चार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील विषय मांडला पंतप्रधानांकडे

0
114

दिल्ली सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकार्‍यांच्या संपाच्या विषयावरून काल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह चार मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांचा यात समावेश आहे.

दरम्यान याच विषयावरून काल संध्याकाळी ‘आप’च्या हजारो समर्थकांनी दिल्ली निषेध मोर्चा काढला. मात्र तो संसद मार्गाजवळ पोलिसांनी रोखला. या मोर्चाला मान्यता नव्हती असे पोलिसांनी सांगितले. त्याआधी केजरीवाल यांची नायब राज्यपालांच्या निवासस्थान भेट घेण्यासाठी तसेच नायब राज्यपाल अनिल बैजर यांच्या भेटीची केलेली विनंती नाकारण्यात आल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. त्यामुळे नंतर या सर्वांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

दिल्लीतील हा पेच सोडवला न गेल्यास त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न तातडीने सोडवलेला आम्हाला हवा आहे. देशाच्या राजधानीत जर असे घडत असेल तर अन्य राज्यांमध्ये काय होईल असा सवाल बॅनर्जी यांनी केला. गेल्या फेब्रुवारीत दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेल्या कथित मारहाणप्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी अशी आयएएस अधिकार्‍यांची मागणी आहे. त्या मारहाणीच्या निषेधार्थ दिल्लीतील नोकरशहा राज्याच्या मंत्र्यांना भेटत नाहीत. वरील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना जाहीर पाठिंबा दिला असला तरी विरोधकांच्या २०१९ लोकसभा निवडणुकांसाठीच्या संभाव्य युतीतील कॉंग्रेस पक्षाने मात्र केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
तेव्हा हे मुख्यमंत्री कोठे होते ? : गोयल
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गोयल यांनी दिल्लीत आलेल्या वरील चार मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये असे म्हटले आहे. केजरीवाल यांच्या उपस्थितीत मुख्य सचिवांना मारहाण झाली त्यावेळी हे मुख्यमंत्री कोठे होते असा सवाल त्यांनी केला. मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला तर काय होईल असेही गोयल म्हणाले. दरम्यान, विरोधी राज्यांच्या चार मुख्यमंत्र्यंनी काल पंतप्रधान मोदी यांच्याकडे नीती आयोग बैठकी दरम्यान दिल्लीतील विषय मांडला. मात्र मोदी यांनी या संदर्भात कोणतेही आश्‍वासन दिले नाही असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मात्र गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालू असे सांगितल्याचे त्या म्हणाल्या.