घरगुती वीज दरवाढीचा सर्वसामान्य ग्राहकांना बसणार धक्का : दिगंबर

0
137

>> निर्णयाचा वीज खात्याने फेरविचार करावा

राज्याच्या वीज खात्याने घरगुती वापराच्या वीज दरात ११.४८ टक्के अशी मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या १ एप्रिलपासून होणार आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना मोठा धक्का ठरणारी असल्याने त्याबाबत फेर विचार करावा अशी प्रतिक्रिया अनेक वर्षे वीजमंत्री म्हणून काम केलेले विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

सामान्य जनतेला ही दरवाढ परवडण्यासारखी नाही. त्यामुळे त्याबाबत वीज खात्याने फेरविचार करावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. ही एवढ भरमसाठ वीज दरवाढ करून वीज खात्याला संयुक्त वीज नियमन आयोगाकडे बोट दाखवून मोकळे होता येणार नाही. सतत आठ वर्षे मी वीजमंत्री होतो. त्यामुळे मला विजेविषयी बरेच काही माहित आहे. त्यामुळे त्यासंबंधी मी बोलू शकतो असे कामत म्हणाले.
वीज दरवाढीचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे ह्या वाढीला सरकारच जबाबदार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

मडकईकर यांनी वीजमंत्री म्हणून ताबा घेतला त्याला आताच एक वर्ष पूर्ण झालेले आहे. विजेसारख्या खात्यात एक वर्षाच्या काळात काहीही जास्त करता येत नाही. आणखी एक-दोन वर्षे त्यांनी काम केल्यानंतरच वीजमंत्री म्हणून ते यशस्वीपणे काम करू शकले की नाहीत, हे सांगता येईल असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील. असे उत्तर त्यांनी याविषयीच्या प्रश्‍नावर दिले.

मागील काही वर्षे पक्षाची कोणतीही जबाबदारी माझ्यावर नव्हती. म्हणजे माझ्याकडे कोणतेही पद नव्हते. ना प्रदेश अध्यक्षपद, ना विरोधी नेतेपद, ना प्रवक्तेपद. त्यामुळे आपण बॅकफूटवर होतो. मात्र आता आपण राजकारणात सक्रीय झालो आहे अशी माहिती कामत यांनी दिली.

घरगुती-व्यावसायिक दरात
फरक राहणार नाही
मी वीजमंत्री असताना मी वीजदरात कधीही भरमसाठ वाढ केली नाही. प्रती युनिट मागे १ रु.ही मी केलेली सर्वात मोठी वीजदरवाढ होती. याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता तर घरगुती वापरासाठीची वीज व व्यावसायिक वापरासाठीची वीज यांच्या दरात मोठासा फरक राहणार नाही असे ते म्हणाले.