गोष्टी मनाच्या… मनातल्या… वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आणि मी

0
230
  •  मानसी म. बांदोडकर

कधी कधी एखादी सनसनाटी खबर पेपरमध्ये कशी छापून येईल याची आपण उत्सुकतेने वाट बघत बसतो आणि नेमका त्याच दिवशी पेपरवाला उशिरा येतो. हीच तर गंमत असते आपल्या रोजच्या आयुष्यातील.

आजच्या युगात न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. सकाळच्या वेळी वाफाळला चहा व त्यासोबत हातात वर्तमानपत्र जर असेल तर एक स्वर्गीय आनंद मिळतो.

तसं बघायला गेलो तर प्रत्येकाला आपल्या अवतीभवती जे काही घडतं त्याविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. पेपर वाचल्यामुळे आपली बौद्धिक भूक भागवली जाते. तसेच आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. तसेच पेपरमध्ये फक्त आपल्या गावातल्याच नाही तर आपल्या देशात, जगाच्या कानाकोपर्‍यात जे काही चालतं, घडत असतं त्याची आपल्याला माहिती मिळते.

खरं म्हणजे प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी स्वतःला पेपर वाचण्याची सवय लावून घ्यावी. कारण पेपरमध्ये रोजच्या ताज्या बातम्यांसोबतच निरनिराळ्या पुरवण्याही असतात. त्यामध्ये इतर सगळ्या विषयांवर तज्ज्ञांचे लेख असतात, ज्यामुळे सगळ्या विषयांचे आपल्याला आकलन होते. प्रत्येक पेपरच्या पुरवणीचं आपापलं असं एक वैशिष्ट्य असतं. आणि खरंच या सुंदर एकापेक्षा एक सरस लेख असलेल्या पुरवण्या आमची बौद्धिक भूक शमवितात. आपल्या मनाला एक वेगळाच आनंद देतात.
माझे वडील नेहमी सगळ्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, विशेषतः रविवारच्या पुरवण्या आणत असत व त्या पुरवण्या वाचण्यासाठी मी स्पेशल वेळ राखून ठेवत असे. त्या सगळ्या पुरवण्या माझे लक्ष वेधून घेत असत. कधी एकदा त्या पुरवण्या वाचते असे मला वाटायचे. त्या पुरवण्यांमध्ये विविध विषयांवरचे इतके लेख असायचे की मी त्यांचा संग्रहच केला होता व कधीही माझ्या मनात आले की मी त्या वाचून काढायची. त्या पुरवण्या सदैव मनाला एक नवी चेतना, सकारात्मक विचार देणार्‍याच असायच्या. आजही नवप्रभाची ‘कुटुंब’ ही पुरवणी संपूर्ण कुटुंबाची भूक भागवणारी आहे तर ‘आयुष’ ही पुरवणी सर्व कुटुंबाच्या स्वास्थ्याची काळजी घेणारी जणु ‘फॅमिली डॉक्टर’च आहे. तसेच इतर वर्तमानपत्रांच्याही पुरवण्या वाचनीय आहेत.
महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पेपरबरोबरच त्यांच्या पुरवण्या आपली बौद्धिक भूक तर भागवतातच. पण जेव्हा पेपरमधील वाईट बातम्या वाचून आपलं मन विषण्ण होतं त्यावेळेला त्याच पेपरच्या पुरवणीमधील एखाद्या लेखामुळे आपलं मन उभारी घेतं किंवा वाईट बातमी वाचल्यामुळे आलेली आपल्या मनातील उद्विग्नता कमी होते. म्हणूनच एखाद्या दिवशी पेपर आला नाही तर आपण किती बेचैन होतो. पेपरवाला कधी येईल याची आतुरतेने वाट बघत असतो.

आज टीव्हीमुळे बर्‍याचशा बातम्या आपल्याला रात्रीच कळतात. तरीही पेपर वाचण्याची किंवा बघण्याची आपली उत्सुकता जराही कमी होत नाही. पेपर पाहिल्याबरोबर तो हातात आपण घेतोच आणि कितीही वेळेची कमी असली तरी घाईघाईत का होईना हेडलाईन्सवर नजर मारल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. कधी कधी एखादी सनसनाटी खबर पेपरमध्ये कशी छापून येईल याची आपण उत्सुकतेने वाट बघत बसतो आणि नेमका त्याच दिवशी पेपरवाला उशिरा येतो. हीच तर गंमत असते आपल्या रोजच्या आयुष्यातील. नाही का??