घातक संघर्ष

0
139

सिरियामधील राष्ट्राध्यक्ष बशीर अल असद यांच्या सैन्यावर अमेरिकेने फ्रान्स आणि ब्रिटनसमवेत दुसर्‍यांदा चढवलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे जागतिक संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पडते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. सिरियाच्या असद राजवटीला रशिया आणि इराणचा असलेला पाठिंबा जगजाहीर आहे. अशा वेळी असद यांच्या लष्करी तळांना आणि रासायनिक संशोधन केंद्रांना अमेरिका आणि मित्रदेशांच्या क्षेपणास्त्रांनी दुसर्‍यांदा लक्ष्य केल्याने साहजिच असद यांचा मित्र असलेला रशिया विलक्षण अस्वस्थ बनला आहे आणि प्रत्युत्तराची भाषा करू लागला आहे. एका विलक्षण स्फोटक अशा परिस्थितीकडे जग वाटचाल करीत असल्याचे हे निदर्शक आहे. रशिया आणि अमेरिका आमनेसामने उभे ठाकणे म्हणजे तिसर्‍या महायुद्धाची सुरूवात असेल हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. सिरियामधील असद राजवटीने बंडखोरांच्या ताब्यातील शहरांमध्ये रासायनिक हल्ले चढवल्याचे कारण देत अमेरिका व मित्रदेश एवढे आक्रमक झालेले आहेत. असद यांच्या सैन्याकडून बंडखोरांच्या शहरांमध्ये रासायनिक हल्ले होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार चालला आहे. कधी सिरेन, कधी क्लोरीन वायूचा वापर करण्यात आल्याने अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. आम जनतेवरील अशा प्रकारचे रासायनिक हल्ले निषेधार्ह नक्कीच आहेत, परंतु त्याला शह बसवण्यासाठी म्हणून अमेरिका आणि मित्रदेश जे क्षेपणास्त्र हल्ले सिरियावर चढवीत आहेत, तेही सर्वनाशाकडेच नेणारे आहेत. गेल्या वर्षी आपल्या दोन युद्धनौकांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियावर ५९ टॉम हॉक क्षेपणास्त्रे डागून असद राजवटीला रासायनिक हल्ल्यांविरुद्ध धमकावले होते. परंतु त्याला न जुमानता असद राजवटीकडून रासायनिक हल्ले सुरूच असल्याचे दिसते. ओबामा राजवटीने पूर्वी सिरियावर थेट लष्करी कारवाई करणे टाळले होते. त्याऐवजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने सिरियाने रासायनिक शस्त्रास्त्रबंदी करारावर सही करावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु असद राजवट नमायला तयार नाही. सातत्याने निष्पाप नागरिकांचा बळी रासायनिक हल्ल्यांतून घेतला जातो आहे. अशा वेळी असद राजवटीला शह बसला पाहिजे हे खरे, परंतु अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ले चढवणे हे त्याचे उत्तर आहे का ही बाब विचार करण्यासारखी आहे. या हल्ल्यांतून बशीर असद राजवट दुबळी होणार नाही, तर ती अधिक समर्थ बनेल अशी प्रतिक्रिया सिरियाने दिली आहे ती बोलकी आहे. रशिया आणि इराणकडून असद राजवटीला अधिक बळकट पाठिंबा आता मिळेल. मुळात असद यांच्या सैन्याकडे असलेली रासायनिक अस्त्रे ही त्यांनी निर्मिलेली आहेत की रशिया किंवा इराणनेच त्यांना ती पुरविली आहेत हे स्पष्ट नाही. रशिया गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या उचापतींसाठी कुख्यात बनलेला आहे. ब्रिटनमध्ये आपल्या एका गुप्तहेराचा काटा काढण्यासाठी रशियाने अशाच प्रकारच्या गूढ रसायनाचा वापर केल्याचा आरोप आहे आणि त्याची परिणती म्हणून ब्रिटनने आणि नंतर अमेरिकेने रशियाच्या राजदूतांची हकालपट्टी केलेली आहे. पाश्‍चात्त्य विश्व आणि रशिया यांचे संबंध आता जवळजवळ विकोपाला गेलेले आहेत. अशा वेळी सिरियाच्या निमित्ताने या संघर्षाची पुन्हा ठिणगी उडणे जगासाठी चिंताजनक ठरू शकते. सिरियामध्ये अनेक प्रकारे संघर्ष गेली आठ वर्षे चालला आहे. एकीकडे अमेरिका आयएसआयएसच्या विरोधात लढते आहे. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष असद यांचे सैन्य इराण व रशियाच्या समर्थनानिशी बंडखोरांच्या विरोधात लढते आहे. इस्रायल असदच्या समर्थनार्थ आलेल्या इराणच्या सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ले चढवते आहे, रशिया असद यांच्या समर्थनात उतरला आहे असा सगळा चमत्कारिक आणि आपापल्या हितसंबंधांनुसार पवित्रा जो तो घेताना दिसतो आहे. यात होरपळ चालली आहे ती बिचार्‍या आम सिरियन नागरिकांची. त्या देशामध्ये आज जवळजवळ यादवीच माजलेली दिसते. अरब विश्वामध्ये जी जनआंदोलनाची लाट काही वर्षांपूर्वी उसळली, त्यात बशीर असद राजवटीने लोकशाहीला चालना द्यावी अशी मागणी पुढे आली होती. ते आंदोलन असद यांनी बळाच्या आणि हिंसाचाराच्या जोरावर दडपले. बंडखोरांनी मग फ्री सिरियन आर्मीच्या माध्यमातून सशस्त्र संघर्ष पुकारला. पुढे आयएसआयएस अवतरली. मग त्यांच्या विरोधात अमेरिका उतरली. रशिया आला. मित्रदेश आले. असे करता करता सिरिया ही जागतिक युद्धभूमी बनून गेली. या सार्‍या धुमश्चक्रीत सिरियाच्या नागरिकांची मात्र वाताहत चालली आहे. आतापर्यंत जवळजवळ पाच लाख नागरिकांचा या रक्तरंजित संघर्षात बळी गेला आहे. लाखो लोक जायबंदी आहेत. सिरियाच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक जनतेला देश सोडून परागंदा व्हावे लागले आहे. एकविसाव्या शतकातून जग वाटचाल करीत असताना एखाद्या प्रदेशामध्ये आम नागरिकांना असे नरकप्राय जीवन जगावे लागणे हे दुर्दैवी म्हणावे लागेल. यातून जर अमेरिका – रशिया आमनेसामने उभे राहिले तर संपूर्ण जग भरडून निघेल हे काय वेगळे सांगायला हवे?