घारापुरीची शैलगृहे

0
372

– सौ. पौर्णिमा केरकर
लहानपणी बालभारतीचे पुस्तक अभ्यासासाठी वापरताना पुस्तकाच्या मुख्य पानाच्या आतील बाजूस असलेले तीन चेहर्‍यांच्या महेशमूर्तीचे चित्र सतत लक्ष वेधून घ्यायचे. त्या चित्राचा अर्थ त्यावेळी कळत नव्हता, परंतु ती मूर्ती मात्र सदैव आकर्षित करायची. मूर्ती एक पण तीन चेहरे. प्रत्येक चेहर्‍याची ठेवण वेगळी, काही वेगळे सांगू पाहणारी. ही महेशमूर्ती पाहण्यासाठी कधीकाळी मी तिथपर्यंत जाईन असा त्यावेळी विचारसुद्धा केला नव्हता. पण तो योगायोग जुळून आला. ही लेणी पाहणे हा एक आनंददायी अनुभव होता.आमचा प्रवास होता दिल्लीचा. दिल्लीला जाण्यासाठी राजधानी एक्स्प्रेसची रात्रीची बुकिंग होती. गोव्याहून मुंबईला सकाळीच पोहोचणे झाले. मग रात्रीपर्यंत करायचे काय, हा प्रश्‍न सतावत होता. माणसांच्या प्रचंड कोलाहलात गुदमरायला होत होते. शांत जागा या महानगरात एखादी तरी असेल का? ‘गेट-वे ऑफ इंडिया’चा विरंगम परिसर अनुभवला तोसुद्धा गर्दीच्या सोबतीनेच. त्याचवेळी विचार आला की अजून आपल्याकडे काही तासांचा अवधी आहे. घारापुरीला एलिफंटा गुंफा पाहायला जाणार्‍यांची गर्दी ‘गेट-वे’कडे होत होती. तिथे जवळच घारापुरीला लेणी पाहायला जाण्यासाठी पर्यटकांची ने-आण करणार्‍या बोटी सज्ज ठेवलेल्या दिसल्या. मागचापुढचा कोणताही विचार न करता आम्ही तिकीट काढून बोटीत बसलो. मुंबईतील गर्दीचे बोट सोडून एक रमणीय बेटाला भेट देण्यासाठी मन आतूर झाले होते.
गेट वे ऑफ इंडियाकडून अकरा कि.मी. आत घारापुरी बेट असून त्यावर वसलेल्या गावाला पूर्वी ‘श्रीपुरी’ असे म्हटले जायचे. येथे असलेल्या डोंगरावर पाच लेणी खोदलेली असून त्यातील जास्तीत जास्त लेणी ही शैव संप्रदायाशी निगडीत असलेली आहेत. शिवाशी संबंधित अनेक कथानके येथील कोरीवकामातून दृष्टीस पडतात. तांडवनृत्य, शिवपार्वती विवाह, गंगावतरण, अंधकासुरवध इत्यादी सर्व कोरीवकामातून शिवाचा संक्षिप्त जीवनपटच वाचता येतो.
गुंफेत प्रवेश करताक्षणीच एका मोठ्या दालनात मध्यभागी भव्य उंचीची त्रिमूर्ती मूर्ती लक्ष वेधून घेते. एकमेकांशी संलग्न असलेली ही तिन्ही मुखे त्यातील मोहक, सुरेख अदाकारीमुळे पाहात राहावीशी वाटतात. खास करून त्या मूर्तींना परिधान केलेल्या मुकुटांकडे नजर टाकली तर त्यावरची कलाकुसर अभिजात सौंदर्याची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही. या त्रिमुखी मूर्तीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश सामावलेले आहेत अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. ती गणेशमूर्ती आहे असेसुद्धा मानले जाते. प्राचीन काळातील ग्रंथात रूद्रशिवाच्या दोन वेगवेगळ्या रूपांचा उल्लेख आढळतो असे सांगितले जाते. त्यामुळेच या मूर्तीला असलेल्या तीन मुखांपैकी दोन मुखांपैकी एक ‘घोर’ ते रुद्र व दुसरे सौम्य ते ‘शिव’ स्वरूपात व दोहोंमधील मुख हे शिवशक्ती उमेचे आहे असेही मानले जाते. या सर्व शिल्पकलेला वेधून आहे ती त्रिमुखी मूर्तीच्या पूर्व बाजूच्या भिंतीवर कोरलेली अर्धनारीश्‍वराची सर्वांगसुंदर मूर्ती! येथील सर्वच दालने एका कलात्मक उंचीने भरलेली आहेत. काही काही दालनांत तर खांबांचीच स्वतःची अशी एक कलाकृती निर्माण झालेली आहे. हे मोठमोठे स्तंभ त्यावर केलेल्या नाजूक कलाकुसरीमुळे उठून दिसतात. एक मोठा दगडी हत्ती सुरुवातीलाच या बेटावरच्या दक्षिण बाजूला स्थित होता, त्यामुळे येथील गुंफांना ‘एलिफंटा केव्हज्’ असे नामकरण करण्यात आले. आज या हत्तीला राणीच्या बागेत नेऊन ठेवलेले आहे.
मुळात या बेटावर घारापुरीला जायचे तेच या सुंदर, कमनीय शिल्पांना डोळे भरून पाहण्यासाठीच. तेथील स्थापत्त्यकौशल्याचा वेगळेपणा अनुभवण्यासाठी. मुंबईच्या प्रचंड कोलाहलापासून हे बेट आपल्याला अलिप्त वाटते ते फक्त ‘बेट’ आहे म्हणूनच; अन्यथा ही जागासुद्धा आता पर्यटनप्रेमींनी भरलेली असतेच. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून जरी हे बेट जवळ असले तरी ते येते मात्र रायगड जिल्ह्यात. सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलातून बाहेर पडून बोटीत बसल्यावर पाणी कापीत जात असता घारापुरीचे डोंगर नजरेच्या टप्प्यात येत जातात. सह्याद्रीच्या गडद हिरवाई ल्यालेल्या पर्वतरांगा डोळ्यांत भरून जर घारापुरीचे डोंगर पाहण्याचा प्रयत्न केला तर तेथे आपली निराशा होईल. मात्र मुंबईच्या दाट गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर हे डोंगर मनाला भुरळ घालणारेच ठरतील. तुरळक झाडी, त्यातील हिरवा रंग- लांबून हे डोंगर पाहताना झाडे जणू काही लहान लहान हिरव्या पुंजक्या पुंजक्यांची दिसतात. मध्ये मध्ये लाल मातीचा रंग लक्ष वेधून घेतो. सभोवताली पाणी व मध्ये वसलेला डोंगर, त्यावर खोदलेली ही शैवपंथीय लेणी, त्यातही मध्ये मध्ये इंद्र, ब्रह्मा आणि विष्णू यांच्या आढळणार्‍या मूर्ती अभ्यासकांसमोर वेगळा विचार ठेवतात. एकूणच या डोंगरावरील पाच खोदलेल्या लेण्यांतून बौद्ध शिल्पकलेचा प्रभावच जाणवतो. ‘स्तंभ’ हे बौद्ध शिल्पकलेचे महत्त्वाचे अंग येथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे डोंगरातून खोदून काढलेल्या लेण्यांना म्हणजेच शैलगृहांना महत्त्वाचे स्थान आहे. मौर्यांच्या कालखंडात तर अशा लेण्यांची कलात्मकता अधिकच बहरास आलेली होती असे अभ्यासक सांगतात. या लेण्यांची उत्पत्ती, कलाशैली व त्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार अनुभवताना या अशा कलाकारांसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. ही कलाकुसर करणारे हात जसे उत्तम तंत्रज्ञाचे होते तसेच त्यांचे हृदयही सश्रद्ध अशा भाविकाचे होते. म्हणूनच तर कलाकाराची श्रद्धाळू भावना व तंत्रज्ञानाची नेमकी दृष्टी यांची समरसता या शिल्पातून प्रकट होते. त्यामुळेच या गुंफा या केवळ गुंफा न राहता अप्रतिम कलाकृतीच ठरलेल्या आहेत. डोंगर खोदून आतील लावण्याचा शोध घ्यायचा, ती वास्तू, त्यातील मूर्ती, मूर्तींचे विषय, त्यातील आशय- अभिव्यक्ती या सार्‍यांमधून आपल्या इतिहास-संस्कृतीचे वैभव दिमाखाने सर्व जगासमोर येते. या सर्वाची उत्कटता घारापुरीच्या त्रिमूर्ती शिल्पात दिसते. अत्यंत रेखीव, कलात्मक, भावपूर्ण असे हे शिल्प पाहताक्षणीच मनात समाधानाची भावना निर्माण होते.
शिव कैलासावर आपली अर्धांगिनी पार्वती हिच्याबरोबर वास्तव्यास होता. गण, वाहन नंदी, षडानन, गजानन हे पुत्र सोबतीला होते. एकूणच आपल्या परिवारासहित असलेला शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारी असाच आहे. घारापुरीच्या लेण्यातील त्रिमुख हे निर्माता, रक्षणकर्ता व संहारक अशा रूपांनी युक्त आहे. हे शिल्प इतके जिवंत वाटते की जणू काही त्याच्या चेहर्‍यावरील भाव आपल्याशी हितगुज करू पाहताहेत असे वाटते. मुकुटाचे सौंदर्य त्यातील दगडी गोलाकार छोट्या-छोट्या मण्यांनी वाढवलेले. एका बाजूला कमळात स्थिरावलेला हा शिव ‘महायोगी’ भासतो, तर दुसर्‍या बाजूला तांडव करणारा रुद्र नटश्रेष्ठ वाटतो. अघोर, भैरव, रुद्र हा संहारक. एकूणच मुखावरील भाव असेच कोरलेले आहेत की लोभीपणा, दाढी-जटांमधून जाणवणारे क्रोधाचे भाव, जटाधारी मुकुट, हातातील जहरी साप तर दुसरे मुख सौम्य, शांत. भावपूर्ण मुद्रा. मुखावर असीम शांतता. ध्यानमुद्रा. केसांची रचना एवढी आवर्षक की कलाविष्काराचा सर्वोत्कृष्ट नमुना पाहता येतो. जगाची उत्पत्ती, लय हे सारेच तत्त्व इथे स्पष्ट होत जाते. मधले मुख तर अवर्णनीयच. ते सलज्ज, शक्तिरुपिणी मानले गेले आहे. या शिल्पकृतीमधून शिवाची वेगवेगळी रूपे साधली गेलेली आहेत. शिवशक्तीच्या मीलनातूनच सृजनत्व बहरते. अभ्यासकांच्या मते हे मुख्य शिल्प पाचमुखी आहे. त्यांत सद्योजता, तत्पुरुष, वामदेव, इशाना आणि अघोरा असे वर्णन केले गेलेले आहे. विश्‍वाच्या उत्पत्तीची, बहराची, विद्ध्वंसाची कथा या लेण्यांशी समरस झालेली दिसते. एक एक शिल्प, त्यावरील भावभावना, त्यावरील कलाकुसर, दागदागिने यामागे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान अधोरेखित झालेले आहे. असंख्य उभ्या-आडव्या दगडांचे कंगोरे इथे आहेत. कित्येक स्तंभांची, मूर्तीच्या अवयवांची नासधुस करण्यात आलेली आहे. पोर्तुगिजांनी गोव्यातील मंदिरांना जसे वक्रदृष्टीने पाहिले होते तीच दृष्टी त्यांची या लेण्यावरसुद्धा स्थिरावली व या सर्वांगसुंदर कलेच्या आविष्कारावर घाव घालताना त्यांचे मन जराही विचलित झालेले नाही हे जाणवून वाईट वाटते.
असंख्य माणसे, इमारती, त्यांद्वारे निर्माण होणारे प्रदूषण, जटिल समस्या, भयानक गुन्हे असेच काहीसे रूप मुंबई म्हटल्यानंतर आपल्यासमोर उभे राहते. या शहरात प्रवेश केल्याने आपली घुसमट होईल असे सुशेगाद मनाला वाटल्यावाचून राहत नाही. परंतु शोधक नजरेने इथल्या गतकालीन सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक वारशाचा शोध-वेध घेतला तर आत्मज्ञानाची प्रचिती येते. मुंबई सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारी. निसर्गाला उद्ध्वस्त करून विकासाचा हव्यास धरून वाटचाल केली की मानवी जीवनच मुळी भकास होते हे या शहरात आल्यानंतर कळते. मुंबईचा चेहरा आज हरवलेला आहे. बिनचेहर्‍याच्या आजच्या मुंबईच्या गतकालीन सांस्कृतिक, ऐतिहासिक वैभवाच्या खाणाखुणा आजही ठिकठिकाणी विखुरलेल्या आढळतात. टोलेजंग इमारतींच्या वाढत्या पसार्‍यात त्यांचे अस्तित्व दयनीय झालेले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यात स्थित झालेल्या व अथांग निळ्याशार समुद्राने वेढलेल्या घारापुरी बेटावरील ही शैलगृहे इथे भेट देणार्‍या पर्यटकांना आत्मचिंतन करायला लावतात.