ग्रेटर पीडीए विरोधकांचा मोर्चाविषयी आज निर्णय

0
70

सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघातील सर्व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याची अनौपचारिक घोषणा शनिवारी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेली असली तरी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांनी पणजीतील नियोजित ६ एप्रिलचे आंदोलन स्थगित ठेवण्याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज २ एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत मंत्र्यांच्या घोषणेवर विचार विनिमय करून नियोजित आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती स्थानिक समितीचे आर्थुर डिसोझा यांनी काल दिली.

दोन्ही मतदारसंघातील पंचायत क्षेत्राचा पीडीएमध्ये समावेशाला विरोध करण्यासाठी ६ एप्रिल रोजी पणजीत आयोजित मोर्चा अद्यापपर्यंत मागे घेण्यात आलेला नाही, असेही डिसोझा यांनी स्पष्ट केले. नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांनी टीसीपी बोर्डाची बैठक ग्रामस्थांच्या नियोजित आंदोलनापूर्वी घेऊन गावे वगळण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, टीसीपी बोर्डाची बैठक ९ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. लोकांची मागणी धसास लावण्यासाठी टीसीपी मंडळाची बैठक होईपर्यंत सरकारी यंत्रणेवर दबाव कायम राखण्याची गरज आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर ३ एप्रिल रोजी आंदोलनाबाबतच्या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे, असेही डिसोझा यांनी सांगितले.

ग्रेटर पणजी पीडीएमधून दोन्ही मतदारसंघातील गावे वगळण्यात येतील. कदंब पठारावरील ग्रामस्थांचा विरोध असल्यास सदर भाग सुध्दा वगळण्याची तयारी आहे, असे मंत्री सरदेसाई यांनी म्हटले होते.