घोर अन्याय!

0
143

‘तरंगत्या कॅसिनोंत जाण्यास गोवेकरांना प्रवेशबंदी?’ का बरे हा आम्हा गोमंतकीयांवर घोर अन्याय! गेली किती तरी वर्षे ही कॅसिनोंची चमचमती जहाजे मांडवी नदीमध्ये आपल्या राजधानीमध्ये अगदी हाकेच्या अंतरावरून आम्हाला नित्य खुणावत राहिली आहेत! जायचे, जायचे म्हणताना आजवर राहून गेले खरे, पण आता याचि देही याची डोळां कॅसिनो म्हणजे नेमके असते तरी काय रे भाऊ म्हणून पाहायला जावे हे पक्के ठरवले असता सरकारने आम्हां गोवेकरांनाच तेथे जाण्यापासून वंचित करायला जावे? केवढा बरे हा आम्हांवर अन्याय! मायबाप नेत्यांनी किती प्रेमाने आमच्यासाठी हे तरंगते कॅसिनो आणले. गरीब गोवेकरांना लास वेगासला जाणे बापजन्मात शक्य होणार नाही हे ओळखून जनसेवेच्या भावनेने राज्यकर्त्यांनी कॅसिनोंनाच गोव्यात आणण्याचे पुण्यकर्म केले. जनसेवेच्या अत्यंत उदात्त भावनेतून ही मंडळी ते आम्हां पामरांसाठी गोव्यात घेऊन आली आणि एरवी प्रत्येक क्षुल्लक गोष्टीचे श्रेय उपटण्याची यांची नित्याची सवय असताना हे परमपूज्य कॅसिनो आणण्याचे एवढे महान कार्य करूनही त्याचे श्रेय घ्यायला एकानेही पुढे येऊ नये? केवढा हा स्वार्थत्याग! केवढी ही निःस्पृहता! किती ही गरीबांची कळकळ! गरिबांनी गरीब राहू नये. कॅसिनोवर खेळावे आणि एका रात्रीत लक्षाधीश, कोट्यधीश व्हावे आणि प्रत्यक्षातील लक्षाधीशांनी आणि कोट्यधीशांनी कॅसिनोंवर जाऊन एका रात्रीत कफल्लक व्हावे अशा सामाजिक समतेच्या प्रेरणेतूनच यांनी हे कॅसिनो गोव्यात आणले असतील याविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही! जनसेवेचे एवढे महान कार्य या सार्‍या मंडळींनी केलेले असताना कोण बरे ते नतद्रष्ट ‘कॅसिनो हटवा’, ‘कॅसिनो हटवा’चा घोष करीत आहेत? त्यांना गोरगरिबांच्या उद्धाराचा हा राजमार्ग का बरे नकोसा वाटावा? आम्हीही काही काळापूर्वी त्यांच्यात सामील होतो हे खरे, परंतु ती केवढी घोडचूक होती आमची! निव्वळ व्यवहार पाहायचे सोडून संस्कृती आणि नैतिकता जपायला निघालो होतो आम्ही! मूर्खपणाच होता नाही का? तरी नशीब आपले नेते आपल्यापासून हे कॅसिनो हिरावले जाऊ नयेत यासाठी सतत तत्पर राहिले. कॅसिनो हटवा म्हणणार्‍यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी कधी आर्थिक वर्ष संपेपर्यंत, कधी परवाने संपेपर्यंत, तर कधी पर्याची जागा मिळेपर्यंतचे वायदे करून हे कॅसिनो क्षणमात्रही आमच्या दृष्टिआड होऊ न देण्याची मेहेरबानी केली! नुसत्या कॅसिनोंवरचे खेळ आपले मनोरंजन करू शकणार नाहीत म्हणून काही परप्रांतीय समाजकार्यकर्त्यांनी गोवेकरांसाठी आणि येथे येणार्‍या पर्यटकांसाठी अमली पदार्थांची आणि देशी – विदेशी वारांगनांचीही सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या त्या महान सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्याचे सत्कर्मही आपल्या पोलिसांनी चालवलेले नाही का? मग गस्तीवरच्या पोलिसांच्या सरकारी गाडीत बिअरच्या चार बाटल्या सापडल्या तर त्याचा का बरे एवढा गहजब व्हावा? केवळ आपल्या ऐहिक उत्कर्षासाठी कॅसिनो मालकांनी अक्षरशः कोट्यवधींची गुंतवणूक केलेली आहे येथे! शिवाय खाणबंदीच्या काळात अन्नदाते तर तेच होते. मग त्यांची आणि त्यांच्या गुंतवणुकीची काळजी आपण वाहायला नको? त्यामुळे आता या कॅसिनोंना नदीतून उचलून थेट आपल्या घराशेजारीच आणले तर कसे! भररस्त्यात वाहने उभी करायचा, होड्यांतून जहाजांवर जायचा त्रास तरी का बरे सोसावा जनतेने? त्यापेक्षा एखाद्या गावाचेच लास वेगास करून टाकले की झाले! नुसती घोषणा व्हायचा अवकाश, एकाने तर जागाही पाहून ठेवली म्हणतात! मग एवढी ही समृद्धीची गंगा आता आपल्या घरापर्यंत येत असताना आपल्यालाच तेथे जायला मनाई? किती बरे हा घोर अन्याय!!