गोव्यात पाच ‘योग पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव

0
272

>> केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती
>> वर्षभरात देशात उभारणार दीडशे योग पार्क

राज्यात पाच योग पार्क उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. देशभरात वर्षभरात दीडशे योग पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. १ मे २०१८ पर्यंत निम सरकारी संस्थांच्या सहकार्याने ५० योग पार्क कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या योग पार्कमध्ये कमीत कमी सहा महिने योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. तीन दिवसीय १० योग महोत्सवांचे आयोजन विविध राज्यांत केले जाणार आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाच्या प्रचार व प्रसारासाठी योगदान देणार्‍या चार जणांना पंतप्रधान योग पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.

राष्ट्रीय पातळीवरील ४ था जागतिक योगदिन २१ जून रोजी डेहराडूनमध्ये साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत तीन जागतिक योगदिन यशस्वीपणे साजरे करण्यात आले आहेत, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.

गोव्यातील योग दिनाचा प्रमुख कार्यक्रम ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये साजरा केला जाणार आहे. तसेच म्हापसा, पणजी, मडगाव, केपे आणि फोंडा येथे जिल्हा स्तरावरील कार्यक्रम होणार आहेत. आरोग्य खात्याच्या २६ केंद्रांतून योगदिन कार्यक्रम साजरा करण्यात येईल. क्रीडा खाते, शिक्षण खाते यांच्या सहकार्याने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी सांगितले.

केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या सहकार्याने देशभरात योग अभ्यासक्रम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. योग शिक्षणांची सक्ती केली जात नाही. काही विद्यालयांत शारीरिक शिक्षणाच्या तासाच्या वेळी योगाबाबत मार्गदर्शन केले जात आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. यावेळी आरोग्य खात्याचे उपसंचालक (आयुष) डॉ. दत्ता भट, नोडल ऑफिसर महेश वेर्लेकर यांची उपस्थिती होती.