चला, मतदान करूया!

0
319

गोव्यासह तेरा राज्ये आणि दोन संघप्रदेशांत मिळून लोकसभेच्या ११५ मतदारसंघांमध्ये आणि गोव्यात तीन विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये कमी उत्साह असतो, परंतु लोकसभेची निवडणूकही विधानसभेइतकीच महत्त्वाची आहे, कारण ती देशाचे भवितव्य घडवीत असते. आपला देश पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हाती सोपवला जाणार आहे, त्याचा निर्णय लोकसभेची ही निवडणूक करीत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये आपण ज्या उत्साहाने सहभागी होतो, त्याच उत्साहाने आणि देशाचे भवितव्य घडविण्याच्या प्रेरणेने आजच्या लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने आवर्जून बजावणे आवश्यक आहे. आज मतदानानिमित्त सरकारी सुटी असली तरी ही सुटी मौजमजा करण्यासाठी नाही. पुढील पाच वर्षे मजा सजा होऊ नये असे वाटत असेल तर आपला मतदानाचा हक्क योग्यरीत्या आणि विचारपूर्वक बजावणे गरजेचे आहे. गोव्यात लोकसभेच्या जोडीने तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही होणार असल्याने त्या मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये उत्साह असेलच, परंतु तोच जोश अन्यत्रही दिसला पाहिजे. आतापावेतो प्रचारपर्वामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले मुद्दे आपल्यासमोर ठेवलेले आहेतच. आता निर्णय आपण घ्यायचा आहे. तोही कोणाच्या प्रभावाखाली न येता स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार आणि निष्पक्षपणे विचार करून घ्यायचा आहे. देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा विचार केला तर असे दिसते की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा भर यावेळी राष्ट्रीय सुरक्षा, त्यासाठी आवश्यक असलेले खंबीर नेतृत्व, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन वगैरेंवर आहे. कॉंग्रेसचा भर ‘न्याय’ ही गरीबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना, केंद्र व राज्य सरकारांतील रोजगार भरती, लोकशाही टिकवणे वगैरेंवर आहे. आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा भर तिसरा पर्याय देण्यावर आणि जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यावर आहे. या तीन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त उत्तर गोव्यात यावेळी रिपब्लिकन पार्टीचा एक उमेदवार आणि दोन अपक्ष रिंगणात आहेत, तर दक्षिण गोव्यात तीन अपक्ष रिंगणात आहेत. मतदारांना या सार्‍या पर्यायांतून विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. वरीलपैकी कोणीही पसंत नसेल तर अर्थातच ‘नोटा’ चा पर्यायही मतदारांसाठी आहेच. परंतु महत्त्वाचे आहे ते प्रत्यक्ष मतदानात सहभागी होऊन आपला मताधिकार बजावणे. मतदारयादीमध्ये आपली गैरहजेरी नोंदवली जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. लोकसभेच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीचाही लेखाजोखा आजच्या निवडणुकीतून मांडला जाणार आहे आणि त्यांना असलेल्या पर्यायांचीही विश्वासार्हता तपासली जाणार आहे. कोणी कोणाला मतदान करावे याचे पूर्ण स्वातंत्र्य सर्वस्वी प्रत्येक मतदारालाच आहे. मात्र, आपण जो काही निर्णय घेऊ त्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर काय होईल, देशावर काय होईल आणि देशात येणार्‍या नव्या सरकारवर काय होईल याचाही विचार प्रत्येक मतदाराने अवश्य करावा. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा ह्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांसाठीही आज मतदान होेते आहे. मांद्रेमध्ये भाजप, कॉंग्रेस, गोवा सुरक्षा मंच आणि एक अपक्ष रिंगणात आहेत. म्हापशात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, गोवा सुरक्षा मंच, आम आदमी पार्टी आणि दोन अपक्ष रिंगणात आहेत, तर शिरोड्यात भाजप, कॉंग्रेस, मगोप, आप आणि गोवा सुरक्षा मंच रिंगणात आहेत. आपला भावी आमदार या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांना विचारपूर्वक निवडायचा आहे. कोणत्याही वैयक्तिक आमिषांना बळी न पडता वा जातीपातीच्या राजकारणाच्या कह्यात न येता केवळ राज्याचे हित विचारात घेऊन हे मतदान करायचे आहे. दिल्या गेलेल्या आश्वासनांना प्रत्यक्षात उतरवण्याची किती क्षमता उमेदवारामध्ये आहे आणि त्याची विश्वासार्हता किती आहे याचा विचार करून आपला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे. अनेकदा ‘यांना निवडून देण्यात आपला फायदा काय’, असा विचार काही मतदार करताना दिसतात. आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे अशीही एक मानसिकता असते, परंतु अवघ्या एका मताने विजय – पराजयाचे पारडे इकडून तिकडे झुकल्याची वा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत! चुकीची माणसे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेली, तर त्यांच्या चुकीच्या निर्णयांचा फटका नागरिक म्हणून आपल्यालाही बसत असतोच! त्यामुळे करीत असलेले मतदान विचारपूर्वक आणि योग्य उमेदवारास करण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने बजावले तर त्यातून भारतीय लोकशाही नक्कीच बळकट होईल. आजचा मतदानाचा दिवस ही लोकशाहीची महापर्वणी आहे हे ध्यानात ठेवून आपला प्रत्येकाचा मताधिकार अभिमानाने आणि ताठ कण्याने बजावूया. स्वतःचे, गोव्याचे आणि देशाचे भवितव्य घडवूया!