गोव्यात मॉन्सूनचे आगमन आठवडाभराने लांबणे शक्य

0
103

गोव्यात मान्सूनचे आगमन यंदा आठवडाभराने लांबणीवर पडण्याचा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे. यंदा नैऋत्य मान्सूनचे राज्यात १२ ते १५ जून ह्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता पणजी वेधशाळेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन ७ जून अथवा ७ जूनच्या आसपास होत असते. मात्र एखाद्या वर्षी काही कारणामुळे हे आगमन लांबते. गेल्या ५ वर्षांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर ८ ते १० दिवसांत त्याचे गोव्यात आगमन झालेले आहे. यंदा मान्सूनचे ६ जून रोजी केरळमध्ये आगमन झाले तर त्याचे गोव्यात १५ जूनपर्यंत आगमन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी योग्य वेळी म्हणजेच ७ जून रोजी मान्सूनचे गोव्यात आगमन झाले होते. २०१६ साली मात्र मान्सूनने गोव्याला हुलकावणी दिली होती. परिणामी १३ दिवसांच्या विलंबाने मान्सूनचे गोव्यात आगमन झाले होते. सदर वर्षी १९ जून रोजी गोव्यात मान्सूनचे आगमन झाले होते. २०१७ साली मात्र ८ जून रोजी म्हणजेच केवळ दोन दिवसांच्या विलंबाने मान्सूनचे गोव्यात आगमन झाले होते. यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन ६ जून रोजी होणार असल्याने गोव्यात त्याचे आगमन आठवडाभराने लांबणार असल्याचे वेधशाळेतील सूत्रानी स्पष्ट केले.