चला सहलीला…

0
408
  • पौर्णिमा केरकर

आज पर्यटनासाठी जगाच्या कोठल्याही कोपर्‍यात माणसे पोहोचू शकतात. काही जणांना परदेश वार्‍या, अनेकांना समुद्रकिनारे भुरळ घालतात तर अलीकडे तरुणाई गड, किल्ले, दुर्ग, पर्वतरांगा अशा खडतर प्रवासाची स्वप्नं पाहतात. कोणी मोटरसायकल, तर कोणी सायकलची सोबत घेऊन स्वैर भटकंतीसाठी रवाना होतात. ही भटकंती आनंददायी आहे.

जग एवढे वैविध्यपूर्णतेने भरलेले आहे की ते अनुभवण्यासाठी माणसाने कितीही जन्म घेतले तरीसुद्धा ते अपुरेच पडतील. म्हणूनच तर मुलांची जी हक्काची सुट्टी असते, त्या सुट्टीत तरी पर्यटनाचा आनंद त्यांना लुटू द्यावा.

उन्हाळा म्हटला की खुणावतात थंड हवेची ठिकाणे. त्यातल्या त्यात आपल्याला जवळ असलेल्या थंड जागा म्हणजे महाराष्ट्रातील ‘महाबळेश्‍वर’ आणि कर्नाटकातील ‘कुर्ग’.

‘परीक्षा संपली, सुट्टी सुरू झाली. आता सुट्टी कशी घालवायची.. असा प्रश्‍न पालकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही’. ज्यांनी पर्यटनाची… फिरण्याची आवड मनापासून जतन केलेली आहे, त्यांना सुट्टीच्या नियोजनाची काळजी करण्याची गरजच नाही. कोठे जायचे फिरण्यासाठी याचे सारे वेळापत्रक त्यांचे ठरलेलेच असते. फिरण्याचा अनुभव गाठीशी असला की मग काय, कसे, कोठे जायचे याची चिंताच उरत नाही. ऋतुचक्र कायमच बदलत असते, त्यात उन्हाळा म्हटला की गोव्यातील कुटुंबांना वेध लागतात ते मुलाबाळांना घेऊन बाहेर कोठेतरी निवांत जाण्याचे. मुलांना सुट्टी लागते, पण पालकांना सुट्टी नसते. अशा वेळी मुलांच्या देखभालीची काळजी लागते. परीक्षा संपल्या की ठरावीक जागांवर बोर्ड लावलेले दिसतात. अमुक ते तमुक वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन. त्यासाठी हजारो रुपयांचे शुल्क आकारले जाते. पंधरा पंधरा दिवसांची, कधी त्याहीपेक्षा जास्त दिवसांची ही शिबिरे असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा भरगच्च कार्यक्रम वेळापत्रकात आखलेला असतो. योगासने, संस्कार वर्ग, निसर्ग भ्रमंती, नदीचे दर्शन, खेळ इ. अनेक गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. पालकांना वाटते की आपली सोय झाली. पैसे भरून मुलांना शिबिरात पाठवायचे… जेणेकरून आम्ही कामाला गेलो तर काळजी करण्याची गरज नाही. या अशा विचाराने पालक तर स्वतःची सोय करतात. मुलांना काय हवं, नको याचा विचारसुद्धा केला जात नाही. संपूर्ण वर्षभर पुस्तके, अभ्यास, परीक्षा, मार्क्स यांचे ओझे वाहणार्‍या मुलांना निदान एक महिनाभर तरी मुक्तपणे हिंडू फिरू द्या ना – एका चौकटीतून पाऊल बाहेर ठेवतो न ठेवतो तर दुसर्‍या चौकटीत बंदिस्त. इथं आपल्याला कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचा विचार करता येतो.

फिरणे हे स्वतःच्या आवडीनिवडीवर अवलंबून. जग एवढे वैविध्यपूर्णतेने भरलेले आहे की ते अनुभवण्यासाठी माणसाने कितीही जन्म घेतले तरीसुद्धा ते अपुरेच पडतील. म्हणूनच तर मुलांची जी हक्काची सुट्टी असते, त्या सुट्टीत तरी पर्यटनाचा आनंद त्यांना लुटू द्यावा. स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची शारीरिक, मानसिक अवस्थेची काळजी घेऊनच फिरायला जाण्याची तारीख, जागा निश्‍चित करावी. आज संपूर्ण जग आपल्या मुठीत येऊन सामावलेले आहे. प्रवासासाठी सर्व तर्‍हेची साधने उपलब्ध झालेली आहेत. अशा वेळी फक्त मनाची तयारी करून प्रदेश, देश, विदेशाचा दौरा करून जगण्यातील आनंद मुलाबाळांसकट द्विगुणित करता येतो. मानवी मनाला लागलेली पर्यटनाची ओढ ही काही आजकालची नाही. तिला हजारो वर्षांचा इतिहास, परंपरा आहे. फिरण्याचा हा वारसा पिढ्यान् पिढ्यांचा आहे.

जिज्ञासा हा माणसाचा स्थायिभाव असून आदिमानवाच्या अवस्थेपासून माणूस सातत्याने एका जागेवरून दुसर्‍या जागेवर संचार करीत होता. शेती आणि बागायती नसल्याने आदिमानवाला आपले अन्न शोधावे लागायचे. कधी वृक्षवेलींची पडलेली मौसमी फळे, फुले गोळा करून कंदमुळे शोधून अथवा जंगली श्‍वापदांचे मांस भक्षण करून तो जगत असायचा. त्यावेळी निसर्गातल्या वेगवेगळ्या घटनांनी तो अचंबित होऊ लागला. कालांतराने नवाश्म युगात अग्नी आणि शेतीच्या शोधातून त्याच्या जीवनात संस्कृती आली. आदिमतेत भटकंती करणार्‍या माणसाला संस्कृतीचा प्रवाह सापडला. जागोजागी अन्नपाण्यासाठी भटकणार्‍या माणसाच्या जीवनात शेतीने स्थिरता आणि संस्कृती आणली. आदिम अवस्थेत अन्नपाण्यासाठी भटकताना त्याला सातत्याने संघर्ष करावा लागायचा. सभोवतालच्या परिसराकडे तो शोधक दृष्टीने पाहू लागला. याला कारणच होते शेतीचा शोध. निसर्गातील अगम्यता त्याच्या लोकधर्माच्या विकासाला पोषक ठरली. हजारो वर्षांच्या आदिम अवस्थेतून ‘होमोइरेक्टस’, ‘होमोसेपियन’ बनला. विचार करण्याची क्षमता आल्याने त्याच्यातील जिज्ञासूपणाला दिशा आणि दृष्टी लाभली. प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, ज्ञानकेंद्रे, देवादिकांची मंदिरे पाहण्यासाठी माणूस भ्रमंती करीत असतो. हियान्तसांग, फाहियान, अब्दुल रझाक, मार्को पोलो इ. यात्रेकरूंनी जो प्रवास केला, जे अनुभव घेतले त्याविषयीची माहिती इतरांना कळावी म्हणून त्यांनी ग्रंथनिर्मिती केलेली आहे.

माणूस विध्वंसक असो अथवा तत्त्वचिंतक, त्याला जेथे तो जातो तेथे दिसणारी स्थळे भावल्याशिवाय राहात नाही. भारतीय इतिहासात संहारक म्हणून प्रतिमा असलेला ‘बाबर’ हा पर्यटनप्रेमी होता, याची प्रचिती याने लिहिलेल्या आत्मचरित्रातून येते. आजच्या कालखंडात मानवी जीवन सोयीसुविधांनी भरलेले आहे. कधीकाळी पायी चालणारा माणूस घोडागाडी, रथ, टांगा, नौका याद्वारे भटकंती करता करता स्वयंचलित वाहनाने एका जागेवरून दुसर्‍या जागी जाऊ लागला. लोहमार्ग आणि हवाई मार्ग यांनी मानवी समाजाच्या पर्यटक वृत्तीचे भरणपोषण केले. त्याच्यातल्या पर्यटकप्रेमीला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने या दोन्ही मार्गांनी महत्त्वाचे योगदान केलेले आहे. आज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. पुरेपूर समाधान-तृप्ती पर्यटनाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी पर्यटक कंपन्या विविध योजनांची खैरात करीत असतात. भारतासारख्या उष्णकटीबंध प्रदेशाला उन्हाळा हा असह्य असतो आणि त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांना उन्हाळी सुटी असते. आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह पर्यटनास जाणे ही मानवी भावना असून बरेच जण पर्यटनव्यवसायात असलेल्या व्यावसायिक कंपन्यांच्या सहकार्याने, तर काहीजण स्वतंत्रपणे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नियोजन करतात. आजकाल तर बरीच कुटुंबे समूहाने फिरण्यासाठी काही दिवस हमखास राखून ठेवतात. मित्रपरिवाराच्या सोबतीनेसुद्धा पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी बरेच जण पहिल्यापासूनच नियोजनाच्या कामाला लागतात. उन्हाळा म्हटला की खुणावतात थंड हवेची ठिकाणे. त्यातल्या त्यात आपल्याला जवळ असलेल्या थंड जागा म्हणजे महाराष्ट्रातील ‘महाबळेश्‍वर’ आणि कर्नाटकातील ‘कुर्ग’. लांबचा विचार आणि काहीसे वेगळे पर्यटन करायचे असेल तर लेह-लडाख ते काश्मीर व्हाया कारगील हे असेच व्हायला हवे. लडाखला एकदा जाणे झाले की मग ही भूमी आपल्याला पुन्हा पुन्हा साद घालीत राहते. इथला निसर्ग झाडापेडातून दिसत नाही, तर तो दिसतो दगड-धोंड्यातून, माती-कड्याकपारीमधून. दूर..दूर..पर्यंत एकही हिरवे झाड दिसणार नाही, परंतु लाल, गुलाबी, जांभळी, पिवळी, रुपेरी वगैरे छटा असलेल्या डोंगररांगा – मातीचे विविध रंग, तलावाची स्फटिकावर निरभ्र नितळ निळाई, दगड, माती, रेती, पहाडाच्या कितीतरी छटा. लडाखच्या लोकमानसाचे आदरातिथ्य अनुभवण्यासाठी डोंगररांगांच्या उंचीपेक्षासुद्धा इथल्या मानवी मनाच्या संवेदनाची खोली खूप मोठी आहे. खूप उंचीवर असलेले हे ठिकाण त्यामुळे बर्‍याच जणांना धाप लागते. व्यवस्थित उपाययोजना करूनच अशा प्रवासाचे बेत आखले तर ते व्यवस्थितरीत्या सफल होतात. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर हा साराच परिसर थंड हवेचा. आपल्यासारख्या उन्हाळी प्रदेशाला या अशा जागा सोयीच्या पडतात.

देशविदेशांतल्या पर्यटकांना खरं तर आपला हा छोटा प्रदेशच जास्त आवडतो. सह्याद्री आणि अरबी सागर यांचे नेपथ्य खचितच एखाद्या प्रदेशाला लाभते. आर्थिक स्थिती सक्षम नसलेली काही कुटुंब असतील तर त्यांना बाहेरचे हॉटेलिंग, प्रवासखर्च झेपत नाही. तर त्यांनी सुरुवातीला गोव्यालाच पसंती द्यायला हरकत नाही. आजकाल इको-फ्रेन्डली पर्यटन जोर धरीत आहे. सांगे तालुक्यात वेर्ले, सालजिणीसारख्या निसर्गाने समृद्ध असलेल्या गावात शांतपणे कुटुंबासमवेत चार-दोन दिवस व्यतीत करता येतात. अशा आणखीन काही निसर्गरम्य जागा सत्तरीतील सूर्ल गाव, चोर्ला घाट परिसर, चिखले, चिगुळे, चोर्ला ही जरी कर्नाटकातील गावे असली तरीसुद्धा ती गोव्याच्या सीमेलगत असल्याने या गावाचा सांस्कृतिक, सामाजिक दुवा गोव्यातील लोकमानसाशी जोडलेला आहे. गोव्याला जोडून असलेला कोंकण प्रांत समृद्ध किनार्‍यांची पार्श्‍वभूमी लाभलेला आहे. तारकर्ली, गणपती पुळे, मालवण, वेंगुर्ला… नावांची जंत्री संपता संपणारी नाही.

बजेटमध्ये बसत नाही म्हणून बरीच कुटुंबे मुलांना घेऊन कोठेच बाहेर जात नाहीत. ते वेगळ्या तर्‍हेने आपल्या सुट्टीचे नियोेजन करू शकतात. मुलांच्या वाढत्या वयात जर त्यांना सभोवतालची माणसे, निसर्ग, धार्मिक, सांस्कृतिक स्थळांचा वारसा दाखवला तर सर्वांच्याच ज्ञानात भर पडणार आहे. जुने गोवे येथे तर जागतिक वारसास्थळे आहेत. त्यांची अनुभूती कुटुंबासहित घेऊ शकतो. बर्‍याच वेळा असे होते की आपण दुसर्‍या प्रदेशात, विदेशात भ्रमंती करून येतो. परंतु आपल्या शेजारी कोणता अनमोल खजाना आहे याची पुसटशी दखल आपण घेत नसतो. अशा वेळेस ठरवायचे की हे सर्व पहायचे. केपे, काणकोण, सांगे, पेडणे, सत्तरीसारख्या तालुक्यातील ग्रामजीवन जर उन्हाळी सुट्टीत पर्यटनाच्या निमित्ताने अनुभवले तर सर्वांसाठीच तो शांत-समाधानी अनुभव असेल. प्रत्येक गावाची स्वतःची संस्कृती आहे. तिथली नदी, मंदिरे, माणसे ही सगळीच प्रचिती ताणतणावात दिलासा देते. आपल्या प्रदेशाची प्रादेशिक वैशिष्ट्ये ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. त्याचे पर्यटनाच्या माध्यमातून वेगळेपण अधोरेखित करता येते.

पर्यटन, प्रवास, कुटुंब, मित्रपरिवार यांच्यासोबत करण्यामागे जर काही असेल तर ते जसे सौंदर्याचा आस्वाद घेणे हे आहे, तसेच दैनंदिन जीवनातील त्याच त्याच चक्रातून मनाला थोडासा दिलासा मिळायला हवा, ही वृत्ती आहे. शेवटी समाधान, आनंद, सुख या सर्व गोष्टी स्वतःच्या मनावर अवलंबून आहेत. ‘वेळच नाही कामापुढे’ असेच पालुपद लावले तर अशा आनंदाला आपण मुकणारच. आज पर्यटनासाठी जगाच्या कोठल्याही कोपर्‍यात माणसे पोहोचू शकतात. मनाचा कौल जसा आहे त्या त्या क्षेत्रातील पर्यटन आपण करू शकतो. काही जणांना परदेश वार्‍या, अनेकांना समुद्रकिनारे भुरळ घालतात तर अलीकडे तरुणाई गड, किल्ले, दुर्ग, पर्वतरांगा अशा खडतर प्रवासाची स्वप्न पाहतात. कोणी मोटरसायकल, तर कोणी सायकलची सोबत घेऊन स्वैर भटकंतीसाठी रवाना होतात. ही भटकंती आनंददायी आहे. अलीकडे कुटुंबव्यवस्थेत मुलांबरोबरचा पालकांचा निखळ संवाद तुटत चालला आहे. मुलांची दीर्घ सुट्टी हीच खरीतर योग्य वेळ आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याची! घर, ऑफिस, इतर चिंता, काळज्या जराशा बाजूला सारून मुलांसाठी वेळ देऊन त्यांच्या सोबतीने केलेली सफर अविस्मरणीयच असेल. प्रत्येक काळाला, वेळेला, तसेच क्षणांनाही स्वतःचा असा चेहरा असतो. तो सारखा बदलत असतो. हा बदल वाढत्या वयाच्या सोबतीने प्रत्येकालाच अनुभवावा लागतो. तो समूहाने… कौटुंबिक एकोप्याने टिपला की त्याची उंची वाढते, नाही का??