चला! रस्त्यावर शिस्त आणू!!

0
134

– गुरुनाथ केळेकर
गोव्याचा वाहतूक प्रश्‍न हेल्मेटपुरता आता मर्यादित राहिलेला नाही. या प्रश्‍नावर सर्वंकष विचार झाला पाहिजे. आपल्यापुढे दोन प्रश्‍न आहेत. एक- रस्त्यांवरील बेशिस्त आणि दुसरा- रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यू. रस्त्यावरील बेशिस्तीला सरकारचे कायदेकानून वापरून थोडेसे नियंत्रण आणता येईल; परंतु अपघात व मृत्यू यासाठी खास तंत्र वापरावे लागेल.
नियतीने आपणास दोन पाय दिलेले आहेत. तिला हवे असते तर पायांच्या जागी चाके अथवा पंख देता आले असते. पायांबरोबरच आपणास एक मानसिकता दिली आहे. विनोबाजी म्हणायचे, चालताना तुमचे डोके शांत असते. वाटेत मित्र भेटला तर तुम्ही थांबता आणि कसे काय म्हणून चौकशी करता. चाकांचा उपयोग केल्यानंतर डोक्यात गती शिरते आणि ही गती आपला आपल्यावरील ताबा घालवून बसते. युरोप-अमेरिकेत यासंदर्भात माणसांची मानसिकता पूर्णतः बदललेली आहे असे आपण ऐकतो किंवा पाहतो. चाकांवर बसलेला माणूस आपल्या इथं चक्रम बनतो, उद्धट बनतो. याच्या उलट पाश्‍चात्य देशांत वाहनचालक अत्यंत नम्र बनतो आणि रस्त्यावरील पादचार्‍यांना ‘काळजी घ्या, काळजी घ्या’ असे सांगत असतो. गतीसाठी त्यानी खास रस्ते बनविलेले आहेत.
आपल्याकडे ही परिस्थिती, हा बदल आणूच शकणार नाही अशी भूमिका आपण घेतली तर आपल्या देशात, इतर राज्यांत जे चालते आहे तेच आपण इथं आणल्यासारखं होईल. हे एक आव्हान असून ते स्वीकारायची तयारी आपण आजपासून केली पाहिजे. पण धरसोडीच्या उपाययोजना करून आपण रस्त्यावर शिस्त आणू शकणार नाही.
देशात दरवर्षी दीड लाख लोक रस्त्यावरील वाहन अपघातांत ठार होतात आणि ते आपण चालवून घेत आलो आहोत. कदाचित आपण आपल्या देशात माणसाला किंमत देत नाही. अमेरिकेत एक नागरिक खुद्द देशात वा इतर ठिकाणी संकटात सापडला तर केवढा आक्रोश होतो हे आपण नेहमीच वाचतो. या उलट आपल्या देशात अपघातात ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबीयांना ‘लाख- दोन लाख रुपये सरकारने सहानुभूतीपूर्वक देण्याचे ठरविले आहे’ असे सांगून माणसाची किंमत लाख- दोन लाखांत आटोपतो.
पंडित नेहरूंनी आपणांस ‘अजीब’ म्हटले होते. ते ऐकून त्यावेळी आपण काहीजण हसलो, तर काहीजणांनी आपल्या मनाला लावून घेतले. कोणालाच ते आव्हान असे वाटले नाही. खरोखर, आम्ही गोमंतकीय एका वेगळ्या अर्थाने ‘अजीब’च आहोत. घराबाहेरील, रस्त्यावरील व इतर ठिकाणी बेशिस्त आणि मृत्यू यांना आवर घालून आम्ही ‘अजीब’ नाही हे सिद्ध करून दाखविले पाहिजे. आपणांस सर्व दृष्टीनी अनुकूलता आहे. आपला गोवा प्रदेश छोटा हा मायनस पॉईंट नसून प्लस पॉईंट मानला पाहिजे. आपण सुशिक्षित त्याचप्रमाणे सुसंस्कृत आहोत. आपण शेजारधर्म पाळणारे धर्मसमभावी लोक आहोत. आपण सातत्याने जगातील सारे देश बघत असतो. पोर्तुगिजांनी आपणांस काही गुण शिकविलेले आहेत. त्यामुळे गोव्याबाहेरील लोकांना आपण थोडे वेगळे वाटतो. बाहेरील लोक गोव्यात येतात ते सारे समुद्रकिनार्‍यावर काहीबाही कमी-अधिक चाललेले असते ते पाहायला येतात असे नव्हे तर गोव्यातील लोकच त्यांना एक वेगळ्या प्रकारचे, पाश्‍चात्यांचा चांगला प्रभाव असलेले वाटतात. हे गोव्याचे दर्शन त्यांना सुखावह वाटते हासुद्धा एक लक्षणीय मुद्दा आहे.
आमचा गोवा त्यादृष्टीने वेगळा आहे हे आपण रस्त्यांवर सर्व दृष्टीने शिस्त आणून दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी सरकारी वाहतूक व पोलिस यंत्रणेत पूर्णपणे बदल घडवून आणला पाहिजे. आपल्या पोलिसांना वाहतुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक, मुंबई, नागपूर, हैद्राबाद आदी ठिकाणी पाठविले जाते. त्याऐवजी आपण इथे गोव्यातच एक खास प्रशिक्षण केंद्र सुरू केले पाहिजे, ज्याचा उपयोग आजच्याच नव्हे तर आगामी पंचवीस वर्षांत गोव्याला होईल. इतकेच नव्हे तर बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, रत्नागिरी या वाढत्या शहरांतील पोलिसांसाठीही त्याचा उपयोग होईल.
मागे येथे गोव्यात ‘आरआयटीई’ ही संस्था मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोव्यात आणली होती. त्यावेळचे वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी त्या संस्थेकडे असहकार पुकारून त्याना गोव्यातून घालवून दिले. हा एक शुद्ध अविचार होता. गोव्यातील लोक रस्ता अपघातांत मरतात त्यासाठी मंत्र्यांना जबाबदार धरले तर असा विचार त्यांच्याकडून होणार नाही. या संस्थेचे प्रमुख डॉ. रोहित बरुजा यांनी दिल्लीजवळील सुरजकुंड येथे एक मोठे प्रशस्त प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. ते खरेच पाहण्यासारखे आहे. सारी दिल्ली आणि जवळील प्रदेश त्याचा पुरेपूर फायदा घेतात.
गोव्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास- अगदी छोट्या विद्यार्थ्यासही- त्याच्यापुढे येणार्‍या नागरिकत्वाची जाणीव त्या-त्या वयोमानाप्रमाणे करून दिली गेली पाहिजे. मुंबईचे डॉ. पी. एस. पसरिया हे दोनतीनदा या वाहतूक सुुुधारणा प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी येथे आले आणि फक्त निराशेचा सूर घेऊन परतले. तीन वर्षांच्या बालकास ज्या वयात तो शिक्षणासाठी घराबाहेर पडतो वा आपण नेतो त्यावेळी त्याला रहदारीचे नियम शिकविण्यास प्रारंभ केला पाहिजे, आणि म्हणून त्यासाठी नागरिकवर्गात एक जबाबदारीचा माहोल निर्माण करता आला पाहिजे. रस्त्यावर जे काय चाललेले आहे तो खेळ नव्हे, पोरखेळ तर नव्हेच नव्हे ही भावना या रस्त्याचा उपयोग करणार्‍या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आपले माजी पोलिस उपअधीक्षक गुरुदास जुवारकर हे एक कार्यक्षम अधिकारी होते. ते दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून मार्गदर्शन करीत असत. ते म्हणायचे, वाहतूक पोलीस नीट वागले तर समाजात गुन्हेगारीलाही वचक बसेल. पण आपल्या सरकारला त्यांचा उपयोग करून घेता आला नाही, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल.
गोव्यात दरवर्षी रस्त्यावर चारपाच हजार वाहन अपघात आणि त्यांत ३०० ते ४०० माणसांचा मृत्यू होतो. रस्त्यावरील कुत्रीसुद्धा अशा प्रकारे क्रूरपणे मरत नसतील. गेल्या पंचवीस वर्षांत चुका केलेली वा निर्दोष, अज्ञान मुले-बाळे, तरुण-वृद्ध अशी दहा ते पंधरा हजार माणसे आपण गमावली आहेत. आपले गोमंतकीय इतके कसे मुर्दाड बनले कळत नाही. खरे तर कार्यक्षम मंत्र्यांनी ‘मी आपल्या राज्यातील एक माणूसही रस्त्यावर मरू देणार नाही’ अशी जाहीर प्रतिज्ञा करायला हवी होती. रस्त्यावर काही गोष्टी घडतील हे मान्य केलेच पाहिजे, परंतु मरणार्‍या माणसांमध्ये आपल्या देशातील महनीय व्यक्ती मरत आहेत असे लक्षात आणले तर आपण आपले फार मोठे नुकसान करून घेत आहोत हे कळून येईल. आज आपण सारे गोमंतकीय आपमतलबी बनलो आहोत. कुणालाही कदाचित वाईट वाटेल, थोर स्वातंत्र्यसेनानी त्रिस्तांव ब्रांगाझ कुन्हा यांनी एके काळी ज्यांना ‘देशभ्रष्ट’ म्हटले त्यांचेच आपण वंशज झाल्यासारखे वागत आहोत. तसे आपण सारे गोव्यासाठीच करीत आहोत आणि शेवटी गोव्यासाठी काहीच करीत नसतो. देशासाठी आपणाला काहीतरी करायचे आहे याचीही आपणाला विस्मृती झालेली आहे. आपणास जे एक व्हिजन (दूरदृष्टी) असायला हवे होते ते कदाचित इथे आलेल्या पैशांच्या महापुरात घालवून बसलो आहोत. खरे म्हणजे आज गोव्याचा पुनर्जन्म होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
वाहतुकीचा प्रश्‍न हा साधा नव्हे. आपण आपल्या घराला जे महत्त्व देतो, सगळे जीवन एका घरासाठी घालवित असतो, तेच प्रेम घराबाहेरील परिसराला देण्याची आवश्यकता आहे, तरच आपले जीवन परिपूर्ण बनले. नपेक्षा दरदिवशी रस्त्यावर आज तीनचार माणसांचा बळी जातो, हे चित्र बदलून आगामी काळात १५-२० माणसे बळी गेल्याचे आपणास वाचायला मिळेल आणि त्यात कदाचित आपलाही माणूस असेल. अपघात आणि मृत्यू इतरांचे होत असतात आणि आपले काम स्मशानभूमीवर पोचविण्याचे असे जे लोक समजत आहेत ते समाजाला सर्वनाशाच्या दिशेने नेत आहेत असे म्हणावे लागेल.
(शब्दांकन : अनिल पै)