गोसुमंची डिचोलीत संघटनात्मक बांधणी

0
89

डिचोली (न. प्र.)
गोवा सुरक्षा मंचच्या राज्यव्यापी बूथ चलो अभियानाचा भाग म्हणून वेगवेगळ्या मतदारसंघात बूथ संघटना बांधण्याासाठी पक्ष कार्यकर्ते झटत आहेत. पक्षाचे प्रेरणास्थान सुभाष वेलिंगकर ह्यांच्या उपस्थितीत रविवारी डिचोलीत मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. डिचोली मतदारसंघातील लामगाव, कुंभारवाडा, भायली पेठ, नाईकनगर, खरपाल, साळ अशा विविध भागात बैठका यशस्वीपणे घेण्यात आल्या.
यावेळी श्री. वेलिंगकर यांनी, उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुबड्यांच्या आधारावर असलेल्या सरकारला जनतेच्या स्वाभिमानाशी, त्यांच्या मातृभाषेशी खेळ करायला गोवा सुरक्षा मंच कधीही देणार नाही. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता आणि आमदारांच्या चाललेल्या बेडुक उड्या पहाता, गोवा सुरक्षा मंच हा एकच पर्याय जनतेसमोर आहे. पक्षाच्या तत्वांशी व नियमांशी प्रामाणिक असणार्‍यांनाच पक्ष उमेदवारी देईल असे सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देखील चांगला प्रतिसाद दिला व सभासद नोंदणीत भाग घेतला.
गोवा सुरक्षा मंचचे, डिचोली मतदारसंघाचे अध्यक्ष भोलानाथ गाड यांचेही यावेळी भाषण झाले. डिचोली मतदारसंघाचे उपाध्यक्ष विठू पोपकर, सदाशिव सामंत, युवा प्रमुख मंजुनाथ आवजी, सहसचिव सोमनाथ हरमलकर, नितीन माळगांवकर, दत्ताराम हरमलकर, नीळकंठ कुंभार, सचिन परवार, भुपेंद्र मळीक आदींची उपस्थिती होती.
आगामी काळात मतदारसंघातील उर्वरित सर्व बुथांवर बैठका घेतल्या जातील व अधिकाधिक लोकांपर्यंत गोवा सुरक्षा मंच, बुथ चलो अभियानांतर्गत पोहचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.