गोव्यात मान्सून लांबणीवर

0
110

राज्यात मान्सूनचे आगमन लांबल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. येथील हवामान विभागाने १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु, मान्सूनला गोव्यात पोहोचण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील जनता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागात चोवीस तासात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रातील वायू या वादळामुळे राज्यातील विविध भागात दोन दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण खूपच कमी होऊन उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.
यंदा मान्सून अंदमानात १८ मे रोजी दाखल झाल्यानंतर केरळमध्ये १ जूनला अपेक्षित असताना तेथे मान्सून आठवडयाने उशिरा पोहोचला. राज्यभरात १ जूनपासून आत्तापर्यंत ६.८ इंच पावसाची नोंद झाली आहे.