ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सक्षम करणार

0
329

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

>> जानेवारीत नवीन साधनसामग्री

राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात एक्स रे मशीन, अल्ट्रासाऊंड, हाय पॉवर एक्स रे मशीन, कलर डॉप्लर, रक्त तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधन सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी पदरमोड करावी लागते. सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, इस्पितळांमध्ये वैद्यकीय साधन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. साडेचार कोटी रुपयांची वैद्यकीय साधन सामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात मोबाईल एक्सरे मशीन, अल्ट्रासाउंड, हायपॉवर एक्स रे मशीन, कलर डॉप्लर यांचा समावेश आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रात रक्त तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. नवीन वर्षात जानेवारी २०१८ अखेर नवीन यंत्रसामग्री उपलब्ध केली जाईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मोबाईल एक्स रे मशीन – जिल्हा इस्पितळ म्हापसा, हॉस्पिसियो इस्पितळ – मडगाव, उपजिल्हा इस्पितळ – फोंडा, कॉटेज हॉस्पिटल चिखली, कम्युनिटी हेल्थ सेंटर – कुडचडे आणि काणकोण, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळपई, केपे, सांगे या ठिकाणी मोबाईल एक्स रे मशीन उपलब्ध केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हाय पावर एक्स रे मशीन – वाळपई, कुडचडे, कॉटेेज हॉस्पिटल चिखली, प्राथमिक आरोग्य केंद्र – हळदोणा, प्राथमिक आरोग्य केंद्र – डिचोली, कासारवर्णे पेडणे, शिरोडा, पिळये -धारबांदोडा या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत. अल्ट्रासाऊंड मशीन – काणकोण, कुडचडे, वाळपई येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर, साखळी, शिरोडा, पिळये – धारबांदोडा, बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ठाणे – सत्तरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

म्हापसा, मडगावात न्यूरो सर्जन
न्यूरोे सर्जन, रेडिओलॉजिस्ट यांची सेवा बांबोळी येथील जीएमसीबरोबरच म्हापसा आणि मडगाव येथील जिल्हा इस्पितळांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. येत्या १९ डिसेंबरपर्यंत व्हीव्हीआयपी, नवीन सात रुग्णवाहिका आणि २० मोटरसायकल रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ३८ रुग्णवाहिका सेवेत आहेत. सडा – वास्को येथील ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत सीएसआरअंतर्गत बांधण्यात येणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.

कार्डीयाक रुग्णवाहिका
एमआरएफ कंपनीने सीआरएस अंतर्गत दीड कोटी रुपये कार्डीयाक रुग्णवाहिका खरेदीसाठी दिले आहेत. आणखी ५० लाख रुपये उपलब्ध केले जाणार आहेत. या निधीतून पाच कार्डीयाक रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. या कार्डीयाक रुग्णवाहिकांवर कार्डीयाक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच ५० खास प्रशिक्षित पॅरामेडीकल कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. सरकारने कर्मचार्‍यांना अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी १.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आत्तापर्यंत २० पॅरामेडीकल कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आखणी ३० जणांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
आरोग्य खात्याने जीएमसी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या ३३ डॉक्टरांच्या बॉंडची कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील १२ – १३ डॉक्टर आरोग्य खात्याच्या सेवेत रुजू झाले आहेत. तसेच ११ डेंटल डॉक्टरांची नियुक्ती ग्रामीण भागातील विविध आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

डायलेसिस सेवेचा विस्तार
राज्यातील विविध ठिकाणी डायलेसिस सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. डायलेसिस सेवा पुरवण्याचे काम खासगी संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. म्हापसा, नावेली – मडगाव, फोंडा, वाळपई येथे ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
बांबोळी येथील इस्पितळात ओपीडीमध्ये दोन रांगा करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. सध्या केवळ नोंदणीसाठी स्थानिक आणि परराज्यांतील रुग्णांसाठी वेगवेगळ्या रांगांची सोय करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.