गोव्यात सरकारी नोकरभरती प्रक्रिया लवकरच

0
122

>> पहिल्या टप्प्यात १२०० पदे भरणार

>> मुख्यमंत्र्यांची भाजप मेळाव्यात माहिती

येत्या ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यापासून सरकारची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे १२०० पदे भरण्यासाठीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पणजीत भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली.

विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नसून कार्यकर्त्यांनी गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला परत एकदा जिंकता याव्यात यासाठी पुढील ८ ते ९ महिने जीवाचे रान करावे, असे आवाहनही पर्रीकर यांनी केले. आता गोव्यात जी मोठमोठी विकासकामे चालू आहेत ती केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर नसते तर होऊ शकली नसती असा दावा त्यांनी केला.
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पण विरोधी कॉंग्रेसने असा सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

कॅसिनो, प्रादेशिक आराखड्यास
कॉंग्रेसच जबाबदार
गोवा सरकार विरोधी कॉंग्रेस पक्ष खूप अपप्रचार करीत असतो. प्रादेशिक आराखडा प्रकरणी ते सरकारवर टीका करतात. पण दिंगबर कामत मुख्यमंत्री असताना कॉंग्रेस सरकारनेच हा प्रादेशिक आराखडा अधिसूचित केला होता. मांडवी नदीतील कॅसिनोही कॉंग्रेस सरकारनेच आणले होते. एमपीटीत कोळशाला परवानगीही कॉंग्रेस सरकारने दिली होती, असे सांगून आता या सगळ्या गोष्टींसाठी ते भाजप सरकारला जबाबदार धरीत असल्याचे पर्रीकर म्हणाले.

बँक लुटारुंनाही तत्कालीन
कॉंग्रेस सरकारवेळी कर्ज
बँकांना लुटून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या व निरव मोदी यांना कर्जे मंजूर करण्यात आली होती तीही केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना, असा आरोपही पर्रीकर यांनी यावेळी केला.
राज्यात आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण नवजात मुलासह ९० वर्षांचा वृद्ध अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी काही ना काही योजना सुरू केल्याचेही पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर आदींचीही भाषणे झाली.

सार्वजनिक ठिकाणी दारू
पिणार्‍यांना दंड
येत्या ऑगस्ट महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणार्‍यांना तसेच नदीत अथवा रस्त्यांवर व अन्य सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणार्‍यांना दंड ठोठावण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात ८ हजार नोकर्‍यांची निर्मिती
आपल्या सरकारने नोकरभरतीकडे खास लक्ष दिलेले असून त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. राज्यात वर्षभरात ८ हजार नोकर्‍यांची निर्मिती होईल. माहिती तंत्रज्ञान उद्योगांसह खासगी उद्योग क्षेत्रात सुमारे २ ते ३ हजार नोकर्‍यांची निर्मिती होईल. एका आयटी उद्योगातच सुमारे २ हजार नोकर्‍यांची निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

ईडीसीच्या इग्नाईट-ईडीसी इनोव्हेशन हब या इनक्युबेशन सेंेटरचे ईडीसी इमारतीत काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ईडीसीने केलेल्या कार्याची पर्रीकर यांनी यावेळी स्तुती केली. ईडीसी आता नफ्यात आली आहे ही चांगली गोष्ट आहे, असे पर्रीकर म्हणाले.