चला, नवी वाट निर्माण करुया!!

0
238

>>प्रा. रामदास केळकर

ज्या शाखेत आपण प्रवेश घेऊ इच्छिता त्या शाखेची सखोल माहिती आता निकाल मिळेपर्यंत आपण नक्कीच घेऊ शकता. कला शाखा म्हणजे नेमके काय? .. याचीही अपुरी माहिती घेतल्याने त्याचा संबंध रंग रेषेशी लावून काही विद्यार्थी आपले वर्षाचे नुकसान करून घेतात. आपले भाषेवर नितांत प्रेम असेल, भाषा विषय आवडत असेल तर या शाखेचा विचार प्रामुख्याने आपण करावा. वाचन आणि लिखाण ह्याला या शाखेत वेगळेच महत्व आहे. या माहितीबरोबर यामध्ये जरा हटके करीयर कोणते करता येतात, त्यासाठी गोव्याबाहेर जायची तयारी ठेवावी. ही माहिती आपण घेतल्यास निर्णय घेताना सोपे जाते. केवळ काही भाषांवर प्रभुत्व मिळवून तुम्ही चांगल्यापैकी अर्थार्जन करू शकता.

हल्लीचे विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने कमालीचे भाग्यवान आहेत. अकरावीत गेल्या गेल्या हातात लॅपटॉप, त्यापूर्वी शालेय स्तरावर संगणक, संगीत यांचा परिचय करून देणारी व्यवस्था. पुढे सी.ई.टी.ची परीक्षा (आता ह्यापुढे नीट परीक्षा) दिल्यांनतर व्यावसायिक शाखेत प्रवेश करायला सुलभ जावे यासाठी शिकवणी वर्गांची सुविधा. एकूण काय शैक्षणिकदृष्ट्या आनंददायी वातावरण. असे असले तरी रोजच्या वाटेने जाण्यातच अनेक विध्यार्थी मग्न असतात. मळलेल्या वाटा सोडून वेगळ्या वाटेने किंबहुना नवी वाट निर्माण करून पुढे का जाऊ नये?.. असा प्रश्न विचारणारे मात्र अपवादानेच दिसतात.
मळलेली वाट कमी धोक्याची असते पण त्यात स्पर्धा जास्त असते हे आपण विसरतो. लवकरच बारावी आणि त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होणार. मग आपल्या जवळच्या उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जो तो गर्दी करणार. पण प्रवेश घेण्यापूर्वी कितीजण त्या शाखेची पूर्ण माहिती घेतात? अमुक शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्याचे फायदे तोटे काय? त्यातील करीयरची संधी काय? ह्या दृष्टीने फार कमी मंडळी विचार करत असतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतो पण हातात पदवीचे भेंडोळे घेऊन नोकरीसाठी वणवण फिरताना तरी दिसतो किंवा मिळेल त्या नोकरीत समाधान मानून आयुष्य घालवितो. खरे तर आज करीयरच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. कला कौशल्यांना भरपूर मागणी आहे. क्रीडा प्रकारातही संधीची दालने तुमची वाट पहात आहेत. नोकरी देण्याची हिंमत तुमच्यात निर्माण व्हावी ह्यासाठी सरकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. पण ह्या सर्वांचा सखोल अभ्यास करून नंतर निर्णय घ्यावा एवढा वेळ पालकांनाही नसतो आणि विद्यार्थ्यांना हे कोणी सांगण्याच्या भानगडीतही पडत नाही. दहावीनंतर एखादी शाखा निवडावी आणि बारावीत पोचल्यानंतर पुढच्या करियरचा गंभीरपणे विचार करावा.. ह्या मानसिकतेतून आपले विद्यार्थी, पालक कधी बाहेर येणार? आता तर शिक्षण का? .. तर नोकरी मिळण्यासाठी! हे साचेबंद उत्तर दुर्दैवाने ऐकू येते आणि नोकरी देखील कोणती तर सरकारी.. म्हणजे सुरक्षेची हमी, काम कमी! त्यासाठी अमुक रक्कम मोजली असे खाजगीत अभिमानपूर्वक सांगणारेही मिळतात! आणि ज्याने हे काम केले (पैसे घेऊन) त्याचे आपल्यावर उपकार आहेत असेही सांगणारे भेटतात. कारण या व्यवहारात त्याने फटिंगगिरी केलेली नसते ना! जिद्द, परिश्रम, प्रयोगशील राहण्याची वृत्ती आपले विद्यार्थी कधी रुजविणार? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. आपल्या अभ्यासक्रमातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना जगाच्या व्यवहाराची कल्पना कोवळ्या वयात येत नसते. आपण करीयर निवडताना नक्की कशाला प्राधान्य द्यावे? याचीच जर कल्पना त्या विद्यार्थ्याला आली नसेल तर तो इतरांप्रमाणे आयुष्य केवळ ‘जगला’ असाच त्याचा अर्थ होईल. आजचे युग हे अष्टपैलूंना अमाप संधी देणारे आहे. केवळ पदवी घेऊन न राहता एखादी कला, एखादे कौशल्य तुमच्यापाशी असेल तर तुम्हाला बेकारी कधीच स्पर्श करणार नाही.
दहावी नंतर आपले विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक, आय टी आय, तंत्रनिकेतन यांमध्ये प्रवेश घेऊ शकतो. अकरावीत प्रवेश केल्यानंतर आपल्याला अल्प खर्चात लॅपटॉप मिळू शकतो ह्याची माहिती न घेता अमुक शाखेत प्रवेश केल्यास मी माझा कशाप्रकारे विकास घडवून आणू शकतो?.. ह्याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने करावा. उदा. कला शाखेच्या विद्यार्थ्याला शिकवणी घेण्याची गरज लागत नाही. त्याच्याजवळ भरपूर वेळ असतो त्यामध्ये तो एखाद्या आवडत्या खेळाचा क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त कित्येक एथलेटचे प्रकार आहेत, बेडमिंटनसारखे खेळ आहेत, त्यांचा सराव करू शकतो किंवा वाचनासाठी वेळ देऊ शकतो. शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देऊ शकतो. कला, नाटक, साहित्यिक आदी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. एखादे कला कौशल्य विकसित करू शकतो. एखाद्या छंदाला जवळ करू शकतो. नागरी सेवा परीक्षेची तयारी करू शकतो.
ज्या शाखेत आपण प्रवेश घेऊ इच्छिता त्या शाखेची सखोल माहिती आता निकाल मिळेपर्यंत आपण नक्कीच घेऊ शकता. कला शाखा म्हणजे नेमके काय? .. याचीही अपुरी माहिती घेतल्याने त्याचा संबंध रंग रेषेशी लावून काही विद्यार्थी आपले वर्षाचे नुकसान करून घेतात. आपले भाषेवर नितांत प्रेम असेल, भाषा विषय आवडत असेल तर या शाखेचा विचार प्रामुख्याने आपण करावा. वाचन आणि लिखाण ह्याला या शाखेत वेगळेच महत्व आहे. या शाखेच्या शिक्षणातून आपण शिक्षक, वकील, पत्रकार आदी क्षेत्रात चमकू शकता. या माहितीबरोबर यामध्ये जरा हटके करीयर कोणते करता येतात, त्यासाठी गोव्याबाहेर जायची तयारी ठेवावी. ही माहिती आपण घेतल्यास निर्णय घेताना सोपे जाते. केवळ काही भाषांवर प्रभुत्व मिळवून तुम्ही चांगल्यापैकी अर्थार्जन करू शकता. अमृता जोशी नावाची पुण्याची भगिनी छंद म्हणून एक दोन भाषा शिकता शिकता आज त्या २२ भाषा शिकल्या आहेत. आता त्या आपल्या दादरमधल्या संस्थेतून देशी, परदेशी भाषा शिकवितात. छायाचित्रकलेची आवड असलेला पणजीतील संजीव सरदेसाई या क्षेत्रामध्ये गोव्यातील सांस्कृतिक वारसा शोधण्याचे काम व्यावसायिकदृष्ट्या करत आहे. वाणिज्य शाखेचा संबध आर्थिक व्यवहाराशी येतो. यामधून चार्टर्ड एकौंनटन्ट, हिशोब तपासनीस, बँक आदी क्षेत्रात येता येतं. कला वा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी एनसीसीसारख्या उपक्रमात जरूर भाग घ्यावा. यातून तुम्हाला लष्करात जाण्याचे मार्ग मिळू शकतात. विज्ञान शाखेत अलीकडे प्रत्येक प्रवेश परीक्षेसाठी शिकवणी घेणे जणू अनिवार्य ठरल्याने ही शाखा आर्थिकदृष्ट्‌या महागडी होत आहे. या शाखेत करीयरच्या संधी भरपूर जशा आहेत तसा अभ्यासाचा आवाकाही मोठा आहे. या शाखेच्या विध्यार्थ्यांना आता शेतीमध्येही शिक्षण गोव्यात घेता येते. ज्यादा उपक्रम करणे या विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. आय टी आय मध्ये कौशल्याभिमुख कोर्सेस असल्याने त्याच्या आधारे आपण स्वावलंबी बनू शकतो. पण त्यासाठी अनुभव घेणे महत्वाचे ठरते. सहसा अशी कौशल्ये शिकल्यानंतर एखाद्या कारखान्यात काम करणे अनेकजण पसंत करतात.
स्वत:चा उद्योग थाटावा असा धाडसी प्रयत्न फार थोडेजण करतात. बारावी उत्तीर्ण झालेल्यांना आपली शाखा कोणती हे माहिती असते. फक्त पुढे कोणत्या मार्गाने जावे ह्याबद्दल ठाम निर्णय घेतलेला नसतो. किनारपट्टीत राहणार्‍याना (हॉस्पिटॅलिटी)आदरातिथ्य क्षेत्रात नाव कमविण्याचे आकर्षण असते. कारण इथे कमाईची संधी चांगली असते. कॅटरिंग विषय घेऊन शिक्षण घेणार्‍यांनी गोव्यातच नव्हे तर परदेशातही यश मिळविलेले आहे. गोव्यात अशा प्रकारचे चांगल्यापैकी शिक्षण देणार्‍या सरकारी, खाजगी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी व्यवस्था अशा संस्थांमध्ये पाहायला मिळते. पुढे – मागे मोपा विमानतळ झाल्यास एव्हिएशन क्षेत्राशी निगडीत करीयरला मागणी असेल हे लक्षात घेऊन या क्षेत्राशी निगडीत कोर्सेसचा विचार तुम्ही करू शकता. पायलट होण्यासाठी विचार करू शकता अर्थात ह्यासाठी तुम्हाला गोव्याबाहेर जावे लागेल. नर्सिंग क्षेत्र भरपूर मागणी असणारे क्षेत्र आहे. सरकारी, खाजगी संस्थांमधून ह्याचे शिक्षण तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश परीक्षा अनिवार्य असते हे आपण विसरू नये. संगणक शिक्षणामध्ये आज अनेक कोर्सेस महाविद्यालयातून तसेच खाजगी संस्थांमधून उपलब्ध आहेत. पण हे कोर्सेस करण्यापूर्वी ह्याची संधी बंगलुरु, पुणे, हैद्राबाद सारख्या ठिकाणी अधिक आहे याची माहिती घेऊन आपल्याला गोवा सोडून जावे लागेल याची मानसिक तयारी ठेऊनच प्रवेश घ्यावा. नाहीतर तुटपुंज्या पगारावर समाधान मानून नोकरी करायची तयारी हवी.
कला असो वाणिज्य की विज्ञान या सर्व शाखेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विचार करू शकतात. त्यासाठी अकरावीपासूनच तयारी करायला हवी. गोव्यात मार्गदर्शनाची तेवढी सोय नसल्याने गोव्याबाहेर जाऊन तयारी करण्याची आपली तयारी असेल तर ह्यामध्ये यश मिळू शकते. बारावी विज्ञान शाखेच्या विध्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची माहिती त्या त्या शाळेतून मिळतच असते. गोवा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच जीसिईटी नावाने ओळखली जाणारी ही परीक्षा प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये घेतली जाते. यंदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे मेडिकलला जाऊ इच्छिणार्‍यांना नीट परीक्षा द्यावी लागेल. पण अभियांत्रिकी, फार्मसी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, पॅरामेडिकल पदवी परीक्षेसाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. यासाठी विशेष तयारी करावी लागते. गोव्यात काही ठिकाणी ह्या परीक्षेची माहिती देणारे शिकवणी वर्ग आहेत. नियमित अभ्यासाबरोबरच ह्या परीक्षेची तयारी करावी लागते. याशिवाय अलीकडे गोवा सरकारने पाच पॅरा-मेडिकल कोर्सेसही सुरु केले आहेत. दहावी असो की बारावी प्रत्येक विध्यार्थ्याने निकालापूर्वी किंवा निकालानंतर वेळात वेळ काढून या कोर्सेसची माहिती घ्यावी. जरा वेगळा कोर्स करावासा वाटेल तर त्या संस्थेची माहिती घ्यावी. ती संस्था सरकारमान्य संस्था आहे की नाही? याची माहिती मिळवावी. शक्यतो त्या संस्थेमधल्या प्राध्यापक वर्गाची माहिती, माजी विद्यार्थ्याकडून तेथील दर्जाबद्दलची माहिती काढून नंतरच आपला निर्णय नक्की करावा. संकेतस्थळाना भेट देऊन तुम्ही घरबसल्या जरी माहिती मिळवू शकला तरी त्या संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी. आपल्या घरापासून संस्था किती जवळ.. किती दूर ह्याचा विचार न करता त्यामध्ये मिळणारे शिक्षण माझे भवितव्य योग्य रित्या घडवेल का? ह्याचा विचार प्रामुख्याने करावा.
कुठल्याही शाखेत आपण प्रवेश घेतला तरी नियमित वृतपत्र वाचन, यात एखादेतरी राष्ट्रीय वृतपत्र असावे. योजना, रोजगार समाचार, स्पर्धा मासिके, वार्षिकी आदीचे वाचन करण्याची सवय लावावी. वेळ पडल्यास वर्गणी लावून ती स्वत:साठी मागवावी. आणि हो.. हे करताना मोबाइलचा वापर कमी करत जावे. मोटरसायकल पासून चार हात दूर रहावे. फेसबुक, ट्विटर सारखे वेळखाऊ आणि डोक्यात नको ते विचार यायला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी आपण वापरायला हव्याच असे नाही. जे उत्तीर्ण झालेत त्या सर्वांचे अगोदरच अभिनंदन. तुमच्या पुढील प्रवेशाला आणि भावी कारकिर्दीला शुभेच्छा! बारावीत ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी निराश न होता, सप्लीमेंट्रि परीक्षेची तयारी करून पुढे वाटचाल करावी.