घानाचा नायजरवर घणाघात

0
87

>> उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

घाना संघाने नवोदित नायजरचा २-० असा पराभव करत फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर बुधवारी हा सामना खेळविण्यात आला. शनिवारी गुवाहाटी येथे होणार्‍या ‘अंतिम ८’मधील सामन्यात घाना संघाला आफ्रिका खंडातील आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या माली संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.

घानाने काल पहिल्या सत्रात गोल नोंदविण्याचे १३ प्रयत्न केले तर नायजरने केवळ एकदा घानाच्या गोलक्षेत्रात प्रवेश केला. पश्‍चिम आफ्रिकन देश असलेल्या घानाच्या एडमंड एर्को मेनसाह याने २५व्या मिनिटाला नायजरची बचावफळी भेदली परंतु, दक्ष गोलरक्षक खलिद लवाली याच्या चपळ गोलरक्षणामुळे त्याची संधी हुकली. आक्रमक खेळ करूनही घानाच्या संघाला आघाडीसाठी पेनल्टीची मदत घ्यावी लागली. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत नायजरच्या गोलक्षेत्रात फारुख इद्रिसा याने घानाच्या एरिक अयिहा याला अवैधरित्या पाडल्याने रेफ्रींनी पेनल्टीचा इशारा केला. या स्पॉट किकवर गोल नोंदवून घानाचा कर्णधार अयिहा (४० + ४ मिनिट) याने संघाला आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या सत्रात गिडियोन मेन्सा याने खूप जवळून प्राप्त झालेली खुली गोलसंधी वाया घालवली. बदली खेळाडू रिचर्ड डान्सो (९०वे मिनिट) याने अंतिम क्षणात संघाचा दुसरा गोल केला.