चक्कर येते…. सांभाळा..!!

0
2070

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
चक्कर येणे हे कदाचित साधेही असू शकते. वरवर दिसणारी ही बाब भयानक रूपही घेऊ शकते. चक्कर, घेरी, फिट् या सगळ्या गोष्टी एकच सांगतात. आज आपल्याला ‘व्हर्टायगो’ या विषयावर बोलायचे आहे…
जेव्हा माणूस स्वतःभोवती फिरतो किंवा बाहेरचे जग माणसाभोवती फिरते त्यालाच आपण व्हर्टायगो असे म्हणतो. याचे दोन भाग आहेत. पहिला – यात रुग्णाला जग आपल्याभोवती फिरतेय असे वाटते. खरे तर तसे ते फिरत नसते. व दुसरे म्हणजे रुग्णाचा तोल सुटतो व तो बाहेरच्या वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो.कितीतरी आजारांमध्ये अशा प्रकारची भावना आपल्याला होते. मुले शाळेत सकाळची वंदना करताना किंवा कसरत करताना, उन्हात खेळताना वगैरे चक्कर येऊन पडतात, ज्यात थकवा आल्यावर, उपवास केल्यावर शरीरातील साखर कमी होते व मग चक्कर येणे स्वाभाविक असते. हे एक त्याचे कारण आहे व हे आपण आपल्या जीवनात अनुभवलंही असणार. पण कैकवेळा ही कुठल्यातरी आजाराची धोक्याची घंटा असते. केव्हा केव्हा चक्कर येते तेव्हा आणखीही वेगळी लक्षणे आपल्याला आढळतात. ती म्हणजे ओकारी, फिके पडणे, घामाघूम होणे, डोके जड होणे, मानसिक दाब, वगैरे.
खालील काही लक्षणेही आढळतात-
१. रोग्याला आपण धाडकन खाली पडतो असे वाटते
२. डोळ्यांसमोर काजवे चमकतात, चित्रे डबल दिसू लागतात.
३. हात-पाय गळतात.
४. फिकेपणा, घाम येणे, कातडी थंडगार पडणे
५. नाडीचे ठोके वाढतात.
६. रक्तदाब वाढतो किंवा कमी होतो.
७. उलटी, चक्कर, हगवणही होते.
८. कानात आवाज येतात किंवा कमी ऐकू येते.
९. स्मृतीभ्रंश ही होतो.
ज्याप्रमाणे रोग्याला आजार असतो त्याप्रमाणे वरील लक्षणे दिसून येतात. आम्ही केव्हा केव्हा यावर सहसा जास्त विचार करत नाही. साधी चक्कर आली म्हणतो, तोंडावर पाणी मारतो, ग्लुकोजचे पाणी पितो, सकाळपासून काही खाल्ले नाही म्हणत काहीतरी खातो. फक्त एवढंच करून भागत नाही. वय झाल्यावर माणसाने झोपून उठताना हळुवार उठावे, झटक्याने उठल्यावर रक्तदाब घसरतो व मग आपल्याला चक्कर येते. तेव्हा सांभाळा, कॉटवरून उठताना हळुवार उठा!
आम्ही या मुद्यावर जास्त विचार करत नाही व होत्याचे नव्हते होऊन जाते. एकदम झटक्यात आम्ही कॉटवरून उठतो… चक्कर येते… खाली कोसळतो… डोक्याला इजा होते, हात-पाय मोडतात. मग म्हातारपणी हाडे सांधत नाहीत… जन्माचे अपंगत्व येते.. सांभाळा. या धोक्याचे परिणाम वाईट आहेत.
चक्कर येण्याची कारणे जाणून घेऊया.
१) मानसिक – हिस्टेरिया
२) मेंदूचे आजार – फट्, मायग्रेन वा मेंदूचे ट्यूमर
३) डोक्याचे विकार – उंचीवरून खाली पाहणे, चालत्या गाडीमधून बाहेर बघणे.
४) मेंदूच्या भागात (सेरिबेलम) आजार होणे, ट्यूमर होणे, मेंदूवर औषधांचे गंभीर दुष्परिणाम होणे.
५) कानाचे आजार होणे.
६) कान गळणे, कानात मळ(वॅक्स) होणे, पांडुरोग (ऍनिमिया) होणे, डोक्यातील दाब वाढणे, रक्तदाब वाढणे.
७) मानेचे विकार – स्पॉंडिलोसीस.
सध्याच्या जगात रोगी डॉक्टरांकडे येतात, सांगतात ‘‘डॉक्टर मला चक्कर येते, डॉक्टर माझ्यासभोवतीचे जग माझ्याभोवती फिरतेय. केव्हा केव्हा पलंगावर असतानाही आपल्याला किंचित मान हलवली तर चक्कर येते.
चक्कर आल्यावर सरळ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा. पेशंट केव्हा केव्हा डॉक्टरकडे येतात – तेच डॉक्टरांना सांगतात- डॉक्टर आपला प्रेशर बघा! हे साहजिकच आहे.
चक्कर हे लक्षण आहे. त्याचे निदान कसे करायचे?…
१. नाक, कान, तपासून घ्या. ऐकायला कमी येत असेल तर त्याची कारणे शोधा.
२. डोक्याचा एक्स-रे काढून घ्या.
३. डोळ्यांची तपासणी करून घ्या.
४. सेरेब्रल अँजिओग्राफी करून घ्या.
५. मानेचा एक्स-रे काढून घ्या.
६. रक्तदाब तपासून घ्या.
७. रक्तातील साखर तपासा.
हे सगळं तुम्ही करू नका. डॉक्टरच तुम्हाला याविषयी सल्ला देतील.. वाट बघा. नाहीतर आजचे रोगी.. म्हणतात कसे ‘‘डॉक्टरसाहेब मी सगळ्या वरील तपासण्या केल्या. पण चक्कर काही जात नाही.
अहो, अशानेही काही ना काही बाकी राहिले असणारच|
हल्ली मानेचे विकार जास्त उद्भवलेत. मान हलवल्यावर चक्कर येते. कामावर जाताना प्रत्येकजण दुचाकी वापरतो. कमी किमतीचे, स्वस्त हेल्मेट वापरतो. ते जास्तवेळ परिधान केल्यावर मान आखडते. मग चक्कर यायला सुरुवात होते.
कुठल्याही प्रकारचे व्यायाम करायला माणसास वेळ नसतो. दिवसाचे ८-१० तास तो ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेला असतो व घरी परतल्यावर टीव्हीसमोर बाकी वेळ घालवतो. तेव्हा मानेचे व कंबरेचे व्यायाम योग्य रित्या, योग्य प्रमाणात, डॉक्टरी सल्ल्यानुसार करणे आज गरजेचे वाटते.
चक्कर आल्यावर काय करावे..?
आरामशीर झोपावे किंवा पडून रहावे.
पडताना पाय थोडे वर व डोकेखाली करून झोपावे.
चक्कर येऊन गेल्यावरच्या काळात डॉक्टरी सल्ला घ्यावा व उपचार करून घ्यावा, ज्यामुळे रोग्याच्या आजाराविषयीचे पक्के निदान होणे गरजेचे आहे. डॉक्टरी सल्ला घेतला व चक्कर पळाली…असे म्हणत बेफिकिर होणे बरे नाही. त्यावर लक्ष देणे. परत चक्कर आली तर पुढे ज्येष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. याबाबत नक्की रोगाचे निदान झाल्याशिवाय स्वस्थ बसणे योग्य ठरणार नाही.
कधी कधी हृदयाच्या आजारात ठोके चुकतात व चक्कर येते.
आजच्या जगात रक्तातील साखर चढणे किंवा उतरणे सहज झालेय.
वय झाल्यावर रक्तदाब तपासून घ्या. कारण प्रत्येक तीन माणसात एक ‘‘रक्तदाब’’ वाढलेला रोगी आपल्याला आढळतो.
एकदा एका डॉक्टरांना चक्कर आली. कॉटवर झोपल्यावरही चक्कर चालूच होती. त्यांना हॉस्पिटलात ऍडमिट व्हावे लागले. क्षणात डॉक्टर सेवेला हजर झाले. सगळ्या तपासण्या झाल्या.. उपचार झाले.. दहा दिवस डॉक्टर झोपू शकले नव्हते.. सताड डोळे उघडे ठेवून ते पलंगावर पडून होते. शेवटी ठरले.. कानाच्या आजारामुळे त्यांना चक्कर येत होती.
त्या दिवशी एका पेशंटचे नातलग मला म्हणाले, ‘‘रोग्याचा फक्त तोल जात होता, डॉक्टरी उपचार चालू होते, तर हाडाचे डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘डोक्याचा एक्स-रे काढा.’’ तर नवलच घडले. मेंदूत एका भागात ट्यूमर दिसला. ऑपरेशन झाले. आज तो रोगी बरा झाला आहे.
चक्कर साधी असते व भयानकही असू शकते. त्यावर आपण घरगुती उपचार थोडेफार करायला हरकत नसावी, पण जास्त वेळ काढला तर मरणाचे आमंत्रण केव्हा येईल सांगता येत नाही.
आत्ताच्या आधुनिक जगात, रोग ही आधुनिक आलेत. खाण्याचे प्रकार वाढलेत. त्यांची नावेही वाढलीत. त्याचबरोबर रोगही वाढलेत. त्यांचीही नावे बदललेली आहेत. चक्कर येते… थांबा.. सांभाळा. डॉक्टरी सल्ला घ्या. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला भयानक रोग होऊ शकतो. स्वतःला जपा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!