गोव्याने ‘इफ्फी’तून काय साधले?

0
230

– मिलिंद म्हाडगुत 

२००४ साली ‘इफ्फी’ने गोव्यात प्रवेश केला. यंदाचा हा गोव्यातील अकरावा ‘इफ्फी.’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार म्हणून २००४ साली रसिकांत भरपूर उत्कंठा होती. त्यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी अभिनेता दिलीपकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचे कला अकादमीत उद्घाटन झाले. ९ नोव्हेंबर २००४ रोजी या ‘इफ्फी’चा समारोप झाला होता. त्यावेळी पणजीत जवळजवळ लाख- दीड लाखाचा जनसमुदाय जमला होता. संपूर्ण पणजी शहर इफ्फीमय झाल्यासारखे वाटत होते. ‘सूड’ व ‘आलिशा’ या दोन गोमंतकीय चित्रपटांचे प्रिमियर शोही याच इफ्फीत झाले.
२००५ साली उद्घाटनाचे स्थान आयनॉक्स कोर्टयार्ड करण्यात आले. सदाबहार अभिनेता देव आनंद यांच्या हस्ते या ‘इफ्फी’चे उद्घाटन करण्यात आले होते. नंतर २००६ साली शशी कपूरच्या हस्ते तर २००७ साली शाहरूख खानच्या हस्ते ‘इफ्फी’चे उद्घाटन करण्यात आले होते.२००४ साली जेव्हा ‘इफ्फी’ गोव्यात आला तेव्हा त्यामुळे गोमंतकीय चित्रपटसृष्टी उभारी घेऊ शकेल असा एक प्रवाह होता. आज दहा वर्षांनंतर हा प्रवाह संपूर्णपणे खरा ठरलेला नसला तरी अगदी खोटा ठरला आहे असेही नाही. ‘इफ्फी’ गोव्यात येण्यापूर्वी गोव्यातील चित्रपटसृष्टी अगदी मृतावस्थेत होती. फक्त व्हिडिओपट वा दूरदर्शनपटांची गोमंतकात निर्मिती होत असे. ‘इफ्फी’मुळेच नवीन नवीन चित्रपट गोव्यात तयार होऊ लागले आहेत यात दुमत असण्याचे कारण नाही. केवळ कोकणीच नव्हे तर मराठी चित्रपटांचीसुद्धा गोव्यात निर्मिती व्हायला लागली आहे. यातले काही चित्रपट तर महाराष्ट्रातही व्यावसायिक तत्त्वावर प्रदर्शित झाले आहेत. यावर्षी प्रदर्शित झालेले ‘अ रेनी डे’ व ‘गुरुपौर्णिमा’ ही उदाहरणे वानगीदाखल देता येतील. अगदी गाजावाजा करून हे दोन्हीही चित्रपट अनुक्रमे जानेवारी व सप्टेंबर महिन्यांत प्रदर्शित झाले होते. त्याचबरोबर ‘गुणाजी’ या कोकणी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर यंदा चांगलेच यश संपादन केले आहे. ‘पलतडचो मनीस’, ‘बागा बीच’सारख्या लक्ष्मीकांत शेटगावकरांच्या कोंकणी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय यश प्राप्त करून गोमंतकीय चित्रपट सृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही सगळी किमया ‘इफ्फी’ची आहे यात शंकाच नाही. पण या जमेच्या बाजूबरोबर अनेक त्रुटीही आहेत. मुळात ‘इफ्फी’ने ज्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या, त्यांतील बर्‍याच अपेक्षा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. अजूनही गोमंतकीय चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश मिळालेले नाही. ‘ओ मारिया’ आणि थोडाफार ‘गुणाजी’चा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत एकही गोमंतकीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर लागलेला नाही. गोमंतकीय निर्मात्यांनी निर्माण केलेल्या मराठी चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर यश लाभलेले नाही. वर नमूद केलेल्या ‘अ रेनी डे’ व ‘गुरुपौर्णिमा’ या चित्रपटांचीही बॉक्स ऑफिसवर वाताहात झालेली आहे. ‘चांदी’ या गेल्या वर्षीच्या बहुचर्चित गोमंतकीय मराठी चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर मर्यादित यशावर समाधान मानावे लागले आहे. अजूनही गोमंतकीय मराठी चित्रपटांची ‘क्रेझ’ तयार झालेली नाही आणि यामुळेच नामांकित मराठी चित्रपट तारे असूनही गोमंतकीय मराठी चित्रपट अपेशी ठरताना दिसताहेत. त्याचबरोबर गेली चार वर्षे निर्मात्याकरिता असलेली आर्थिक अनुदान योजना बंद असल्यामुळे गोमंतकीय चित्रपट-निर्मात्यांत मरगळ पसरलेली दिसून येत आहे. परवा असाच एक गोमंतकीय चित्रपट-निर्माता हेच बोलला. ‘इफ्फीला जाऊन काहीच फायदा नसल्यामुळे यंदा मी प्रतिनिधी कार्डसुद्धा केलेले नाही’ असे त्याने सांगितले. इफ्फीचा दर्जा घसरत चालला असल्याचेही त्याचे मत पडले.
जागतिक चित्रपट महोत्सवातही ‘इफ्फी’चे रेटिंग घसरत चालले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ‘कान्स’, ‘बर्लिन फेस्टिव्हल’ सोडाच, मुंबई-पुण्यातले स्थानिक महोत्सवसुद्धा आज इफ्फीच्या पुढे जायला लागले आहेत. याचमुळे हॉलिवूड-बॉलिवूड सितारे इफ्फीत यायला का कूं करताना दिसतात. गेल्या दोन इफ्फीत तर तार्‍यांचा अक्षरशः शुकशुकाटच होता. इफ्फी सुरू होण्यापूर्वी मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीत येणार्‍या तारे-तारकांची एक मोठी यादीच देण्यात येते; प्रत्यक्षात मात्र रसिकांना बी ग्रेड बॉलीवूड-हॉलीवूड अभिनेत्यांवर समाधान मानावे लागते.
२००४ ते २००६ पर्यंतच्या इफ्फीत तारे-तारकांची मांदियाळी असायची. २००५ साली देव आनंदबरोबरच राजेश खन्ना, उर्मिला मातोंडकर, यश चोप्रा, अमिषा पटेलसारखे अनेक टॉप ग्रेड बॉलिवूड स्टार उपस्थित होते. २००६ सालीही शशी कपूर, सलमान खान, तब्बू, आशा पारेखसारखे अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. २००९ सालापासून या उपस्थितीला ओहोटी लागू लागली. याचे प्रमुख कारण म्हणजे इफ्फीचा घसरत चाललेला दर्जा.
यंदा बारा-पंधरा हजार प्रतिनिधी इफ्फीत जमणार अशी शेखी मनोरंजन संस्था मिरवित आहे. गेल्या वर्षीही दहा हजार प्रतिनिधींनी नोंद केल्याचे मनोरंजन संस्था सांगत होती. पण तरीही नंतरचे चार दिवस इफ्फी सेंटरवर शुकशुकाट दिसत होता. यामुळे या नोंद केलेल्या प्रतिनिधींपैकी खरोखरच गंभीरपणे रस घेणारे, चित्रपट क्षेत्राशी संबंधित असलेले किती प्रतिनिधी होते हा प्रश्‍न उपस्थित होतोच. इफ्फी हा हौशे-नवशे-गवश्यांचा खेळ नसून तो एक सिरियस बिझिनेस आहे हेच आयोजक विसरायला लागले आहेत. आणि याचकरिता जागतिक चित्रपट महोत्सवात इफ्फीची घसरण सुरू झाली आहे. यंदापासून गोवा खर्‍या अर्थी इफ्फीचे कायमचे केंद्र बनले आहे.
२००४ साली जरी केंद्रीय प्रसारण खात्याकडून गोव्याला कायमच्या केंद्राचे आश्‍वासन मिळालेले असले तरी ते प्रत्यक्षात यायला दहा वर्षे लागली. आता यापुढे गोव्याला केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडे दरवर्षी जी कवायत करावी लागत होती ती करावी लागणार नाही. अर्थात त्यामुळे दर्जात वाढ होईल की नाही हे सांगता येणे कठीण आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे गोवा इफ्फीचे जनक म्हणून ओळखले जातात. केंद्रात विरोधी सरकार असूनसुद्धा विपरित परिस्थितीतून पर्रीकरांनी हा इफ्फी गोव्यात आणला. पण आता गोवा हे इफ्फीचे कायमचे केंद्र म्हणून जाहीर झाल्यानंतर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री नसणे ही इफ्फीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. गोव्यात अजूनही इफ्फीकरिता लागणारा परिपूर्ण हॉल (कन्व्हेन्शन सेंटर) नाही. २००४ साली हा हॉल दोनापावल येथे पाच वर्षांच्या आत बांधणार असे तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जाहीर आश्‍वासन दिले होते. पण अकरा वर्षे होऊनही हे आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. आणि याची खंत प्रत्यक्ष निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी २०१० सालच्या इफ्फीत व्यक्त केली होती. अजूनही गोव्यात इफ्फीला आवश्यक असलेल्या साधनसुविधा नाहीत. २००४ साली दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही असे जाहीर वक्तव्य चोप्रा यांनी २०१० साली इफ्फीच्या उद्घाटन समारंभात केले होते. हा हॉल होत नसल्यामुळे इफ्फीचा उद्घाटन व समारोप सोहळा करण्याकरिता कधी कला अकादमीचा तर कधी एखाद्या मैदानाचा आसरा घ्यावा लागतो आहे.
इफ्फी गोव्यात होत असल्यामुळे गोमंतकीय चित्रपटांकरिता खास विभाग असायला हवा अशी मागणी गोमंतकीय निर्मात्यांकडून होत होती. २००५-०६ साली काही गोमंतकीय चित्रपट ‘बीच शो’ म्हणजे समुद्र किनार्‍यांवर दाखविण्यात आले होते. २००७ साली इफ्फीत काही गोमंतकीय चित्रपट गावोगावी दाखविण्यात आले होते. त्यानंतर २००८ साली गोवन पॅनोरमा नावाचा एक विभाग इफ्फीत सुरू करण्यात आला होता. पण तो फक्त एकच वर्ष टिकला. गेल्या वर्षीही काही गोमंतकीय चित्रपट इफ्फीत दाखविण्यात आले होते. पण हे चित्रपट इफ्फीने अधिकृत नसल्याचे जाहीर केल्यामुळे गोमंतकीय निर्मात्यांच्या उत्साहावर पाणी पडले होते. पण यंदा गोमंतकीय चित्रपटांकरिता अधिकृत विभाग सुरू झाला आहे. हा एक चांगला उपक्रम असला तरी तो दरवर्षी असावा हीच अपेक्षा. यंदा या विभागाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी भविष्याच्या दृष्टीने हा एक स्तुत्य उपक्रम आहे यात शंकाच नाही.
२००८ सालापासून शॉर्ट फिल्म सेंटर हा विभाग सुरू करण्यात आला होता. जगभरातील उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म्स या विभागातर्फे दाखविण्यात येत होत्या. २००८ साली या शॉर्ट फिल्म्स निवड समितीच्या ज्यूरी पॅनेलचा मीही एक सदस्य असल्यामुळे मलाही ही जगभरातील उत्तमोत्तम शॉर्ट फिल्मे बघण्याची संधी मिळाली होती. त्यातला ‘रोड’ हा अफगाणिस्तानचा लघुपट तर अफलातूनच होता. एक मिनिट ते तीस मिनिटे या कालावधीतसुद्धा दिग्दर्शक आपली कल्पकता किती प्रभावीपणे मांडू शकतो याचा प्रत्यय या शॉर्ट फिल्म्स पाहताना आम्हाला आला होता. पण ही सुंदर कल्पनाही काही घटकांना मानवली नाही. या सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची ओरड होऊ लागली. तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याविरुद्ध विधानसभेतसुद्धा आवाज उठविला होता. याचा परिणाम म्हणून २०११ सालापासून हे शॉर्ट फिल्म सेंटर बंद पडले. एका चांगल्या कल्पनेचा अकाली अस्त झाला.
अकराव्या इफ्फीच्या पार्श्‍वभूमीवर आपण आतापर्यंतच्या इफ्फीच्या यशापयशाचा विचार केल्यास गोव्यातील इफ्फीला अजून एक अशी ठराविक दिशा मिळालेली नाही असंच म्हणावं लागतं. इफ्फीत सांस्कृतिक कार्यक्रम असावेत की नको यावर अजूनही वाद सुरू आहे. २०१२ व २०१३ साली या सांस्कृतिक कार्यक्रमात करोडो रुपयांचे घोटाळे झालेले असताना त्याला सर्वस्वी जबाबदार या संस्थेचे सरव्यवस्थापक असल्याचा आरोप फिल्म फेस्टिव्हल ऑफ गोवा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने केला आहे. महाराष्ट्रातील कलाकारांना त्यांच्या रेटपेक्षा अव्वाच्या सव्वा जास्त मानधन दिले गेले आहे, अशा तक्रारी मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. वास्तविक इफ्फी हा चित्रपट महोत्सव असल्यामुळे त्यात फक्त चित्रपटच असायला हवेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपयोग हा तोंडाला लावण्यापुरताच असायला हवा. यानिमित्ताने गोवाभर चित्रपट दाखविले गेले तर ते सर्वच दृष्टीने उचित ठरू शकेल. एकंदरित अजूनही गोव्यातील इफ्फी प्राथमिक अवस्थेतच आहे. अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्याकरिता सकारात्मक दृष्टिकोनाची व विधायक उपक्रमांची आवश्यकता आहे. हल्लीच्या इफ्फीत चांगले व जगभर गाजलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविले जात नाहीत, अशीही टीका केली जात आहे. २००५ साली दाखविलेल्या ‘ओल्गा’सारखे चित्रपट आज इफ्फीत दिसत नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण त्याकरिता वर नमूद केल्याप्रमाणे इफ्फीचा दर्जा वाढायला हवा. असे झाले तरच जगात गाजलेले चित्रपट इफ्फीत प्रवेश करू शकतात. मुख्य म्हणजे इफ्फी या लाल फितीतून बाहेर पडायला हवा. सध्या मनोरंजन संस्थेच्या सदस्यपदी वर्णी लावताना हा भाजपचा, तो कॉंग्रेसचा अशी जी फूटपट्टी लावण्यात येते ती बंद व्हायला हवी. सदस्यांची वर्णी ही ‘मेरिट’वर व्हायला पाहिजे. असे झाले तर विधायक निर्णय घेणारी मंडळी मनोरंजन संस्थेत टिकू शकते व त्याचा फायदा इफ्फीला होऊ शकतो. काही का असेना, आशा बाळगायला अजूनही बराच वाव आहे. अकराव्या इफ्फीचे स्वागत करताना भविष्यात या आकांक्षांना धुमारे फुटतील व जागतिक चित्रपट महोत्सवात इफ्फीचा आलेख रुंदावत जाईल हीच अपेक्षा!