गोव्यात फलोत्पादनाला प्रोत्साहन गरजेचे

0
262

– राजेंद्र पां. केरकर

 

गोव्यातल्या कष्टकरी समाजात फलोत्पादनाची अभिरूची निर्माण करून त्यांना बाजारपेठ आणि अन्य सुविधा देण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच आम्हाला सुजलाम्, सुफलाम् गोमंतभूमीचे खरे वारसदार म्हणून घेण्याचा हक्क लाभेल.

 

शेती, बागायती आदी उद्योग-व्यवसायांबरोबर गोव्याला फलोत्पादनात उज्ज्वल भवितव्य आहे. गोव्याची भूमी ही आंब्या-फणसांची, जांभूळ-करवंदांची असून पोर्तुगीज अमदानीत येथे काजू, अननस, सीताफळासारख्या रसदार फळांचे आगमन झाले. आंबा, फणस, जांभूळ, कोकम, करवंदे ही या भूमीतली फळे. परंतु पोर्तुगिजांनी आंब्याच्या प्रजातींचा वैविध्यपूर्ण वारसा समृद्ध करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
निलम, पायरी, मानकुराद, मोन्सेरात, हापूस आदी आंब्यांमुळे गोव्याचा लौकिक मोंगल राजवटीत वृद्धिंगत झाला होता. गोव्यातील आमोणा, आमठाणे, आंबेशी, आंबावली ही गावे एकेकाळी मधुर, रसदार आंब्यांसाठी नावारूपास आली होती. गोव्यातील चोडण, दिवाडी, सांतइस्तेव्हसारखी बेटे मानकुराद आंब्यासाठी विशेष प्रसिद्ध होती. चोडणच्या मानकुराद आंब्याचा हा लौकिक वृद्धिंगत व्हावा आणि येथील भूमिपुत्रांना फायदा व्हावा म्हणून येथील मानकुराद आंब्यांची निर्यात देश-विदेशात व्हावी यासाठी प्रेमानंद म्हांबरे यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानसारख्या देशातून चोडणच्या मानकुरादला दरवर्षी वाढती मागणी हे खरे तर प्रेमानंद म्हांबरेंच्या परिश्रमाचे फळ आहे. आज आमोणा, आंबेशी, आंबावली ही गावे बेशिस्तीने फोफावलेल्या खाणव्यवसायामुळे आपला आंब्याचा लौकिक कधीच हरवून बसलेली आहेत.
सिंधुदुर्गसारख्या महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याने आज आम्ररस, पन्ह, आमसुले, आंबापोळी, आवळा कँडी, आवळा रस, जांभूळ रस, जांभूळ बिया चूर्ण, फणसपोळी, काजूची चिकी, काजू चॉकलेट, काजूगर, कोकम सरबत, सोले, भिंडेल, ओटम सोले आदी फलोत्पादनातल्या पदार्थांच्या व्यापार-उद्योगातून कोट्यवधी रुपयांची कमाई आरंभलेली आहे. पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त झाल्यावर आपल्या राजकारण्यांनी प्रथम पर्यटन आणि त्यानंतर खाण व्यवसायाला बेशिस्तीने प्रोत्साहन दिले आणि त्यामुळे शाश्‍वत विकासाला चालना देणारे इथले कित्येक शतके असलेले फलोत्पादन संकटात सापडले. पोर्तुगिजांनी गोव्यातल्या आंबा, फणस आदी फलोत्पादनाच्या वारश्याला काजू, चिकू, अननस, सीताफळांद्वारे समृद्ध केलेले आहे.
गोव्यातल्या बाणावलीच्या नारळाची चव काही औरच. परंतु आज नारळाच्या उत्पादनाला पाहिजे तसा वाव लाभलेला नाही आणि त्यामुळे पेप्सी, कोकाकोला आदी अमेरिकन शीतपेये आपल्या बाजारपेठेत दबदबा निर्माण करू शकलेली आहेत. बाजारपेठेतल्या तंत्राची माहिती नसल्याने आपला नारळ आणि शहाळी मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास असमर्थ ठरलेली आहेत. देश-विदेशातून येणार्‍या पर्यटकांची तृषा भागवण्यासाठी गोव्यासारख्या माड-पोफळीच्या राज्यात केरळ-कर्नाटकातून नारळ, शहाळी आणावी लागतात हे कशाचे लक्षण? एकेकाळी मोरजीचे ‘माडाचे गूळ’ गोवाभर विशेष लोकप्रिय होते. माड्या सुराची चव मद्यपीच्या जीभेवर तरळत होती. आज मोरजीचे गूळ आणि सूर विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहे.
आंबा, फणसपोळी, फळांचे लोणचे, मुरब्बा, रस, सरबत यांचे व्यावसायिक दृष्टीने उत्पादन करून गोव्यातले स्वयंसहाय्य गट, महिला मंडळांना विक्री केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांतील युवक-युवतींना कोकाकोला, पेप्सीचे जडलेले फॅड कमी करण्यासाठी कँटिनमध्ये सरकारने शहाळी, कोकम, जांभूळ, करवंदे, करमल, लिंबू सरबत, पन्ह, आम्ररस उपलब्ध करून त्यांचा खप वाढवण्यासाठी जागृती अभियान राबवणे आवश्यक आहे.
केंद्रीयमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बार्देसातील पर्रा हा मूळ पूर्वजांचा गाव एकेकाळी कलिंगडासाठी, रताळी, नारळ, मिरची, भाजीपाला, चवळी यांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध होता. आज पर्राची कलिंगडे, धर्मापूरचा कोर्ता आंबा, चोडणचा मानकुराद, सत्तरीतले रसाळ फणस, मयडेची मयंडोळी केळी, फोंड्यातली अननसं, तोरिंगे आदींचे विस्मरण गोवेकरांना होऊ लागलेले आहे. मौसमात इथल्या फणसांची नासाडी अस्वस्थ करणारी आहे. चारा, चुन्ना, जगमा, चाफरा, कनर्‍या, फातरफळा, चिपटा हा रानमेवा पुरवणारी झुडपे निर्दयपणे तोडली जात आहेत. काणकोणातील अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण करून लार्सन टूर्बोसारख्या कंपनीतील नोकरी त्यागून कृषी व्यवसायात लक्ष घालणार्‍या प्रभात आमोलकर यांची प्रयोगशीलता, त्यांचा मातीविषयीचा जिव्हाळा अशा उच्च विद्याविभूषित तरुणांत रुजला पाहिजे. प्रभात आमोलकर यांनी आपल्या जमिनीत कलिंगडाची लागवड व्यापक प्रमाणात यशस्वी करून दाखवलेली आहे. गोव्यातल्या कष्टकरी समाजात फलोत्पादनाची अभिरूची निर्माण करून त्यांना बाजारपेठ आणि अन्य सुविधा देण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच आम्हाला सुजलाम्, सुफलाम् गोमंतभूमीचे खरे वारसदार म्हणून घेण्याचा हक्क लाभेल.
गोव्याला कुळागरांचा वारसा लाभलेला असून याठिकाणी नारळ, सुपारी आणि मसाल्याच्या पिकांबरोबर इथला कष्टकरी समाज तोरिंग, जाम, अननस आदी फळांचे पीक घेतो. उन्हाळ्यात बर्‍याच कुळागरांत जामांची पैदास होत असली तरी सिंधुदुर्गसारखी त्यांची पैदास नाही. आणि त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्याची बर्‍याच बागायतदारांची क्षमता नाही. उन्हाळ्यात जाम खाल्ल्यानंतर माणसाला नैसर्गिक तजेला प्राप्त होतो आणि त्यामुळे या कालखंडात जाम बाजारपेठेत आले तर त्यांना विशेष मागणी लाभू शकते. इथल्या बर्‍याच कुळागरांतली बिंबल, करमलासारखी आंबट फळे खूप कमी प्रमाणात बाजारात येत असतात. बिंबलाच्या ताज्या लोणच्याला बरीच मागणी असून खानावळीत असे लोणचे उपलब्ध झाले तर जेवणाची लज्जत वाढू शकते.
उन्हाळ्यात शीतपेयांना प्रचंड मागणी असते आणि त्याचा बराच फायदा पेप्सी, कोकाकोलासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या घेत असतात. सरकारने प्रायोगिक तत्त्वावर गोव्यातल्या स्वयंसहाय्य गटांना, महिला मंडळांना, युवा संस्थांंना करमलाचे सरबत, आंब्याचे पन्ह, जांभूळपोळी, करवंदाचे सरबत, कोकम सरबत, फणसपोळी, आम्ररस, आम्रखंडसारख्या गोष्टी विकण्यासाठी प्रोत्साहित केले तर पिकलेल्या फळांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊन बागायतदारांना त्याचा फायदा होईल.
गोव्यात उन्हाळ्याचे दिवस हे रानमेव्यासाठी पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होते. चारा, चुन्ना, कनर्‍या, फातरफळा, चाफरा, जगमा, शिळणा, हसोळी यांसारख्या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी लहान मुले सुट्टीच्या दिवसांत माळरानावर जायची. आज रानमेवा उपलब्ध करून देणार्‍या वनस्पती दिवसेंदिवस विस्तारणार्‍या बांधकामापायी इतिहासजमा होत आहेत. त्यासाठी चारा, चाफरा, जगमा, शिळणासारख्या रानमेव्याची पैदास करणार्‍या झाडाझुडपांची लागवड करण्यात आली अथवा अस्तित्वात असलेल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आले तर नव्या पिढीला त्यांचा आस्वाद घेणे शक्य होईल. सध्या जांभळे, करवंदे, भेडसा आदी रानमेव्यांचे दिवस आहेत. छोट्यांना त्यांची चव दिली तर निसर्गाशी त्यांचे स्नेहबंध दृढ होतील. गोव्यासारख्या राज्यात फलोत्पादनाला चांगली बाजारपेठ गोवा पर्यटनप्रधान असल्याकारणाने आहे. त्याचा योग्य लाभ घेण्याच्या दृष्टीने इथल्या बागायतदारांनी, शेतकर्‍यांनी विशेष लक्ष घातले तर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल यात तीळमात्र शंका नाही.