चतुर

0
1306

खूप तरतरीत, हुशार, खटपट्या, खट्याळ, कामसू, हरहुन्नरी, मेहनती आणि अखंड भ्रमंती असा सगळा चटपटीत मामला म्हणजे चतुर कीडा! चतुर हे त्याचं कागदोपत्री लागलेलं नाव म्हणूया. आपण कोकणात यांना ‘पतंग’ म्हणतो, ‘भिंगर्‍या’ म्हणतो, ‘भिरमुटल्या’ म्हणतो. गोव्यात ‘भिमुट्ट्यो’ म्हणतात. पाऊस ओसरतो. रानात न् शेताभातांत दसर्‍याचं सोनं पिकू लागतं आणि त्या सोनेरी गवतावर तांबड्या, पिवळ्या, काळ्या, सोनेरी भिंगर्‍या गिरक्या घेऊ लागतात.
‘गोल गोल राणी, एवढं एवढं पाणी…’ म्हणत आपण कसे हात पसरून गोल गोल फिरायचो (नि शेवटी कशी भोवळ यायची) तशा या भिंगर्‍या भोवंडत असतात. त्या फिरताना दिसल्या की मी काळवत्री दगडाच्या व मातीच्या भिंतींच्या माझ्या घराच्या अंगणात पोचते, जिथे मी, सुनिता, राणी, वंदू, कल्पू आणखी कुणीकुणी कोंडाळं करून बसलेल्या असतो…
अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जीभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना
घरचा पाहुणा उठला
जीभेचा फोड फु….ट….ला!
दोन्ही हात उपडे ठेवायचे आणि या गाण्यातला एकेक शब्द एकेका बोटावर घालत फु….ट….ला! मधला ‘ला’ ज्या बोटावर येईल ते बोट दुमडायचं. अशी एकेक करत सगळी बोटं दुमडायची, पुन्हा सगळी उघडायची… अशी प्रत्येकाची दहा बोटं होईपर्यंत खेळ चालू! कट्‌ट्यावर हा खेळ रंगात यायचा.. गडग्यापलीकडे माजलेलं पिवळं गवत, त्याचा करडा वास सगळीकडे भरून उरलेला. नवरात्रीच्या दिवसांतली सोनपिवळी संध्याकाळ तिरप्या किरणांचे सूर धरणारी. गवतवासाच्या वार्‍यावर डोलणारी… तिच्या सोनेरी नजरेतून आता वेगवान ‘चतुर’ बाण सुटू लागलेले… आसमंतात गिरक्या घेऊ लागलेले… थोड्याच वेळात ‘अटक मटक’ बंद पडे नि पाय गवतावर नाचणार्‍या चतुरांकडे वळत…
चतुरांना पकडून दोरा बांधणं मला मुळीच आवडायचं नाही. किती सांगितलं तरी बाळ्या, मंग्या गुरव वगैरे कंपनी ऐकायचीच नाहीत. ‘एक मेला म्हणून काय झालं?’ असं आणखी उलट विचारत तेव्हा खरोखरच दोरा झाळकुटीत अडकून चतुर जोरजोरात पंख हलवत अखेरची धडपड करताना दिसे. धावत जाऊन दोरा सोडवताना तो निपचित होऊन जाई… जणू मीच त्याला मारला की काय असं उगीच वाटत राही…
अजूनही तांबड्या चतुराचं पोट दुपारच्या उन्हात टळटळीत लाल दिसलं की हे सगळं यवजतं नि त्याला दोरा बांधण्याच्या कल्पनेने अंग शिरशिरतं नुसतं! मग मी त्याच्या पंखांवरची जाळीदार पानांची नक्षी बघत राहते. ते पारदर्शक पंख उन्हात किती सुरेख दिसतात. त्यांचे वाटकुळ्या डोक्यावरचे टळटळीत डोळे बघितलेयत कधी जवळून? कसे अगदी बटणं लावल्यासारखे दिसतात नै? त्याच्या डोळ्यात म्हणे हजारो भिंगं असतात. तो कुठेही कसेही डोळे फिरवू शकतो व कुठल्याही अँगलमधून बघू शकतो हे एक त्याचं वैशिष्ट्य.
…माझे बाबा कागदाच्या पट्‌ट्या कापून सुरेख भिंगरी करीत. कागदाची एक पट्टी दुसर्‍या पट्टीत बेरीज चिन्हासारखी नुसती अडकवायची की भिंगरी तयार! ती केरसुणीच्या हिराच्या टोकावर ठेवायची नि वार्‍याच्या दिशेने धरायची की वेगाने गरागरा फिरू लागणार. चौकोनी कागदाची चार पाकळ्यांची मस्त भिंगरीही बाबा काठीला टोचून देत. ती हातात घेऊन धावत सुटलं की जाम गरगर फिरे… आणि हवेत फिरणार्‍या भिंगर्‍यांच्या पुढे गेल्यासारखं वाटे!
या भिंगर्‍यांना आताची मुलं ‘हेलिकॉप्टर’ म्हणतात. कालाय तस्मै! नव्या युगात आपल्या ‘भिरमुटल्या’ मॉडर्न झाल्यायत! अर्थात नाव मॉडर्न झालं तरी त्यांची जगण्याची स्टाईल बदलली नाहीए. त्यांचं ‘चतुरनृत्य’ बदललं नाही. मोबाईल टॉवर्स, वाहनांचे धूर, हवेची प्रदूषणं यांना तोंड देत या हेलिकॉप्टरांचे समूहच्या समूह आजही गवतात झाडकळीत नीट नांदतात. नवरात्र आलं की हवेत यांचा दांडिया सुरू होतो. वेगात उभ्या-आडव्या, तिरप्या टिपर्‍या फिरवत त्या नाचू लागतात. वेगात जाताना मध्येच पटकन रिव्हर्स घेतात. वेलांट्या-कोलांट्या मारतात. पार्टीतल्यासारखा तरंगत डान्स करतात. भक्ष्य मिळवणं, पकडणं, त्याला खाणं आणि त्यांचा अगदी नर-मादी संयोगसुद्धा हवेतल्या हवेतच होतो. अनेकदा जोड्या-जोड्या एकमेकांच्या जवळ फिरताना दिसतात, तोच त्यांचा प्रणय. मग अंडी, अळी, कोश व कीटक या अवस्थांमधून फुलपाखरासारखाच यांचा जीवनप्रवास होतो…
माझ्या सासूबाई त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात. त्यांची काकी म्हणायची, भिरमुटल्या माटव घालायला लागल्या… आता पाऊस येणार… उभे, आडवे, तिरपे, धागे घालून हस्ताच्या पावसापासून रक्षण होण्यासाठी भिरमुटल्या मांडव विणतात अशी एक सुरेख कल्पना लोकमानसाने केली आहे.
परवा कुठेतरी वाचलं की लाखो-करोडो वर्षापूर्वीपासून पृथ्वीवर चतुरांचं अस्तित्व आहे. तेव्हा त्याला खूप मोठे पंख होते. ‘ड्रॅगन फ्लॅय’ हे नाव कदाचित त्याला त्या पंखांवरूनच पडलेलं आहे. एक साधा कीटक असला तरी त्याचं जीवनचक्रात खूप महत्त्वाचं स्थान आहे. पृथ्वीवर जगणार्‍या जीवांमध्ये ७५% टक्के जाती किटकांच्या आहेत व ते जीवनसाखळीचे पहिले दुवे आहेत. आणि आपण किती सहज ‘क्षुद्र कीटक’ हा शब्द वापरतो! अनाकलनीय आयुष्य जगणार्‍या आपल्या ‘भिंगर्‍या’ खरं तर पायाला भिंगरी लावून या कीड्या-मुंग्यांसारख्याच अव्याहतपणे धावताहेत…
मला याक्षणी सर्कशीतले झुले आठवतायत. सर्कशीचा शेवटचा चित्तथरारक झुल्यांचा खेळ. खाली जाळं बांधलं जायचं. उंच बांधलेल्या झुल्यांवर पांढर्‍या ड्रेसमधले पुरुष व मुली सरसर चढायच्या. म्युझिक सुरू झाल्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत झुले सुटायचे. हातातली दांडी सोडून बरोब्बर टायमिंगमध्ये समोर आलेला झुला पकडला जायचा. श्वास रोधून, डोळे विस्फारून आपण बघत राहायचो. क्षणोक्षणी काळजात धस्स् होत राहायचं. एका लयीत अत्यंत सफाईदारपणे झुले झुलत राहायचे… मग विदूषक यायचा. खालच्या एका झुल्याला लोंबकळायचा प्रयत्न करायचा. अर्थातच तो त्यात अयशस्वी व्हायचा आणि त्याची गुटली खाली बांधलेल्या जाळ्यावर पडायची!
मी एखाद्या गच्च संध्याकाळी माझ्या घराभोवती पिंगा घालणार्‍या भिंगर्‍या बघत असते. त्यांचा झुल्यांचा खेळ रंगात आलेला असतो. माझ्या मनात अटक मटक सुरू होतं. भिंग भिंग भिंगोरी सुरू होतं. भूतकाळाचा भोवरा मला खेचून मागे नेऊ लागतो आणि वास्तवाचा गरगर पंखा मला फोलपटागत पुढे उडवू लागतो. मी चतुरासारखा एक कीटक होऊन दोघांच्या कात्रीत सापडते.. भिंगर्‍यांकडे नुसती बघत राहते… रंगीत कपडे, रंगीत टोपी अन् तोंडाला रंग फासलेला माझ्या जगण्याचा विदूषक माझ्या या फसगतीला हसत राहतो… समोर विहरणार्‍या भिंगर्‍यांसारखं झुलायचा प्रयत्न करीत राहतो…