गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्‍नच नाही ः तेंडुलकर

0
152

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आमचे नेते असून त्यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्‍नच नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आजारावरील पुढील उपचारार्थ अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी सकाळी भाजप कोअर समितीच्या सदस्यांनी तातडीने मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर राज्यातील प्रशासकीय, राजकीय स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर राज्यातील नेतृत्व बदलण्याच्या मुद्यांवर चर्चेला सुरुवात झाली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत भाजप गाभा समितीने नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा केली याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत भाजप नेत्यांनी माहिती दिलेली आहे.

शहांबरोबर नेतृत्वाबाबत
बैठक नव्हती ः श्रीपाद
मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेतून सात दिवसात परत येणार आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडे कुठल्याही विषयावर चर्चा नाही, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत राज्यातील नेतृत्व बदलण्यासाठी बैठक आयोजित केलेली नव्हती, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल स्पष्ट केले. राष्ट्रीय अध्यक्ष शहा दिल्ली बाहेर दौर्‍यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेला रवाना झाल्यानंतर राजकीय पातळीवर वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस पक्ष राज्यात सरकार स्थापनेची चाचपणी करू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिगंबर कामत भेटले
मंत्री सुदिन ढवळीकरांना
भाजप आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांची कॉंग्रेस पक्षाचे मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी बुधवारी संध्याकाळी भेट घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्ष सरकार स्थापनेसाठी चाचपणी करीत असल्याची चर्चा राजकीय पातळीवर सुरू झाली आहे.

राजकीय चर्चा नाही ः सुदिन
आमदार कामत आणि आमदार गावकर यांच्याशी आपण कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा केलेली नाही, असे स्पष्टीकरण मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. आमदार कामत आणि आमदार गावकर आपल्या मतदारसंघातील विकास कामाबाबत चर्चेसाठी वेगवेगळे आपल्याकडे आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्रीकरांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ः कॉंग्रेस

>> पर्रीकरांचा सविस्तर आरोग्य अहवाल त्वरित जाहीर करावा

कॉंग्रेस पक्षाने भाजपला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याबाबत सविस्तर अहवाल २४ तासांत जाहीर करण्याचे आव्हान दिले असून मुख्यमंत्र्यांचा आरोग्य अहवाल जाहीर न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल दिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नागरिकांच्या हितासाठी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही कॉंग्रेस पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केली.

राज्याचे मुख्यमंत्रिपद ही मोठी जबाबदारी असते. त्यामुळे या पदाची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती परदेशात जाताना किंवा आपल्या अनुपस्थितीत पदाची जबाबदारी मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्र्याकडे सुपूर्द करतात. परंतु, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेला उपचारासाठी जाताना कुणाकडेही ताबा दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकारी पातळीवरील कामकाजावर परिमाण होतो. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, असा दावा भिके यांनी केला.

गोव्यात सध्या लोकशाही पद्धतीने कारभार चालत नसून मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या एकाधिकारशाहीने कारभार चालविला जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर आपल्या हट्टी स्वभावामुळे पदाचा ताबा दुसर्‍याकडे सुपूर्द करायला तयार होत नाहीत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नागरिकांच्या हितासाठी आपल्या हट्टीपणाला लगाम घालून स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे, अशी मागणी भिके यांनी केली.

बहुजन समाजाच्या नेत्याकडे
सूत्रे सोपवावी
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पदाचा राजीनामा देऊन पक्षातील एखाद्या बहुजन समाजातील नेत्याकडे राज्याच्या कारभाराची सूत्रे सोपवावीत. भाजपमधील बहुजन समाजातील नेता मुख्यमंत्री होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पर्रीकर पायउतार होत नाहीत, असा आरोप जिल्हाध्यक्ष भिके यांनी केला.

राज्यातील आघाडी सरकारमधील भाजपच्या ५ मंत्र्यांपैकी ३ मंत्री आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील मुख्यमंत्री पर्रीकर आणि नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे दोघेही अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पायउतार होणे योग्य आहे, असे भिके यांनी सांगितले.