चलेंगे साथ साथ

0
118

भारत आणि अमेरिका यांच्यातील एका नव्या मैत्रीची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या अमेरिका भेटीतून होऊ घातली आहे. अमेरिकेतील भारतीयांच्या मनातील मोदींचे स्थान, त्यांचे तेथे झालेले अत्यंत उत्साही स्वागत यातून योग्य तो संदेश मोदींकडे आजवर साशंकतेने पाहात आलेल्या अमेरिकेत गेला आहे. काही झाले तरी अमेरिका हा आजच्या घडीस या जगातील सर्वांत प्रबळ देश आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाकडे तुच्छतेने पाहण्याची मानसिकता तेथे अजूनही कायम आहे. भारताविषयीची नकारात्मक प्रतिमा पुसून टाकून चीनप्रमाणे भारतही नानाविध समस्यांच्या जंजाळातून प्रगतीकडे झेप घेऊ पाहतो आहे आणि यश फार दूर नाही असे वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न मोदींनी आपल्या या अमेरिका भेटीत केला. त्यांचा तेथील प्रत्येक पूर्वनियोजित कार्यक्रम हा ‘ब्रँड इंडिया’ निर्मितीच्या दिशेने टाकलेले एकेक पाऊल होता हे लक्षात घ्यायला हवे. केवळ औपचारिकता म्हणून हे कार्यक्रम आखले गेले नव्हते. त्यामागे काही ना काही उद्देश होता. मग ते न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधील रॉक कॉन्सर्टमधील मोदींची उपस्थिती असो, अमेरिकेतील निवडक ११ सीईओंसमवेत झालेली बैठक असो, अथवा मॅडिसन स्क्वेअरमधील गीत संगीताच्या साथीने झालेला ‘कॉन्सर्ट’ असो! भारतीयांच्या मनामध्ये भारतीयत्वाचा अभिमान जागवणे आणि हा देश बदलू लागला आहे, हा संदेश इतरांच्या मनावर ठसवणे असा दुहेरी उद्देश मोदींच्या या दौर्‍यातून साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांनी आपल्या मैत्रिपूर्ण संबंधांची दिशा स्पष्ट करणारे एक निवेदन प्रसृत केलेले आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी एकत्र काम केले तर त्यातून केवळ या दोन्ही देशांचेच नव्हे, तर जगाचे भले होईल असे त्यात म्हटले आहे ते खोटे नाही. दोन्ही देशांच्या आर्थिक क्षमतेमध्ये जरी महद्ंतर असले, तरी दोन्ही देशांतील लोकशाही बळकट आहे. दहशतवादाचा समान धोका दोन्ही देशांना आहे आणि अमेरिकेच्या जडणघडणीमधील भारतीयांचे, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या भारतीयांचे योगदान, भारतातील आऊटसोर्सिंगसाठी योग्य वातावरण, येथील स्वस्त मनुष्यबळ, येथील जनतेची वाढती क्रयशक्ती आणि त्यातून विस्तारत चाललेली बाजारपेठ या सगळ्याचा विचार करता अमेरिकेची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. आज असे दिसते की चीन असो वा भारत असो, या देशांच्या प्रगतीची धास्तीच अमेरिकेने घेतलेली आहे आणि त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न या ना त्या प्रकारे होत असतो. भारताच्या नव्या सरकारच्या व्यापार नीतीची चौकशी नुकतीच अमेरिकेने आरंभलेली आहे. दहशतवादासंदर्भात भारताशी हातमिळवणी करण्यापेक्षा पाकिस्तान अजूनही त्यांना विश्वासू राष्ट्र वाटते. हे सगळे बदलायला हवे. मैत्री ही देवाणघेवाणीतून दृढ होत असते. ती एकतर्फी विकसित होऊ शकत नाही. दोन्ही देशांनी जे संयुक्त निवेदन जारी केलेले आहे, त्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये एकत्रित काम करता येऊ शकते त्याची जंत्री दिलेली आहे, परंतु हे सारे कागदावर राहून चालणार नाही. ते प्रत्यक्षात यायला हवे. विज्ञान – तंत्रज्ञान, अणुऊर्जा इथपासून ते दहशतवाद निर्मूलन, हवामान बदल इथपर्यंत अनेक बाबतींमध्ये भारत आणि अमेरिका हातात हात घालून काम करू शकतात, जगाच्या भल्यासाठी वावरू शकतात. परंतु त्यासाठी भारताकडे पाहण्याची साशंकतेची दृष्टी अमेरिकेला सोडावी लागेल आणि आपण एक जागतिक महासत्ता आहोत हा दर्पही त्यागावा लागेल. चीनच्या यशाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा जो प्रयत्न भारताने आज चालवलेला आहे, त्यातून जागतिक समिकरणे उलटीपालटी झाल्यावाचून राहणार नाहीत. मोदींनी सत्ताग्रहण केल्यापासून विदेशवार्‍यांचा जो सपाटा लावलेला दिसतो, तो पर्यटनासाठी नाही. एकेका देशाशी असलेले भारताचे संबंध अधिक दृढ आणि फलदायी करण्याच्या एका महत्त्वाकांक्षी नीतीचा तो भाग आहे. पाकिस्तानशी मैत्रीचा पुढे केलेला हात नवाज शरिफांनी झिडकारला हा भाग वेगळा, परंतु जपान, चीन आणि अमेरिका यांना भारताच्या विकासात भागीदार करण्याची जी धडपड मोदींनी केली, ती वाया जाणार नाही अशी आशा आहे.