घसरलेली कामगिरी सरकारसाठी चपराक

0
109

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत टोला

‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या काळात केलेल्या सर्व्हेमध्ये गोवा सरकारची कामगिरी ही अत्यंत वाईट व सामान्यपेक्षाही खाली गेल्याचे आढळून आले असल्याचे म्हटले असून सरकारसाठी ही एक मोठी चपराक आहे, असे काल कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

वरील पाहणीत रोजगार, स्वस्त अन्नधान्य व चांगल्या आरोग्य सुविधा या तिन्ही निकषांवर लोकांनी सरकारला ५ गुणांपैकी अनुक्रमे २.६६, २.५६ व २.६५ असे गुण दिलेले असून सामान्य प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे, असे डिमेलो म्हणाले. रस्ते व पिण्याचे पाणी याबाबतीतही सरकारी नापास झालेले असून ५ पैकी अनुक्रमे २.४६ व २.६४ असे रेटिंग मिळाले असल्याचे डिमेलो म्हणाले.
स्वच्छ भारताचा नारा देणारे सरकार त्याबाबतीतही नापासच झालेले असून स्वच्छ भारतासाठी केवळ तिजोरी रिकामी झाली. मात्र, भारत काही स्वच्छ होऊ शकला नसल्याचे दिसून आल्याचे डिमेलो म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीतही तीच गत असल्याचे ते म्हणाले. आता विकासाच्या नावाने मते मागण्याचा भाजपला अधिकारच राहिला नसल्याचा टोला डिमेलो यांनी लगावला.