ग्रामीण भागांसह शहरांमध्येही पावसाचा हाहाःकार

0
203

काणकोणपासून पेडण्यापर्यंत संपूर्ण राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातल्याने काल सर्वत्र हाहाःकार उडाला. राजधानी पणजीलाही गुरुवारी सकाळी व संध्याकाळी वादळी वार्‍याचा तडाखा बसला. शुक्रवारी सकाळी सांतइनेज, काम्राभाट या भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तेथील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले. आश्‍वे येथे दरड कोसळली. खंडीत वीज पुरवठ्यामुळेही लोकांची तारांबळ उडाली. अवेडे-पारोडा पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. पणजीसह अनेक भागांमध्ये झाडे घरे तसेच वाहनांवर पडून मोठी हानी झाली आहे. पडझडीच्या मोठ्या प्रमाणातील घटनांमुळे अग्निशामक दलावरील ताण वाढला. प्रमुख शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा मोठा खोळंबा झाला. सुदैवाने पडझडींमध्ये कोणी जखमी झाल्याचे किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. इतर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जनजीवनावर विपरीत परिणाम झाला.

राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. झाडे, दरडीच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली. राज्यभरात मागील चोवीस तासांत सुमारे ५ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंड्यात सर्वाधिक ८.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर काणकोण येथे सर्वांत कमी २.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

केपे-मडगाव वाहतूक
वळवली चांदरमार्गे
राज्यात गुरूवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसाने राज्यात अनेक भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. साखळी, डिचोली, फोंडा, मडगाव, पारोडा – केपे व इतर ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खळबळ उडाली होती. तसेच केपे मडगाव हमरस्ता पाण्याखाली गेल्याने कुडचडे, केपे – मडगाव वाहतूक चांदर मार्गे वळविण्यात आली. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.
पणजी शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. शहरातील काही भागातील दुकानामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांना नुकसान झाले. कदंब बसस्थानक, मळा, जुना सचिवालय परिसर, कांपाल, मिरामार, सांतइनेज, पणजी मार्केट आदी अनेक भागात पावसाचे पाणी तुंबल्याने वाहन चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

आल्तिनो-पणजीत संरक्षक
भिंत कोसळल्याने वाहतूक ठप्प
आल्तिनो येथील गोवा राखीव पोलीस इमारतीच्याजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने विजेचा खांब व झाडांची पडझड झाल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला. बांबोळी येथे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी, नागरिकांनी त्रास झाला. राज्यात १ जूनपासून आत्तापर्यंत एकूण ५०.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे.