गोष्ट लाल डब्याची!

0
173

 

लाडोजी परब

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ खरंच आहे ते. थोडे पैसे हाती आले, स्वत:ची गाडी आली की एसटीतून फिरणे कमीपणाचे वाटते. पण मला एक सांगावंस वाटतं, ऐशआरामात एसीतून बसून म्युझिकच्या तालावर थिरकत जाण्यापेक्षा निसर्ग न्याहाळत, गप्पा गोष्टी करीत, इतरांच्या सुख दु:खाचे रंग न्याहाळत प्रवास करण्याची मजा काही औरच! अनेकांची सुख दु:खे या एसटीने स्वत:च्या पोटात सामावून घेतलीय.

ही गोष्ट आहे लाल डब्याची! महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीत बसलाच असाल! बाहेरून जसा लाल रंग तसाच आतूनही पान खाऊन थुंकल्यामुळे लाल. सगळे किती घाणेरडे वाटत असले तरी आपुलकीचे एक नाते एसटीच्या आतमध्ये असते. गोंधळ, भांडण, तंटे, रेटारेटी असली तरी एक विश्‍वासार्हता लोकांच्या मनात घर करून आहे. एसटीचा कुुटुंब प्रमुख वाहक! सगळं हँडल करावं लागतं.
आम्ही त्यावेळी कॉलेजात जायचो. दुपारच्या गाडीने घरी यायचो. एक दिवस गाडी सड्यावर, निर्जन ठिकाणी आली. धाडकन बेल वाजली. ड्रायव्हरने कच्‌कन ब्रेक दाबला. दार उघडून कंडक्टर धावत सुटला. दूरवर झाडांच्या आड दिसेनासा झाला. काय झालं काही कळेना, गाडीत कुजबुज ‘पैसे घेवन पसार झालो की काय?’ पाच मिनिटात परत आला. नंतर कळलं तो ‘दोन नंबर’ला गेलेला! एक प्रवासी पणजीत चढला, त्याला सावंतवाडीत जायचं होतं. वाहकाने सुट्‌ट्या पैशांची मागणी केली. पण तो प्रवासी वाहकाच्या अंगावरच धावला. ‘आमची काय पैशांची फॅक्टरी आसा?, सुट्टे पैसे ठेवक येनत नाय तर कशाक कामा करता?’ असं सांगितल्यावर वाहकाचाही तोरा चढला. ‘सुट्टे पैसे नाय तर प्रवास कित्याक करतात?’ एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण गेले. एका प्रवाशाला दोघांची कीव आली. त्यानं सुट्टे पैसे देऊन वाद मिटवला.
कॉलेज आणि एसटीचं नातं जन्मजन्मांतराचं! काही गोष्टी एसटीत मजेशीर घडतात. कॉलेजकुमार एसटीचा पास कशासाठी काढतात? एक मौजमजा…सळसळत्या तरुणाईची झलक! दुचाकी असणारेही एसटीतून कॉलेजात जाणार! काही तरुण सीट पकडण्यापेक्षा गर्दीत चढणे पसंत करतात. कारण उभ्या असलेल्या तरुणींचा स्पर्श त्यांना आत्मिक समाधान देत असतो. बहुतेक प्रेम प्रकरणांची ‘कनेक्शन्स’ एसटीतच सापडतात. लफड्यांसाठी मागची सीट हाऊसफुल्ल असते. आमच्याकडचा दिनू आणि शेजारची वैष्णवी यांचं प्रेमप्रकरणाला एसटी साक्षी आहे. कॉलेजातून येताना नेहमी हे प्रेमी युगुल मागची सीट पकडायचे. एके दिवशी गर्दीत वैष्णवीचा बाबा शिवराम मध्येच कुठे चढला त्यांना कळलेच नाही. मुलीचे प्रताप त्यानं ‘याची डोळा, याचि देही’ पाहिले. घरी गेल्यावर पाढा वाचला! दुसर्‍या दिवशी वैष्णवीला टू व्हीलर आणून दिली. एसटीचा प्रवास बंद! झालं उलटच, आता टू व्हिलर वरून ते दोघंही समुद्रकिनार्‍यांवर गळ्यात गळा घालून फिरायला जातात.
मध्यंतरी एसटीत कॉईन बॉक्सची सोय केलेली होती. कित्येकदा रुपया टाकल्यावर एसटी वाकडी तिकडी झाल्यावर तो पुन्हा खाली यायचा. कधी कधी नेटवर्क जायचं आणि बोलणं अर्ध्यावरच राहायचं. सर्वांच्या समोर बोलणार तरी काय म्हणा! एकदा एका वृद्ध व्यक्तीने घरात फोन लावला होता. ‘अगो, आयकतय मा?? माशे हाडतंय, मरणाचे म्हाग आसत…मिरची वाटून ठेव’ कालांतराने ते कॉइन बॉक्सच काढले. एसटीत आमदार, पत्रकार, महिला, विकलांग यांच्यासाठी राखीव सीट असतात. पण त्याचं पालन कोण करीत नाही. एकदा एक वृद्ध बाई चढली. एसटीत खचाखच गर्दी होती. महिलांच्या सीटवर कॉलेज तरूण बसलेले. ‘आजी सावकाश!’ एवढंच ते बोलत होते. ‘बाबा वायचसो जागो दिया’ म्हटल्यावर एक तरुण उठला आणि तिला जागा दिली. त्याची गर्ल फ्रेंड विंडो सीटजवळच होती. आजीबाईंचा तिला वीट येत होता. त्या तरुणानं जागा देऊन स्वत:ची शाइन मारून घेतली. आजीबाईनं तोंडात पान कोंबल्यामुळे अधूनमधून ती विंडो सीटजवळ वाकून बाहेर थुंकत होती. तोच तिची थुंकी पाटच्या सीटवर बसलेल्या वृद्धाच्या तोंडावर पडली आणि क्लेश सुरू! पंधरा मिनीटे दोघं भांडत होती. या भांडणात आजोबांची एनर्जी मात्र गेली.
आम्ही जेव्हा कॉलेजात जायचो, तेव्हा एसटीत जागा पकडण्यासाठी स्पर्धा लागायची. कुणी आपल्या मित्राला, कुणी नातेवाइकाला, कुणी प्रेयसीला आधी वर चढून जागा अडवायचा. त्यात असं व्हायचं, वयोवृद्धांना जागाच मिळायची नाही. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ बेसीसची ही सवय मोडून एकदा रांगेत उभे राहून चढण्याचा नियम आला होता. त्याचं असं व्हायचं, गाडीच पंधरा वीस मिनिटे उशिरा यायची. मग लोकांच्या तोंडाला लागण्यापेक्षा रांगच नको, म्हणून हा नियम बंदच झाला. भांडणे ही नित्याचीच गोष्ट! तरीही तो सहवास हवाहवासा वाटायचा. कारण त्यात आपुलकी, स्नेहभाव, आनंद याचे वास्तव्य असल्याने हा प्रवास कधी संपूच नये, असं वाटायचं. विंडो सीटजवळ बसून डुलक्या घेणारेही काही कमी नसायचे. बहुतेकदा त्यांना स्वत:चा स्टॉप आल्याची जाणीव नसायची. मग वाहक येऊनच एक थापट द्यायचा. ‘अहो, चला उठा, तुमचो स्टॉप इलो, झोपलात काय?’
आता तरी डांबरी रस्ते झालेत. पूर्वी लाल रस्त्याने धुरळा उडवत एसटी जायची, ते चित्र विलक्षण असायचं. आजूबाजूची झाडं लालेलाल! पांढरे कपडे लाल रंग धरायचे. त्यामुळे खाकी कपडे घालूनच काही जण प्रवास करायचे. आमच्याकडचा विष्णू हे एसटीचं रोजचंच गिर्‍हाईक. कधी हाप कधी फुल पॅक मारून तो एसटीत दिसतोच. सुरुवातीला वाहकांना तो अक्षरशः: चकवायचा. कधी कधी पुढे जाऊन पाठीमागे तिकीट घेणार म्हणून सांगायचे, तर कधी पाठीमागे बसल्यावर पुढे तिकीट काढणार म्हणायचे. त्यानंतर सगळे वाहक ओळखीचे झाल्यावर तो चढण्यापूर्वी त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहेत की नाही, याची खातरजमा व्हायची.
बर्‍याचदा पावसाळ्यात चिंब चिंब भिजण्याचा अनुभव एसटीतही यायचा. गळक्या बसेसमुळे! बर्‍याच जणांना अभिषेक घेण्याची पाळी यायची. कधी कधी तर प्रवासी छत्रीच उघडून बसायचे. स्टॉप नसतानाही बेल वाजवली म्हणून कित्येकदा वाद व्हायचे. म्हणून तर नंतर ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ उपक्रम निघाला. काही वेळा भरपूर गाडीत गर्दी असल्यास उतरणार्‍या प्रवाशांसाठी ती दूरवर नेऊन उभी करायची. ही ड्रायव्हरांची टेक्नॉलॉजी. लोक मग धावत धावत तिकडे जायचे. मिळाली तर ठीक नाही तर काय, बोटं मोडायचे. कधी कधी खड्‌ड्यात बस गेली की, पाठीमागचे प्रवासी उकलून आपटायचे. एकदा झालं असं, एक बाई मागच्या सीटवर बसली होती. एक असा मोठा खड्डा आला, त्याचा अंदाज ड्रायव्हरला आला नाही. धाडकन गाडी आपटली आणि पाठीमागच्या सीटवरून थेट लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. पाहतो तर काय, ती बाई आठ महिन्यांची गरोदर होती. आणि एसटीतच बाळंत झाली. मग एसटी थेट रुग्णालयात. काही लोक एसटी लागते म्हणून पाठीमागे बसायचे. कसं, उलट्या करायला बरं पडतं म्हणून.
एकदा मी पणजी – कोल्हापूर बसने प्रवास करीत होतो. ड्रायव्हर ‘तेजाब’, आता गोव्यात आल्यावर पोटात ‘पेट्रोल’ भरल्याशिवाय त्यांची गाडी कशी चालणार. त्याचं प्रमाण जरा जास्तच झालेलं. इन्सुली घाटीच्या पुढे धाडदिशी झाडावर नेऊन आदळली. काहींना दुखापत झाली. लोक आधी रुग्णांना बाहेर काढण्याअगोदर ड्रायव्हरलाच चोपत होते.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ खरंच आहे ते. थोडे पैसे हाती आले, स्वत:ची गाडी आली की एसटीतून फिरणे कमीपणाचे वाटते. पण मला एक सांगावंस वाटतं, ऐशआरामात एसीतून बसून म्युझिकच्या तालावर थिरकत जाण्यापेक्षा निसर्ग न्याहाळत, गप्पा गोष्टी करीत, इतरांच्या सुख दु:खाचे रंग न्याहाळत प्रवास करण्याची मजा काही औरच! अनेकांची सुख दु:खे या एसटीने स्वत:च्या पोटात सामावून घेतलीय.
मुंबईत लोकलमध्ये जसे प्रवाशांचे नाते निर्माण झाले आहे, तसं नातं कोकणवासियांचं एसटीशी आहे. कालानुरूप आज त्यात आधुनिक बदल झाले असले तरीही जिव्हाळा तोच आहे. घरच्या कित्येक गोष्टी येथे रंगतात. एकमेकांच्या सुख दु:खाला वाट मोकळी करून दिली जाते. ती वाट एसटी चालत असते. कधीही न संपणार्‍या प्रवासासाठी!