‘ग्रँड फिनाले’

0
91

>> बंगळुरू-चेन्नईत आज

इंडियन सुपर लीगमध्ये आज शनिवारी श्री कांतिरवा स्टेडियमवर बंगळुरू एफसी आणि चेन्नईन एफसी यांच्यात अंतिम सामना होईल. दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात असल्यामुळे रंगतदार लढत अपेक्षित आहे.

बंगळुरू एफसीला पदार्पणात विजेतेपद जिंकून इतिहास घडविण्याची संधी आहे. बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे, पण आयएसएल अंतिम सामन्यात यजमान संघाची सरशी कधीच झालेली नाही हा इतिहास बंगळुरूच्या चाहत्यांना माहीत आहे. गोवा (२०१५), केरळ (२०१६) यांची घोर निराशा झाली होती. आणखी एक मुद्दा म्हणजे साखळी टप्यात गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविलेला संघ २०१४ मधील मोसमापासून एकदाही विजेता ठरलेला नाही.

बंगळुरूच्या चाहत्यांना मात्र या दाक्षिणात्य डर्बीत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यापासून काहीही रोखू शकणार नाही. ते स्टेडियम दणाणून सोडण्यास आणि सामना संपल्याची शिट्टी वाजेपर्यंत आपल्या संघाला पाठिंबा देण्यास सज्ज झाले आहेत. बंगळुरूने घरच्या मैदानावर मोहिमेची विजयी सुरवात केली होती. आता ते विजयानेच सांगता करतील अशी चाहत्यांना आशा आहे.

यंदाच्या मोसमात बंगळुरू लक्षवेधी संघ ठरला आहे. त्यांनी ३८ गोल केले, जे गोव्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे आहेत. बंगळुरूचे वर्चस्व स्पष्टपणे वाढविणारा मुद्दा म्हणजे त्यांचा भक्कम बचाव. त्यांच्याविरुद्ध केवळ १७ गोल झाले आहेत. त्यांचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याचा बचाव भेदणे प्रतिस्पर्धी संघांसाठी अत्यंत अवघड ठरते आहे. त्यामुळे आणखी एका सामन्यात खेळाचा धडाका कायम राखण्याचा विश्वास बंगळुरूला वाटत असेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या दहा सामन्यांत अपराजित मालिका राखताना बंगळुरूने आठ विजय मिळविले आहेत.अर्थात प्रत्येक मुद्दा बंगळुरूच्या बाजूने नाही. चेन्नईन एफसीला सुद्धा आपल्या संधीविषयी आत्मविश्वास वाटत असेल. त्यांनी साखळीत बंगळुरूला त्यांच्याच मैदानावर २-१ असे हरविले होते. त्यावेळी धनपाल गणेशने अंतिम टप्यात केलेला गोल निर्णायक ठरला होता.जॉन ग्रेगरी यांच्या संघाने आपल्या क्षमतेचे चांगले प्रदर्शन केले आहे. महत्त्वाचे सामने जिंकण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. उपांत्य फेरीत एफसी गोवा संघाविरुद्ध फेरॅन कोरोमिनास आणि मॅन्युएल लँझारोटे या धोकादायक जोडीची त्यांनी यशस्वी नाकेबंदी केली. आता सुनील छेत्री आणि मिकू यांच्याविरुद्ध याचीच पुनरावृत्ती करण्याची त्यांना आशा आहे. बंगळुरूचे ३८ पैकी २७ गोल या जोडीने केले आहेत. पूर्वी आयएसएल फायनल खेळलेले आणि आव्हानात्मक परिस्थितीत विजेते ठरलेले खेळाडू संघात असणे ग्रेगरी यांचे सुदैव आहे. मैल्सन आल्वेस, रॅफेल आगुस्टो, जेजे लालपेखलुआ, करणजीत सिंग हे २०१५ मधील विजेत्या संघाचे घटक होते. आता गोव्यात केली तशीच कामगिरी बंगळुरूमध्ये करण्याचा त्यांचा निर्धार आहे.