ग्रामसभांसाठी सुधारित नियम

0
112

>> सूचना – हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत

पंचायत संचालनालयाने गोवा पंचायत (ग्रामसभा बैठक) नियमात दुरुस्तीसाठी सुधारित मसुदा जाहीर केला आहे. या सुधारित मसुद्यामध्ये ग्रामसभेच्या विषय पत्रिकेबाहेरील विषयांवर चर्चा करण्यात बंदी घालण्यात आली आहे. या मसुद्यासंबंधी सूचना, हरकती पंधरा दिवसांत पंचायत संचालकाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नवीन मसुद्यासंबंधी सूचना व हरकती लक्षात घेऊन मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पंचायत खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी यासंबंधी सूचना जारी केली आहे.

गोवा पंचायत ग्रामसभा बैठक नियम १९९६ मध्ये दुरुस्तीसाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. पंचायतीच्या ग्रामसभा जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातील कुठल्याही रविवारी घ्यावात असे मसुद्यात म्हटले आहे. सरपंचांनी ग्रामसभेची तारीख निश्‍चित करून ग्रामसभा सकाळी ११ वाजता घ्यावी. सर्वसाधारण ग्रामसभेसाठी सात दिवसांपूर्वी नोटीस जारी करावी. विशेष ग्रामसभेसाठी चार दिवस पूर्वी नोटीस जारी करावी. ग्रामसभेत चर्चेला येणारी विषय सूची सुध्दा पूर्वीच निश्‍चित करावी. ग्रामसभेच्या विषय सूचीच्या बाहेरील विषयांवर चर्चा करू नये, असे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत.

राज्यातील काही पंचायतींकडून वेळेवर ग्रामसभा घेतल्या जात नाहीत. तसेच काही ग्रामसभांमध्ये विषय पत्रिकेबाहेरील विषय ऐनवेळी चर्चेसाठी उपस्थित केले जातात. यामुळे काही ग्रामसभांमध्ये गदारोळ निर्माण होतो. त्यामुळे सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये ग्रामसभांमध्ये विषय पत्रिकेबाहेरील विषय चर्चेला घेऊ नयेत, अशी सूचना केली होती.

सूचना, हरकतींनंतर
अंतिम स्वरूप
पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये होणारा गदारोळ रोखण्यासाठी ग्रामसभा बैठक नियम दुरुस्तीसाठी सुधारित मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभेच्या विषय पत्रिकेबाहेरील विषयांवर चर्चा करता येणार नाही. मसुदा सूचना, हरकतींसाठी ग्रामस्थांना खुला ठेवण्यात आला आहे. सूचना व हरकती लक्षात घेऊन मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, असे पंचायत खात्याचे संचालन अजित पंचवाडकर यांनी सांगितले.