चकवाचांदण एका निराळ्या जीवनपथिकाची रसमय कहाणी

0
604

जीवनाच्या सैरभर क्षणी जेव्हा मी मारुती चितमपल्लींचे ‘चकवाचांदण’ हे सहाशे सत्त्याऐंशी पृष्ठांचे आत्मचरित्र वाचतो तेव्हा माझ्या मनाचा थकवा नाहीसा होतो. अनेकदा वाचूनही तोचतोचपणा जाणवत नाही. पंचेंद्रियांनी प्रत्यक्ष सृष्टीतील प्रतिसृष्टी निर्मिलेल्या या सृजनशील आत्म्यासमोर मी नतमस्तक होतो. अतिंद्रिय शक्तीकडे नेणार्‍या या प्रज्ञावंताची आणि प्रतिभावंताची झेप पाहून त्याने आपले नाव सार्थ केले असे वाटायला लागते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे धनंजय कीरांच्या ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलून गेले होते. आत्मचरित्र म्हणजे केवळ ‘आत्म’ म्हणजे ‘स्व’चे दर्शन. ‘दर्शन’ या शब्दालाही अनेक कंगोरे आहेत. ‘आत्मा’ ज्याला कळलेला आहे त्याने लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र असेही ते पुढे म्हणाले होते. केवढी मोठी जोखीम ही! ‘स्व’ला शक्य तितके टाळून आत्म्याचे प्रांजळ, पारदर्शी, प्रवाही आणि प्रसन्न शैलीत आत्मचरित्र लिहिणे हे त्याहून कठीण. जीवनाच्या अनोख्या, गूढ, रम्य आणि हिरव्या वाटा चोखाळणार्‍या अवलियांमध्ये चितमपल्लींची गणना अवश्यमेव करता येईल.
जीवनसाधना करीत असताना अनेक पथदर्शक भेटतात. पण कुणाकडून काय घ्यावे हे डोळसपणे ज्याला कळलेले आहे त्यालाच जीवनपथिक म्हणता येईल. ५ नोव्हेंबर २०१८ ला चितमपल्ली ८६ वर्षांची परिक्रमा पूर्ण करतील. सृष्टीतील वेगळ्या आणि हिरव्या वाटांवरून चालणार्‍या या पथिकाला ‘महर्षी’ म्हणावे लागेल. ‘चालणार्‍याचे भाग्य चालते’ असे उपनिषदकारांनी म्हणून ठेवलेले आहेच.
चितमपल्ली सोलापूर येथील दयानंद कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यावर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी कोईमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये गेले. या क्षेत्रातील भ्रमंती चालूच ठेवली. बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश) आणि डेहराडून इत्यादी ठिकाणी वने आणि वन्यजीवनविषयक संस्थांमधून त्यांनी इमानेइतबारे शिक्षण घेतले. उच्च शिक्षणाने तृतीय नेत्र लाभलेल्या अंतःचक्षूंनी ‘हिरवे जग’ पाहिले. प्राणी, पक्षी, जलचरसृष्टी यांचे सर्वांगपरिपूर्ण दर्शन घेतले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत राहिले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून १९९० साली सेवानिवृत्त झाले. पद महत्त्वाचे होते, पण प्रवास काटेरी होता. अनेक ठिकाणी संघर्षास तोंड द्यावे लागते. त्याचे तपशील ‘चकवाचांदण’मध्ये आढळतात. प्रांजळ वृत्ती आहे, पण कुणाविषयी कटुता नाही. असे लेखन करणे हे कठीण व्रत असते. पण अशा प्रकारच्या दुव्यांमधून न लिहिलेल्या अनुभवांची व्रतस्थ साधना आकळते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्प यांच्या उभारणीसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. कल्पकता वापरली. मराठीतील आणि भारतातील अन्यभाषिक साहित्यिक चितमपल्लींच्या मैत्रीखातर सहवासासाठी आणि जीवनातील विश्रब्ध, संपन्न स्थळ लाभावे म्हणून आपुलकीने मारुती चितमपल्ली यांच्याकडे यायचे. ही झाली त्यांची उपजीविका.
पण चितमपल्ली यांची जीविका समजून घेण्यासारखी आहे. पक्षिजीवन आणि वनविद्या यांचा मूलस्रोत आपल्या ज्ञानपरंपरेत आणि संस्कृत भाषेत आहे हे त्यांनी जाणले. नांदेड येथील यज्ञेश्‍वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पंडित गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे, वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे एकलव्यनिष्ठेने संस्कृतचे रीतसर अध्ययन केले. पाश्‍चात्त्य वाङ्‌मयाचे तितक्याच निष्ठेने वाचन केले. ‘चकवाचांदण’मधील ‘साहित्यिकांच्या सहवासात’ या शीर्षकाखाली ठिकठिकाणी आलेले तपशील यासंदर्भात अधोरेखित करावेसे वाटतात. नवेगावबांधचे ज्येष्ठ सुहृद माधवराव पाटील, गो. नी. दांडेकर, डॉ. सलिम अली, त्याचे स्वप्नांचे सहोदर चित्रकार आलमेलकर, व्यंकटेश माडगूळकर, प्राचार्य नरहर कुरुंदकर, प्राचार्य राम शेवाळकर, बाबा आमटे, जी. ए. कुलकर्णी या व्यक्ती मारुती चितमपल्लींच्या भावविश्‍वात प्रोत्साहक शक्ती म्हणून आल्या नसत्या तर… चितमपल्लींच्या व्यक्तिमत्त्वाचा चढता आलेख पाहताना अल्पाक्षरांत त्यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रे पुनः पुन्हा न्याहाळावीत. त्यांत ओथंबून आलेली कृतज्ञतेची भावना महत्त्वाची की समर्थ, समर्पक शब्दकळा महत्त्वाची की ज्ञानसाधनेची आत्यंतिक ओढ महत्त्वाची? एक गोष्ट खरी, या सार्‍यांचे रसायन होऊन चितमपल्लींचे व्यक्तित्व आणि असामान्य कर्तृत्व बहराला आले. कोणत्याही प्रकारची ज्ञानपरंपरेची पार्श्‍वभूमी नसताना सोलापूरच्या अत्यंत गरीब गिरणमजुराच्या घरात ज्ञानाची पहाट एकाएकी कशी काय उजाडली? त्यांचे असीम ग्रंथप्रेम आणि जबर इच्छाशक्ती याला कारणीभूत ठरली. यादृष्टीने त्यांचे ‘शब्दांचे धन’ हे पुस्तक, ‘ग्रंथ पुण्यसंपत्ती’ हा त्यांचा ‘मारुती चितमपत्ती ः व्यष्टी आणि सृष्टी. संपादक ः डॉ. सुहास पुजारी’ मधील हा लेख आवर्जून वाचावा. ‘चकवाचांदण’मध्ये यासंबंधी अनेक दुवे आढळतात. पण ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी गोठवून सांगणे ही अत्यंत कठीण बाब आहे. त्यासाठी ‘चकवाचांदण’च्या अच्छोद सरोवरात मनसोक्त अवगाहन करायला हवे. या अवगाहनानंतर काय गवसते? वीस-एकवीस ग्रंथांमधून आयुष्याचे नवनीत अनुभवायला मिळते. शब्द ओळखीचेच; पण त्यांना अनुभूतीचा स्पर्श नव्याने झालेला. म्हणूनच ही नवनिर्मिती ः उदा. ‘जंगलाचं देणं’, ‘शब्दांचं धन’, ‘घरट्यापलीकडे’, ‘पाखरमाया’, ‘निसर्गवाचन’, ‘केशराचा पाऊस’, ‘आनंददायी बगळे’ व ‘वनोपनिषद’ इत्यादी, इत्यादी. याशिवाय प्रचंड कोशकार्य ः उदा. वन्यपशुकोश अथवा मृगकोश, मत्स्यकोश, वृक्षकोश, पक्षिकोश, हंसदेवाचे मगपक्षिशास्त्र. अनुवादात्मक अनेक ग्रंथ. लौकिक पुरस्कार आणि सन्मान कितीतरी लाभलेले. सोलापूर येथील ७९व्या अखिर भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्षपद २००६ मध्ये त्यांनी भूषविले, पण लौकिकापेक्षा अलौकिकात त्यांचे मन गुंतलेले. आईकडून तेलगू भाषा लाभली; पण मराठीची शब्दकळा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या शैलीचा विचार स्वतंत्रपणे करण्याची बाब आहे. ग्रंथाविषयीचे आणि माणसांविषयीचे त्यांचे ममत्व वादातीत. पण नागपूरच्या साहित्यसंमेलनाला (२००७) गेलो असताना भोजनकक्षात निवांत भेट झाली. म्हणाले ः ‘‘पुन्हा एकदा ‘वनवासा’त जावेसे वाटते…’’ सोलापूरच्या संमेलनानंतर लगोलग झालेला सौ. सरस्वतीबाईंचा मृत्यू त्यांच्या भावजीवनावर घाला घालणारा होता… त्यांची मुलगी छाया हिने ‘माझे बाबा’मध्ये त्यांचे मर्मबंध टिपलेलेच आहेतच. शिवाय त्यांच्या जीवनाचे व्रत आहे या इंग्रजी वाक्याप्रमाणे ः
ङशरीप री ळष र्ूेी ुशीश
ींे श्रर्ळींश षेीर्शींशी
ङर्ळींश री ळष र्ूीी ुशीश
ींे वळश ींेोीीेु
म्हणूनच तर त्यांच्या जीवनानुभूतीला अभिजातता लाभलेली आहे.