ग्रेटर पीडीएविरोधात उद्या पणजीत मोर्चा

0
118

>> निमंत्रक आर्थुर डिसोझा यांची पत्रकार परिषदेत माहिती

सांताक्रुझ व ताळगाव ह्या मतदारसंघांतील सर्व पंचायती व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्यात यावीत ही आमची मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नसल्याने परवा ६ एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे पणजीत ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’तर्फे मोर्चा आणण्यात येणार असल्याचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मोर्चात ५ ते ६ हजार लोक सहभागी होणार असले तरी मोर्चा शांततापूर्ण असेल. कुठल्याही परिस्थितीत आम्ही रस्ते अडवून वाहतुकीची कोंडी करणार नाहीत. तसेच हिंसा करणार्‍यांना मोर्चात सहभागी होऊ देणार नाहीत, असेही डिसोझा यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांताक्रुझ व सांत आंद्रे ह्या दोन्ही मतदारसंघांतील सर्व गावे गे्रटर पणजी पीडीएतून वगळावीत अशी आमची मागणी असून ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असे डिसोझा यांनी ह्यावेळी पुढे बोलताना सांगितले. सर्व गावांना पीडीएतून वगळण्यात यावे. तसेच गावांच्या विकासासंबंधीचे सगळे अधिकार ग्रामस्थांना प्राप्त व्हावेत ह्यासाठी सरकारने नगर आणि नियोजन कायद्यातील कलम ७३ व ७४ मध्ये दुरुस्ती घडवून आणावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे ते पुढे म्हणाले.
६ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. पाटो, येथील सेंट्रल लायब्ररीजवळून मोर्चा सुरू होईल. ज्या ज्या लोकांना पीडीए नको असेल त्या सर्व लोकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ह्यावेळी बोलताना रूदाल्फ फर्नांडिस यांनी केले. दरम्यान, ताळगावही पीडीएतून वगळायला हवे, अशी मागणी काल गोंयकार अगेन्स्ट पीडीएने केली.

प्रादेशिक आराखडा
२०२१ शीतपेटीत ठेवा
प्रादेशित आराखडा २०२१ला जनतेने विरोध केल्याने तत्कालीन सरकारने तो शीतपेटीत ठेवला होता. आता मंत्री विजय सरदेसाई यांनी प्रादेशिक आराखडा २०२१ वापरात आणण्यात येणार असल्याची जी घोषणा केली आहे त्याचा निषेध करीत आहोत, असे यावेळी बोलताना रामा काणकोणकर यांनी सांगितले. प्रादेशिक आराखडा २०२१ वापरात आणणे हे अन्यायकारक असल्याचेही ते म्हणाले. बिल्डर लॉबीला खूष करण्यासाठीच हे सगळे केले जात असल्याचा आरोप करून मंत्री सरदेसाई हे आपण ग्रामस्थांना ईस्टरची भेट दिल्याचे जे सांगतात त्यात काहीच तथ्य नाही. त्यांनी ग्रामस्थांना कोणती ईस्टर भेट दिली आहे, असा प्रश्‍नही त्यांनी केला.