ग्रेटर पणजी व मोपा पीडीए स्थापणार

0
149

>> टीसीपी मंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री विजय सरदेसाईर्ंंची माहिती

ऑर्चर्ड जमिनीचे बेकायदेशीर रूपांतर करण्यात आले आहे. जमिनीच्या बेकायदा रूपांतराला आळा घालण्यासाठी नगर नियोजन कायद्यात आवश्यक दुरूस्ती करून बेकायदा जमीन रूपांतर करणार्‍याला १ वर्ष शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेटर पणजी आणि मोपा या दोन नवीन पीडीएंची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

पर्वरी येथे सचिवालयात टीसीपी मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सरदेसाई म्हणाले की, नगरनियोजन कायद्यात दुरूस्ती विधेयक आगामी विधानसभा अधिवेशनात सादर केले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जमिनीेचे बेकायदा रूपांतर केले जात आहे. बेकायदा जमीन रूपांतराला आळा घालण्यासाठी भूखंड विक्रीसाठी टीसीपीच्या ना हरकत दाखल्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीची खरेदी विक्री नोंद करणार्‍या उपनिबंधकांना याबाबत माहिती दिली जाणार आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

ग्रेटर पणजी पीडीएमध्ये ताळगाव पठार, बांबोळी आणि कदंब पठाराचा समावेश करण्यात आला आहे. कुडका पंचायत क्षेत्र, सांतआंद्रे मतदारसंघ, सांताक्रुज हा भाग वगळण्यात आला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आसपासच्या क्षेत्राच्या नियोजन विकासासाठी मोपा पीडीएची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर गोवा पीडीएमध्ये पणजी, म्हापसा, कळंगुट – कांदोळी व किनारी भागाचा समावेश असेल, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

२५० चौरस मीटर भूखंडात बांधकामासाठी साधनसुविधा कर माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. करमाफीचा लाभ केवळ स्थानिकांना मिळणार आहे. बेकायदा रूपांतर करण्यात आलेल्या ऑर्चर्ड जमिनीत भूखंड विकत घेऊन घर बांधलेल्या आणि बांधणार्‍या नागरिकांनी ३१ मार्च २०१८ पूर्वी नगर नियोजन खात्याशी संपर्क साधणे बंधनकारक करण्यात आले आहे. या जमिनीतील घर कायदेशीर करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

कळंगुट- कांदोळी येथील ओडीपीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्याने तयार करण्यात आलेले मडगाव, पणजी, कळंगुट-कांदोळी बाह्य विकास आराखडे (ओडीपी) मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ओडीपीचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जमीन रूपांतर प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

ग्रेटर पणजीतील भाग
ताळगाव पठारासह
बांबोळी व कदंब पठार
(कुडका पंचायतक्षेत्र, सांतआंद्रे
मतदारसंघ व सांताक्रूझ वगळून)

मोपा पीडीए कशासाठी
प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरातील क्षेत्राच्या नियोजन विकासासाठी मोपा पीडीए.