गोव्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा

0
125

>> राज्यात मागील दोन दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे

राज्यात आत्तापर्यंत १०७.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे
राज्यात जोरदार पावसामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. घरे, वाहनांवर झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले आहे. त्याच बरोबर भात शेती, बागायतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील सामानाची हानी झाली आहे.

राज्याला गेले कित्येक दिवस जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर शुक्रवार व शनिवारी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील चोवीस तासात राज्यात साधारण १ इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक २.२४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे १.८८ इंच, साखळी येथे १.६३ इंच, म्हापसा येथे १.५३ इंच, मुरगाव येथे १ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी, दाबोली, सांगे येथे पावसाची नोंद झाली आहे.
९१५ आपत्कालीन

घटनांची नोंद
राज्यात आत्तापर्यंत वाळपई येथे सर्वाधिक १४०.१७ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे १२२.३५ इंच, साखळी येथे १२१.२२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात ३ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट सकाळी ७ वाजेपर्यंत आपत्कालीन ९१५ घटनांची नोंद झालेली आहे. आपत्कालीन घटनांमध्ये पावसामुळे घरांची पडझड, घरांवर झाड मोडून कोसळणे, वाहनांवर झाड कोसळणे, विजेच्या खांबावर झाड कोसळणे आदी घटनांचा समावेश आहे. पुराच्या वेळी २२४ नागरिक आणि ९ जनावरांना सुरक्षित स्थळी पोचविण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांनी केले आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरातील पुरामुळे राज्यात दूध, भाजीपाल्याचा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दूध, भाजीपाल्याची दाम दुप्पट दरांनी विक्री केली जात आहे. नागरिकांना रांगेत राहून दुधाची खरेदी करावी लागत आहे.