेला भागही पर्यटकांना सातत्याने खुणावत असतो. विजापूर, बदामी, ऐहोळे, पटद्दकल, हंपी ही ठिकाणे तर आपल्याला गतइतिहासाची भ्रमंती करून आणणारी, वास्तुकलेच्या अनुपम आविष्काराचे दर्शन घडविणारी अशीच आहेत. यांतीलच चालुक्याची राजधानी असलेली ‘बदामी’ येथील बनशंकरीचे मंदिर आणि गुंफा, लेण्यातील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. बदामीची शिल्पसमृद्धी अनुभवण्याचा क्षण हा माझ्यासाठी अविस्मरणीयच होता. त्यासाठी बेळगाव ते बागलकोट व त्यानंतर बदामी यादरम्यानच्या प्रवासात कितीतरी बारीक-मोठी गावे लागली. वास्तुकलेची उत्तुंगता लाभलेल्या प्रदेशातील बकाल- अस्ताव्यस्त पसरलेली लोकवस्ती, हैराण करून सोडणारी उष्णता, वातावरणात भरून राहिलेला धुरळा या सर्वांवर मात करीत ‘बदामी’ रंगाच्या शिल्पकलेला पाहण्यासाठी मन आतुरले होते.
बदामीला चालुक्य राजवटीत ‘वातापी’ असे संबोधले जायचे. त्यामागील आख्यायिकाही मोठ्या रंजकतेने आजही सांगितली जाते. वातापी आणि इल्वाल नावाच्या दोन राक्षसांचा येथे निवास होता. दोघेही आळशी. त्यामुळे त्यांना बाहेर जाऊन भोजन शोधण्याचा नेहमीच कंटाळा यायचा. त्यांनी त्यासाठी स्वतःचे डोके लढवले. दरवेळी एखाद्या अतिथीला ते आपल्या घरी भोजनाला बोलवायचे. मायावी विद्येचा उपयोग करून वातापी स्वतःच्या देहाचे भोजन बनवायचा व अतिथीच्या पोटात शिरायचा. अतिथी मेल्यानंतर तो स्वतः बाहेर यायचा. असेच काही दिवस ढकलल्यानंतर एक दिवस त्यांच्या जाळ्यात अगस्ती ऋषी सापडले. वातापी भोजनाच्या रूपाने त्यांच्या पोटात शिरल्यानंतर मात्र बाहेर पडू शकला नाही. अगस्तीचे तेजोवलयच मुळी एवढे प्रखर होते की त्यांच्यासमोर यांच्या चमत्काराची मात्रा शून्य ठरली. या वेळेपासून म्हणे या प्रदेशाला ‘वातापी’ असे नाव पडले. असंख्य कथा-दंतकथांनी या भूमीविषयीची ओढ अधिकच तीव्र होत जाते. या पौराणिक कथेचा आधार घेऊनच बदामी शिल्पकलेच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेले सरोवर ‘अगस्ती तीर्थ’ म्हणून नावारूपास आले आहे. अतिशय आकर्षक आणि रमणीय अशा तर्‍हेचे हे तीर्थस्थळ पर्यटकांना मुक्तपणे विहार करण्यासाठी खुले केले गेले असल्याने तेथील नैसर्गिक जलस्रोताला बाधा पोहोचताना दिसते. बदामीच्या गुंफांच्या इतिहासाच्या सांस्कृतिक वारशाचा वेध घेऊन नंतर या महासरोवराचे दर्शन जेव्हा घेतले जाते तेव्हा या समृद्धीचा उपयोग फक्त आपण मौजमजेसाठीच, चारदोन घटकांचे मनोरंजन करण्यासाठीच करायचा का? की त्याही पुढे जाऊन इतिहासाच्या गर्भकुडीतील या अनोख्या लावण्याचा उपयोग आपले ज्ञानचक्षू विस्तारण्यासाठी करायचा, हा प्रश्‍न मनाला सतावत राहतो.
कर्नाटकाच्या इतिहासात चालुक्य राजघराण्याला उज्ज्वल अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. चालुक्य हे कदंबाचे मांडलिक घराणे. या घराण्यात जन्मलेल्या पुलिकेशीने इ.स. ५४३ मध्ये चालुक्यांची सत्ता प्रस्थापित केली. त्याचा नातू दुसरा पुलिकेशी याने तर दक्षिण भारतावर आपले साम्राज्य निर्माण केले. चालुक्याने आपली राजधानी बदामी येथे स्थापन केली. कणकुंबी येथील रामेश्‍वर मंदिराच्या परिसरात जन्माला येणारी मलप्रभा बेळगाव जिल्ह्यातील बर्‍याच प्रांतांतून दरमजल करत बदामी येथे येते. कृष्णेची उपनदी असलेली मलप्रभा इतिहासपूर्व कालखंडात आदिमानवाशी संबंधित होती. बारमाही वाहणार्‍या याच नदीच्या काठावरती निसर्गसुंदर अशा परिसरात चालुक्याने आपली राजधानी विकसित केली. इथल्या डोंगरकपारीत आढळणार्‍या पाषाणाचा रंग बदामासारखा असल्याने राजधानी ‘बदामी’ या नावाने ओळखली जाऊ लागली. ५५० ते ७५० हा बदामी चालुक्याचा कालखंड. चालुक्य राज्यकर्त्यांनी येथे संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम असा किल्ला उभारला. सैनिकीव्यवस्था प्रस्थापित केली. त्यामुळे हा हा म्हणता बदामी महानगर म्हणून नावारूपास आले. चिनी प्रवासी ह्यूएनत्संगने प्रवासवर्णन लिहिले त्यात त्याने ‘बदामी हे सुप्रसिद्ध व सुंदर शहर आहे’ असा उल्लेख केला आहे. या उल्लेखावरूनच बदामीच्या सौंदर्याची जाणीव होते. मलप्रभेच्या काठावरती नावारूपास आलेले ‘बदामी’ हे भारतीय मंदिरशिल्पकलेचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत या देशात मंदिरकलेच्या उन्नयनाचे विविधांगी टप्पे दृष्टीस पडतात. बदामी हा असाच एक महत्त्वपूर्ण टप्पा होय.
चालुक्यांच्या राजवटीत सर्वधर्मसमभावाला मान्यता होती. याचसाठी शैव, वैष्णव, बुद्ध व जैन या सर्वांनाच आश्रय मोठ्या सन्मानाने इथे मिळाला. पर्वतरांगेत कोरलेली चार गुहालये हा इथला नैसर्गिक चमत्कारच मानावा लागेल. संस्कृती आणि कला यांचा मनोज्ञ संगम असलेले हेच कला-संस्कृतीचे केंद्र बनले. याच गुहालयामधून जैन आणि बौद्धधर्मीय संत-महंत जपजाप्य करायचे. त्यांच्या खाणाखुणा या गुहालयातून आजही अनुभवता येतात. बदामी रंगाच्या मोठमोठ्या दगडी कड्यांना कोरून ही गुहालये निर्मिलेली आहेत. ही चार गुहालये म्हणजे शैव गुहालय, वैष्णव गुहालय, बौद्ध गुहालय व जैन गुहालय. भल्या मोठ्या पर्वतरांगेत दिसणार्‍या शैव गुहालयात नटराज, महिषासुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्‍वर, हरिहर, गजवृषभ यांची शिल्पे आहेत. या गुहेत स्थित नटराज हा अठरा हातांचा आहे. त्याच्या प्रत्येक हातात कोणते ना कोणते आयुध आहे. उदा. दोन हातांत दोन साप, डमरू, जपमाळ, पुष्प, त्रिशूल, वीणा आहे. एकंदरीत त्याच्या अठराही हातांच्या माध्यमातून नृत्याच्या वैविध्यपूर्ण शैलींचे दर्शन घडते. नटराजाची ही भावमुद्रा प्रसन्न चेहर्‍यातून मनोवेधक होत जाते. आदिशक्ती दुर्गा हीच कालिका, अंबिका, बनशंकरी, चंडी, महिषासुरमर्दिनी, तसेच तिच्या अर्धनारीनटेश्‍वरच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक अधोरेखित होत जाते. एक मुख व दोन देह असलेले गजवृषभ शिल्प, हरिहर हे सारेच कोरीवकाम आखीव-रेखीव. शंकराची मंदिरे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातही त्यांचा निवास पर्वतरांगात. तो स्मशानजोगी, बैरागी, त्यामुळे ठिकठिकाणी त्याचे अस्तित्व अलिप्तच दिसते. पण येथे मात्र सोबतीला त्याचा परिवारसुद्धा दृष्टीस पडला. शिवभूमीच्या वैभवाच्या खुणा शैव गुहालयात ठिकठिकाणी आढळतात.
वैष्णव गुहालयात श्रीविष्णूचे वेगवेगळे अवतार चितारलेले दिसतात. द्राविडी संस्कृतीत शैव संप्रदायाचे वेगळेपण भावते. त्याबरोबरीनेच काही ठिकाणी वैष्णवांची धर्मकेंद्रेही उदयास आलेली पाहायला मिळतात. स्वर्ग, पाताळ व पृथ्वी तीन पावलांत व्यापणार्‍या वामन अवतारातील श्रीविष्णूची कथा इथल्या शिल्पकलेतून दृष्टीस पडते. विष्णूचा तिसरा अवतार नरवराह ज्याने भूदेवीला हिरण्याक्षच्या तावडीतून सोडवले होते, याचे दर्शन होते.
संशोधनाची दृष्टी घेऊन इथपर्यंत येणार्‍या शोधकाला या पर्वतरांगातील कातळातून मोठा खजिनाच गवसणारा आहे. नैसर्गिक सौंदर्याचे आगळेवेगळे विष्व अनुभवायचे असेल तर बौद्ध गुहालय न पाहता मागे फिरणे मूर्खपणाचे ठरेल. भवगान गौतम बुद्धाच्या सुंदर कलाकृती येथे बघता येतात. बुद्धाच्या चेहर्‍यावरील समर्पित भाव जिवंतपणाची साक्ष देतो. चालुक्य राजा हे धर्मसहिष्णू व प्रजेप्रति प्रेम असणारे होते. त्यामुळेच शैव- वैष्णवाबरोबरीनेच जैनांनाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. येथे असलेल्या जैन गुहालयाद्वारे हे कळून चुकते. जैन धर्मियांचे तेविसावे तीर्थकर पार्श्‍वनाथ यांचे प्रार्थना शैलीतील शिल्प येथे आहे. त्यावर पाच फणाधारी नागमूर्ती आहे. इतर मूर्तीत बाहुबली. चौविसावे तीर्थकर वर्धमान महावीर तर ध्यानस्त बसलेले आहेत. या सगळ्याच शिल्पकृती अनुभवताना त्या नैसर्गिक सौंदर्यासमोर मनोमन नतमस्तक व्हायला होत होते. या सर्वांची निर्मिती जिथून कुठून झाली असेल त्याचे अधिष्ठान सौंदर्य हेच असेल. मानवाच्या अंतर्यामी सौंदर्याचा तो कलात्मक, उत्कट आविष्कारच होता. ही नुसतीच शिल्पकला नाही तर त्या सर्वच शिल्पांशी धर्मजीवनाची एक समांतर ओळ असल्याचे जाणवत राहते. या शिल्पकृतीतील वेगवेगळ्या मूर्तींच्या मुद्रा अनुभवताना समर्पण, त्याग, भक्ती, प्रेम, सेवा, योग, पावित्र्य, श्रद्धा अशा भावभावनांचे उत्कट प्रकटीकरण दिसते.
भिन्न प्रांतातील प्रत्येकालाच वाटत असते की आपली संस्कृती भिन्न आहे. वरवर आपल्याला हे असे जाणवत राहिले तरीसुद्धा आतून आपण एकसमान असतो. बदामीला स्थित असलेल्या या चारही गुहालयांतून याची प्रचिती येते. या गुहालयाव्यतिरिक्त बदामीला असलेल्या पुरातन वस्तुसंग्रहालयातील लज्जागौरीची मूर्ती पाहता आली. मलप्रभेच्या काठावर वसलेल्या प्रदेशात लज्जागौरी ही श्रद्धास्थानी मानली जाते. माती, दगड, लाकूड यांचा वापर करून या देवतेची प्रतिकात्मक उपासना लोकमानसाच्या श्रद्धेशी निगडीत आहे.
देहभान विसरून पाहण्यासारखी आणि त्यातून शिकून आपला परिघ विस्तारण्यासाठी बदमीची ही गुहालये आपल्याला मदत करणारी आहेत. साधासुधा दगडासारखा दगड, परंतु त्याच दगडाला जेव्हा सुंदर आकार प्राप्त होतो तेव्हाच आपल्या पुरातन वारशाशी त्याचे असलेले अनुबंध सिद्ध होतात. प्रवास करण्यासाठी आपण बाहेर पडतो, आपल्याला जगाचा अनुभव घ्यायचा असतो, परंतु तो घेण्याच्या गडबडीत आपण आपला संसार, प्रतिष्ठा, घर, गाव घेऊनच तिथपर्यंत जातो. देहाने नव्या जागेवर असतो, परंतु मन मात्र मागेच घुटमळत राहते. म्हणूनच नावीन्याला, सौंदर्याला आपल्याला भिडता येत नाही. ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, मुत्सद्देगिरी, अध्यात्म या सार्‍यांचेच देखणेपण बदामी शिल्पकलेतून प्रकट होते. सर्वधर्मसमभावाची शिकवण येथे आहे. बदामीची शिल्पकला आम्ही भरभरून पाहिली. तो पांडुरका बदामी रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात उठून दिसणारा आम्ही अनुभवला. बदामी दगडाच्या गाभ्यातली ती समर्पित शिल्पकला पाहताना इतिहासाच्या गतकालीन पाऊलखुणाही आमच्या सोबतीला आहेत असेच जाणवत राहिले….