चतुरस्त्र लेखक, विद्वान संपादक ः चंद्रकांत केणी

0
153

भाई नायक (मडगाव)

शब्दांकन – अनिल पै

कोंकणी आग्रहाचा मुद्दा न सोडणारे, पण त्यासाठी कटुता निर्माण करण्याची किंवा दुसर्‍या भाषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही असे मानणारे भाषिक कार्यकर्ते, संघटक व सर्वांशी समन्वय साधणारे एक प्रसिद्ध लेखक म्हणून चंद्रकांतबाब गोव्याच्या स्मरणात राहतील.

मानवतेच्या एका अखंड परंपरेचा आपण तत्कालीक दुवा आहोत, याची जाणीव सामान्य माणसाला क्वचितच असते, परंतु मठग्रामस्थ हिंदुसभेचे कार्य करीत असताना हे महान कार्य आपल्या मार्फत करून घेणारी अदृश्य शक्ती आहे याची जाणीव असलेले कै. चंद्रकांत केणी हे मठग्रामस्थ हिंदू सभेचा एक भक्कम कणा होते. मठग्रामस्थांच्या आद्य घराण्यामध्ये येत असलेल्या केणी कुटुंबियांचा मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्थापनेशी – तत्पूर्वी हिंदू कैवारी सार्वजनिक सभेच्या उपक्रमाशी संबंध होता. अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माझे आजोबा कै. नरसिंह नायक, वडील कै. बाबू (अनंत) न. नायक व माझ्याशी, तसेच आमच्या कुटुंबाशी त्यांचा जवळचा संबंध होता. ते आमच्या कुटुंबाचे एक घटक, मार्गदर्शक, सल्लागार, सुखदुःखात समरस होणारे सद्गृहस्थ होते. त्यांची आमच्या चार पिढ्यांशी जवळीक होती. चंद्रकांतबाब हे माझे पप्पा कै. बाबू नायक यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मठग्रामस्थ हिंदू सभेचे तीस वर्षे सहसचिव व सरचिटणीस होते. नंतर माझ्या नेतृत्वाखालील समितीतही ते अध्यक्ष होते. पप्पांच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यात ते साथीदार होते. सार्वजनिक जीवनात पप्पा व त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी मानत.

मी शाळेत शिकत होतो, तेव्हापासून त्यांना मी ओळखायचो. जनमत कौलाच्या वेळी माझ्या पप्पांची म. गो. पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली होती. तेव्हा गोवा वेगळा ठेवण्यासाठी काय करता येईल यावर चंद्रकांतबाब त्यांच्याशी चर्चा करीत असत. पप्पाही त्यांच्याबरोबर काही ठिकाणी कामासाठी जात असलेले मी पाहिले आहे. पप्पांच्या राजकीय जीवनात त्यांनी नेहमी साथ दिली. राजकीय निर्णय घेतानाही योग्य सल्ला त्यांनी दिला. जेव्हा १९८५ मध्ये पप्पांचा मडगाव मतदारसंघात पराभव झाला, कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आली. त्यावेळी ‘राष्ट्रमत’ दैनिकात चंद्रकांतबाबनी ‘गड आला, पण सिंह गेला’च्या मथळ्याखाली विचारपूर्वक लेख लिहून पप्पांच्या कर्तबगारीचे वर्णन केले होते.

माझे आजोबा नरसिंह नायक यांचा शणै गोंयबाब यांच्याशी परिचय होता. दोघांचाही पत्रव्यवहार चालू होता. राष्ट्रमत सुरू झाल्यापासून श्री. केणी व अण्णा फणसे यांच्यामुळे पप्पा वर्तमानपत्रात रस घेत. कोणतेही वृत्त ते चंद्रकांतबाब यांना आधी देत. मठग्रामस्थ हिंदू सभेच्या इमारत बांधकामापासून शैक्षणिक दर्जा वाढविण्यात, शिक्षकांच्या नेमणुकांपर्यंतच्या बैठकीस चंद्रकांतबाब येत असत. संस्थेचा हीरक महोत्सव, अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी वक्त्याची निवड करण्याचे काम तेच करीत. मठग्रामस्थ हिंदू सभेच्या सर्वांगीण कार्यातील त्यांच्या महान सहभागाबद्दल त्यांच्या दुःखद निधनानंतर विशेष समारंभात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करून, ते छायाचित्र शाळेत लावलेले आहे.

पप्पांच्या राजकीय जीवनाशी जवळीक असलेली व्यक्ती, मार्गदर्शक तेच होते. सभासंमेलनातील भाषणाचे टिपण तयार करून देणे, पत्रके तयार करणे यात त्यांचा हातखंडा होता. ते एक विचारवंत व दूरदृष्टी असलेले कल्पक होते. प्रतिस्पर्ध्यांवरही सभ्य शब्दांत पत्रके काढायचे. पप्पा फक्त सांगायचे की, हे अशा तर्‍हेने पत्रक काढायचे आहे. मनावर आघात करणार्‍या शब्दांत पत्रके जगदीश राव तयार करीत. पण चंद्रकांत बाबना ती रूचत नसत. ते सभ्य शब्दांत, पण मार्मिक अशी पत्रके तयार करीत. प्रत्येक निवडणुकीच्यावेळी बॅनरवरील प्रचाराची घोषणा तेच तयार करीत. राजकीय डावपेच दोघेही बसून चर्चा करून, पप्पा पुढे जात असत. तसेच आमच्या निवासस्थानाला माझे भाऊ विनय नायक यांच्या घराला नाव तसेच बांधकाम कंपनीला ‘रंगवी’ हे नाव, इमारत संकुलाला नावही चंद्रकांतबाबनी तयार करून दिली. त्या बाबतीत त्यांचे बुद्धीचातुर्य वाखाणण्याजोगे होते.

गोवा मुक्तीनंतर गोव्यात आल्यानंतर पप्पांशी त्यांचा संबंध दृढ झाला. ते दररोज सकाळी एक तास आमच्या घरी येत. कधी पप्पा त्यांच्या आके येथील घरी जात. ते एक दिवस न भेटल्यास पप्पांना चैन पडत नसे. ‘राष्ट्रमत’मध्ये जाण्याआधी ते आमच्या घरी येत. पप्पांनी त्यांचा पर्तगाळ मठाशी संबंध जोडला. त्याअगोदर मठाशी त्यांचा संबंध नव्हता. पर्तगाळ मठाधीश श्रीमद् द्वारकानाथतीर्थ मडगाव विद्याभुवनात आले, त्यावेळी पप्पांनी त्यांना तेथे नेले व प. पू. श्री स्वामीजींशी परिचय करून दिला. त्यावेळी श्री स्वामीजींनी त्यांना स्वागताचे भाषण करण्याचा आदेश दिला. तेव्हापासून ते मठाशी जोडले गेले. त्यानंतर पप्पा व ते नेहमीच बरोबर मठाच्या कार्यात सहभागी होत असत. कौटुंबिकबाबतींतही त्यांचा सल्ला मोलाचा असे. त्यात कोणताच स्वार्थ नसे. पप्पा हयात असताना व त्यानंतरही मी त्यांचाच सल्ला घेत असे. तेथे वयाचे भान विसरून आपलाच पुत्र मानून ते मार्गदर्शन करीत.

दैनिक ‘राष्ट्रमत’ वर आर्थिक संकटे येत, त्यावेळी पप्पा त्यांच्याशी चर्चा करून जाहिरातरूपाने मदत करण्यासाठी आपले मित्र, हितचिंतक व उद्योगपतींनाही फोन करीत असत, हे मी पाहिले आहे आणि ते दैनिक कसे चालवितात याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत. राष्ट्रमताच्या प्रत्येक कार्यात पप्पांचा सहभाग होता तो चंद्रकांत केणींमुळेच! ते कल्पक, भविष्याचा वेध घेणारे, दूरदृष्टीचे चतुरस्त्र लेखक, गांधीवादी विचारवंत, कुशल पत्रकार होते, तसेच फार मोठे संघटकही होते. वृद्ध, तरूण, मुलांशीही ते समरस होत असताना मी जवळून पाहिले आहे. पत्रकारितेत विधिनियम, नैतिकता सांभाळून ते व्रत म्हणून त्यांनी पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे चालविले. जनमत कौल जिंकण्यात ‘राष्ट्रमत’ व चंद्रकांत केणी तसेच त्यांच्या परिवाराचा बराच हिस्सा आहे. राष्ट्रमतातून त्यांनी गोव्याच्या भवितव्यासाठी मार्गदर्शन केले. तेही कधी मार्मिक तर कधी प्रबोधनाच्या भाषेत. त्यांच्या स्वभावातील मृदुता कालेलकरांच्या मताप्रमाणे त्यांच्या धर्मश्रद्धेमुळे आलेली असावी. शेवटच्या पाच-सात वर्षांत ते पार्किन्सनसारख्या असाध्य व्याधीने त्रस्त होते. तरीही शेवटच्या श्‍वासापर्यंत ते लिहीत राहिले. कोंकणी आग्रहाचा मुद्दा न सोडणारे, पण त्यासाठी कटुता निर्माण करण्याची किंवा दुसर्‍या भाषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही असे मानणारे भाषिक कार्यकर्ते, संघटक व सर्वांशी समन्वय साधणारे एक प्रसिद्ध लेखक म्हणून चंद्रकांतबाब गोव्याच्या स्मरणात राहतील.