गोव्याने तामिळनाडूला १-१ बरोबरीत रोखले

0
80

>> वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल

राखीव खेळाडू कॅरन कॉस्ताने दुसर्‍या सत्राच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर गोव्याने तामिळनाडूला १ -१ असे बरोबरीत रोखत उदिशा येथे कालपासून सुरू झालेल्या २३व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गुण विभागून घेतला. गोव्याच्या प्रशिक्षकांनी कालच्या या आपल्या शुभारंभी सामन्यात करिष्मा शिरवलकर या एकमेव स्ट्रायकर खेळाडूसह सुरुवात केली. गोव्याने या सामन्यात आक्रमक सुरुवात करताना दुसर्‍याच मिनिटाल गोलसंधी निर्माण केली होती. परंतु करिष्माचे प्रयत्न तामिळनाडूची गोलरक्षक सौमियाने उधळून लावले. १२व्या मिनिटाला तामिळनाडूच्या इंदुमतीने घेतलेला फटका गोव्याची गोलक्षक कँडायसी फर्नांडिसने सुरेखपणे थोपविला. अखेर १८व्या मिनिटाला गोलकोंडी सुटली.

तामिळनाडूच्या इंदुमतीने गोव्याच्या सिंथिया लोबो आणि लिंडा कुलासो यांना चकवित घेतलेल्या जोरकस फटक्यावर गोव्याची गोलरक्षका कँडायसी काहीही करू शकली नाही. पहिल्या सत्रात तामिळनाडूने आपली आघाडी राखली. दुसर्‍या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर देत गोलसंधी निर्माण केल्या. बरोबरी साधण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहून प्रशिक्षक ऍन्थनी यांनी ट्रम्प कार्ड असलेली बचावपटू कॅरन कॉस्ताला डाव्या विंगेत उतरविले आणि त्याचा फायदा गोव्याला झाला. कॅरनने ८३व्या मिनिटाला गोव्याला १ -१ अशी बरोबरी साधून दिली. तत्पूर्वी तामिळनाडूने सिक्कीमचा ५ -० असा धुव्वा उडविल होता. तर सिक्कीमने उत्तराखंडवर ४ -१ अशी मात केली होती.