घरंदाज गानविष्काराने किशोरीताई आमोणकर संगीतोत्सवाची सांगता

0
204

कला अकादमी गोवा आयोजित गानसरस्वती किशोरीताई आमोणकर संगीत महोत्सवाची सांगता बुजुर्ग घरंदाज गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने झाली. विशुद्ध गायकीचा आनंद देणार्‍या या मैफलीत त्यांनी केदार राग विस्ताराने आळविला व त्याला जोडून तराणा म्हटला. निकोप स्वर लगाव, संयत आणि रसपरिपोषक आलापी, लयकारी युक्त बोलबॉंट, लोचदार ताना व घरंदाज गानविष्कार यांमुळे रसिक तल्लीन झाले. त्यांचा ‘संपूर्ण मालकंस’ रागही ऐकताना रसिक भारावून गेले.

त्यांना डॉ. रवींद्र कातोरी (संवादिनी), अमर मोपकर (तबला), सचिन तेली (तंबोरा) यांनी साथ दिली. पं. कशाळकर यांचे शिष्य डॉ. शशांक मक्तेदार यांची पोषक गायन साथ लाभली. सकाळच्या सत्रात किशोरीताईंच्या शिष्या नंदिनी बेडेकर यांची प्रथम मैफल झाली. त्यानंतर ज्येष्ठ शिष्या विदूषी आरती अंकलीकर यांनी रसिल्या गानविष्काराने रसिकांना भावपूर्ण गायकीचा आनंद दिला. जौनपुरी राग त्यांनी विस्ताराने आळविला. आलाप, बोल आलाप, ताना यांचा रसिला मेळ साधून त्यांनी मैफलीची गोडी वाढविली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी) व भरत कामत (तबला) या नामवंत वादकांची रंगतदार साथसंगत लाभली. नंदिनी बेडेकर यांनी मियाकी तोडी व गुजरी तोडी द्रुत गायिल्या.

सायंकाळच्या सत्रात प्रथम गोमंतकीय गायक कलाकारांचे गायन झाले. त्यांनीही प्रभाव पाडला. सम्राज्ञी आईर यांनी हंसध्वनी, सचिन तेली यांनी बिहागडा, रूपेश गावस यांनी भूप व प्रचला आमोणकर यांनी यमन रागातील छोटे ख्याल गाऊन रंग भरला. त्यांना अमर मोपकर (तबला) व दत्तराज सुर्लकर (संवादिनी) यांनी पुरक साथसंगत केली. अक्षय सावंत व रोहित नाईक तंबोर्‍याच्या साथीला होते. सोनिक वेलिंगकर यांची बासरीची साथ लाभली.

त्यानंतर प्रसिध्द गायिका मंजिरी असनारे केळकर यांची जयपूर अत्रौली गायकीचा आनंद देणारी मैफल झाली. किशोरी ताईंचे शिष्यत्व लाभलेल्या या प्रतिभाशाली गायिकेने प्रथम श्रीराग आळविला. निकोप आलापी, लयीच्या अंगाने केलेली बोलआलापी, गळ्यातील विलक्षण फिरत व प्रभावी तानक्रिया यामुळे त्यांनी रसिकांना प्रभावित केले. त्यांनी नट कामोदमधील तिनतालमधील विलंबित बंदिशही ऐकविली. त्यातील तानाची गुंफण विलक्षण प्रभावी होती. त्यांना बुजुर्गवादक पं. विश्‍वनाथ कान्हेरे (संवादिनी) व श्रीधर मांडरे (तबला) यांनी गायनाच्या अंगाने अनुकुल साथ दिली.
व्यासपीठावर प्रसिद्ध कलाकार संतोष तारी यांचे कलात्मक नेपथ्य लक्ष वेधून घेत होते. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिराबाहेर किशोरी ताईंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पहाणे हा वेगळा आनंदानुभव होता. ताईंच्या विविध भावमुद्रा, कौटुंबिक छायाचित्रे, डिलीट, पद्मभूषणसारखे प्रतिष्ठेचे सन्मान स्वीकारतानाची छायाचित्रे, अनेक मान्यवरांसमवेतील क्षण टिपणारी छायाचित्रे यांचा त्यात समावेश होता.