गोव्यात येऊन महत्त्वाचा निर्णय घेणार ः फ्रान्सिस

0
61

पणजी (न. प्र.)
पर्रीकर मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले व कर्करोगावर सध्या अमेरिकेत उपचार घेणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार फ्रान्सिस डिसोझा हे १७ ऑक्टोबरनंतर गोव्यात पोचणार आहेत. गोव्यात आल्यानंतर आपण एक महत्वाचा निर्णय घेणार आहे. पण नक्की कोणता निर्णय ते सांगण्यास त्यांनी नकार दिला.
काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना डिसोझा म्हणाले की, १० ऑकेटबर रोजी माझे उपचार संपणार होते व ११ रोजी आपण अमेरिकेतून गोव्याकडे प्रयाण करणार होतो. मात्र, उपचार करणार्‍या डॉक्टरने आणखी एक स्कॅनिंग करण्याचा सल्ला दिलेला असून हे स्कॅनिंग १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. शरीराने उपचाराना किती प्रतिसाद दिलेला आहे व रोग किती नियंत्रणात आलेला आहे हे ह्या स्कॅनिंगनंतरच कळू शकणार असल्याचे डिसोझा म्हणाले.
१७ ऑक्टोबर रोजी स्कॅनिंग झाले की १८ रोजी आपण अमेरिकेतून परतणार असल्याचे डिसोझा म्हणाले. डिसोझा उपचारांसाठी २० ऑगस्ट रोजी अमेरिकेला गेले होते. तेव्हापासून ते तेथेच उपचार घेत आहेत.
आमदारकीचा
राजीनामा देणार नाही
पुढे काय, असे विचारले असता डिसोझा म्हणाले की, आमदारकीचा राजीनामा देणार नाही हे आपण यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. लोकांनी पाच वर्षांसाठी भाजपच्या उमेदवारीवर निवडून आणलेले आहे. त्यामुळे हा कार्यकाळ संपेपर्यंत आपण आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.