गोव्यात कोरोनाचे ८ रुग्ण

0
173

गोव्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या काल ८ एवढी झाली आहे. सर्व कोरोनाबाधित रुग्ण परराज्यातून आलेले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा सामाजिक फैलाव तूर्त होऊ शकत नाही. बुधवारी ७ नवीन कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आल्यानंतर गुरूवारी मुंबईतून आलेल्या एका खलाशाची कोविड रॅपीड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. असून या खलाशाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोविड विषाणूची बाधा झालेल्या सात रुग्णांवर मडगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. सात जणांच्या लाळेच्या नमुन्यांची बांबोळी येथील गोमेकॉच्य कोविड प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून सातही जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

वापी गुजरात येथून मालवाहू ट्रक मंगळवारी गोव्यात दाखला होता. एका नागरिकाने सदर ट्रकचा चालक आजारी असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍याला दिल्यानंतर सदर चालकाला हॉस्पिटलमध्ये नेऊन रॅपिड टेस्ट करण्यात आली. रॅपिड टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लाळेच्या नमुन्याची कोविड प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या धाब्यावरील काहीजणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून आलेले
‘ते’ कुटुंब गोमंतकीय
महाराष्ट्रातून आलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे कुटुंब गोमंतकीय आहे. या कुटुंबाच्या सोबत आलेल्या वाहन चालकाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या कुटुंबाचा स्थानिकांशी संबंध आलेला नाही. कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक दक्षता घेण्यात आलेली आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

परराज्यातून सामान घेऊन येणार्‍या मालवाहू ट्रकांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. राज्यात येणार्‍या ट्रक चालक, क्लीनर यांच्या स्क्रिनिंगसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

राज्याच्या तपासणी नाक्यावर मालवाहू ट्रक चालकाची कोविड चाचणी करण्यात आली नव्हती. त्याची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली होती. पत्रादेवी येथील सीमेवरील प्रमुख तपासणी नाक्यावर गोव्यात प्रवेश करणार्‍या वाहनांची मोठी गर्दी असते. या गर्दीतून एखादा दुसरा सुटू शकतो. तपासणी नाक्यावरील पोलीस व इतर कर्मचारी चांगले काम करीत आहेत. गोव्यात प्रवेश करणार्‍यांची तपासणी केली जात असल्याने सात कोरोना विषाणूबाधित रुग्ण सापडले आहेत. इतर राज्यांकडून सीमेवर अशा प्रकारची तपासणी केली जात नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
गोमेकॉतील कोविड प्रयोगशाळेत कोरोना विषाणू बाधितांचा गोपनीय अहवाल सोशल मिडियावर व्हायरल प्रकरणाची चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

८६ गोमंतकीय खलाशांना उतरवले मुंबई बंदरात
कर्णिका या जहाजावरील ८६ गोमंतकीय खलाशांना ६२ दिवसानंतर मुंबई बंदरात काल उतरवून घेण्यात आले आहे. या जहाजामध्ये १५८ भारतीय खलाशी होते. त्यात ८६ गोमंतकीय खलाशांचा समावेश होता. गोमंतकीय खलाशांची कोविड तपासणी करून गोव्यात आणून क्वॉरंटाईन केले जाणार आहे. हे कर्णिका जहाज गोव्याच्या जवळ आल्यानंतर एमपीटी बंदरात गोमंतकीय खलाशांना उतरविण्यासाठी जहाज व्यवस्थापनाने प्रयत्न केला होता. तथापि, केंद्राकडून मान्यता नसल्याने जहाज मुंबई बंदरात पाठविण्यात आले होते.

ट्रेनचा गोवा थांबा
रद्दसाठी प्रयत्न करणार
रेल्वे गाडीच्या तिकिटाचे आरक्षण केलेले ५० टक्के नागरिक बिगर गोमंतकीय आहेत. राज्यातील हॉटेल्स बंद आहेत. येथे त्यांच्या निवासाची समस्या होऊ शकते. रेल्वेतून येणार्‍या नागरिकांनी गोव्यात प्रवेश केल्यानंतर इतर नागरिकसुद्धा गोव्यात प्रवेश करू शकतात. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांची यादी मागविण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालय, रेल्वे मंत्रालयाकडे बिगर गोमंतकीय प्रवाशांना प्रवेश देण्याबाबत विषय मांडून चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्रालय या विषयाचा अभ्यास करीत असून तिकीट आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. रेल्वेसाठी गोव्याचा थांबा रद्द करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

‘त्या’ खलाशाची रॅपिड
चाचणी पॉजिटिव्ह ः विश्‍वजित

मुंबई येथे १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका गोमंतकीय खलाशाची कोविड रॅपिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.
मुंबईत क्वारंटाईन करण्यात आलेल्या खलाशांचे गुरूवारी गोव्यात आगमन झाल्यानंतर त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. मुंबईतील कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेल्या एका खलाशाची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. खलाशांना घेऊन गोव्यात आलेल्या वाहन चालकाची सविस्तर माहिती पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र सरकारला देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी काल दिली.

दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य खात्याच्या प्रयोगशाळेचे गोपनीय अहवाल सोशल मिडियावर व्हायरल करणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्री राणे यांनी दिली आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत कोरोना बाधित कुटुंबाचा गोपनीय अहवाल सोशल मिडियावर गुरूवारी व्हायरल करण्यात आल्यानंतर राणे यांनी वरील इशारा दिला. फोंडा भागातील कोरोनाबाधित कुटुंबाचा कोविड चाचणी अहवाल व्हायरल करण्यात आला होता. सोशल मिडियावर अहवाल व्हायरल केलेल्यांनी आपले ते संदेश काढून टाकले आहेत.

आता जबाबदारी कोण
स्वीकारणार? ः सरदेसाई
केंद्र सरकारने गोव्याचा हरित विभाग समावेश केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. आता, हरित विभागातून नारंगी विभागात बदलाची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? सत्तेबरोबर जबाबदारी येते याची जाणीव ठेवून वागण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोव्यात ८ जण कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी मतप्रदर्शन केले आहे.